Skip to main content
x

नांदापूरकर, गोपाळ गणपत

             मराठवाड्यातील शेतीचा विकास व्हावा या एका ध्यासाने प्रेरित होऊन ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ’ या न्यासाला खऱ्या अर्थाने नावारूपास आणण्यासाठी ज्यांनी खूप कष्ट घेतले, त्यापैकी एक गोपाळ गणपत नांदापूरकर हे होत. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नांदापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण परभणी येथील नूतन विद्यालयात झाले. त्यांनी १९६२ मध्ये परभणीतील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली, तर १९६४ मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून कृषि-विस्तारशिक्षण  हा विषय घेऊन एम.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्सेस बंगलोर येथून कृषी उद्योजकता या विषयात पीएच.डी. मिळवली.

           नांदापूरकर यांनी परभणी येथील कृषी महाविद्यालयात सलग २५ वर्षांचा अध्यापनाचा कालखंड यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांनी ४० विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी, तर १५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.

           कृषी महाविद्यालयाच्या सेवेत असताना नांदापूरकर यांनी १९७५ व १९७६ मध्ये गव्हाचा पथदर्शक प्रकल्प १००० एकरांवर घेतला व शेतकऱ्यांना अडीच पट उत्पादन म्हणजे एकरी १५ क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळू शकते, हे दाखवले. त्यांची २०००मध्ये मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर कृषितज्ज्ञ म्हणून नेमणूक झाल्यावर तुती संवर्धन, फूलशेती, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प याबाबत त्यांनी भरीव कार्य केले. व्यवसायाभिमुख शेतीनिगडित उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी तत्कालीन राज्यपाल आणि कृषिमंत्री यांच्याशी चर्चा आणि पाठपुरावा करून शेतीसाठी अनेक उपयुक्त प्रकल्प उभारले.

           नांदापूरकर यांचे नियतकालिकांमधून ३० लेख प्रसिद्ध झाले आहेत व वर्तमानपत्रांमधून शेतीविषयक ५० लेख प्रसिद्ध झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये २५ लेखांचे वाचन झाले आहे. ‘छोट्या शेतकऱ्यांच्या औद्योगिक प्रवृत्तीचा अभ्यास’ या पुस्तकाचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुणे येथील यशदा संस्थेतर्फे त्यांची ‘ग्रामसेवक मार्गदर्शिका’ ही पुस्तिका प्रकाशित झाली, तर ‘एनसायक्लोपिडीया ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट’मध्ये ‘सहकार चळवळ एक सामाजिक प्रक्रिया’ हा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांना महाराष्ट्र कृषि-विस्तारशिक्षण समाजाने आयोजित केलेल्या राज्यस्तरावरील चर्चासत्रामध्ये वाचलेल्या संशोधनपर लेखाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळालेे.

           नांदापूरकर यांनी सेवानिवृत्त झाल्यावर मराठवाड्यामध्ये ५० ग्रामपंचायतींमध्ये जाऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांसाठी ‘आपली गावाबद्दलची असलेली जबाबदारी’ या विषयावर एक दिवसाच्या कार्यशाळा विनामानधन घेतल्या. या कार्याची दखल घेऊन परभणीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विशेष प्रशंसा केली व समाजाभिमुख कार्य म्हणून गौरवही केला आहे.

- मिलिंद  कृष्णाजी  देवल

नांदापूरकर, गोपाळ गणपत