Skip to main content
x

नानकर, जगन्नाथ त्र्यंबक

           सामध्ये बटाटा आंतरपीक म्हणून घेण्याबाबत संशोधन व प्रसार करणारे शास्त्रज्ञ म्हणून डॉ. जगन्नाथ त्र्यंबक नानकर यांची महाराष्ट्रात ओळख आहे. त्याचबरोबर बटाटे पिकापासून बीज तयार करून त्यायोगे (ट्रू पोटॅटो सीड) बटाटा पीक घेणे याची तपशीलवार माहिती शेतकरी वर्गाला देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे.

            जगन्नाथ नानकर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील गोंदेगाव तालुक्यात सोयगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण येथेच झाले. १९५२ मध्ये ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठ येथे झाले. त्यांनी १९५७मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली व कृषी खात्यात नोकरीस सुरुवात केली. त्यांची प्रथम नेमणूक नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर कृषि-अधिकारी म्हणून झाली. तेथे काम करताना १९६२मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. ते १९६४ ते १९७२ या काळात कृषिविद्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नागपूर येथे कृषी महाविद्यालयात कार्यरत होते. १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर नानकर औरंगाबाद येथे राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजनेत कृषिविद्यावेत्ता म्हणून कार्य करत होते. त्यांनी १९७२ ते १९७५ या काळात पीएच.डी. अभ्यासासाठी शिमला (हिमाचल प्रदेश) येथील मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्रावर काम केले. येथील संशोधनात्मक कार्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळून त्यांनी पुढील सर्व जीवन बटाटाविषयक संशोधनात घालवले. महाराष्ट्रात बटाटा पीक मर्यादित स्वरूपात काही जिल्ह्यांत घेतले जाते. बटाटा पिकाचा मुख्य हंगाम ऑक्टोबर ते जानेवारी असा आहे. त्याच कालावधीत पूर्वहंगामी उसाची लागवड होते. याचा लाभ घेऊन उसामध्ये बटाटा पीक घेण्याची कल्पना प्रत्यक्षात आणून सहा ऊस कारखान्यांच्या क्षेत्रांवर त्यांनी हा आंतरपीक प्रयोग यशस्वी करून दाखवला.

            डॉ. नानकर यांनी बटाटा पिकाचे खरे बियाणे निर्माण करून त्याचा वापर बटाटा पीक घेण्यात व्हावा म्हणून मौलिक कार्य केले. बटाटा कापून त्याचे काप बी म्हणून वापरतात. दरवर्षी हे बटाटा बियाणे टनावर उत्तर हिंदुस्थानातून आणावे लागते. त्यात बरेच वेळा फसगत होण्याची शक्यता होती. म्हणून बटाट्याचे खरे बी तयार करून ते पीक लागवडीसाठी वापरावे ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणून विकासाचे नवे दालन निर्माण केले. या दोन मौलिक कार्यांमुळे डॉ. नानकर यांचा चीनपासून अमेरिकेपर्यंत प्रवास घडला. परदेशात या कामाची माहिती देण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंडोनेशिया, चीन, पेरू इ. देशांना भेटी दिल्या.  इंडियन पोटॅटो असोसिएशन, इंडियन वीड सायन्स सोसायटी, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन इत्यादी संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत. त्यांनी आजपर्यंत ५० हून अधिक शास्त्रीय लेख प्रकाशित केले आहेत. त्यांनी १५ एम.एस्सी व ७ पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.  निवृत्तीनंतर डॉ. नानकर यांनी बटाटाविषयीचे कार्य करणाऱ्या अनेक खासगी संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ करून दिला आहे.

            - डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

नानकर, जगन्नाथ त्र्यंबक