Skip to main content
x

नांद्रेकर, बाबासाहेब दादासाहेब

बी. नांद्रेकर

     बाबासाहेब नांद्रेकर पडद्यावर बी. नांद्रेकर नावाने भूमिका करत. सांगली जिल्ह्यातील नांदेड गावी त्यांचा जन्म झाला, पण त्यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले. शिक्षण चालू असतानाच त्यांच्या वडिलांचे - दादासाहेबांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर सांसारिक जबाबदारी पडली व त्यामुळे त्यांनी मेळ्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या बी. नांद्रेकर यांना नाटकात काम करताना विष्णुपंत दामले यांनी पाहिले आणि त्यांना महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘महारथी कर्ण’ (१९२८) या मूकपटात भूमिका दिली. हा त्यांचा पहिला चित्रपट होय. नंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘लंका’ (१९३०), ‘दुष्यंत का राज्य’ (१९३१), ‘किस्मत’ (१९३२) या मूकपटांत त्यांनी भूमिका केल्या.

      छत्रपती सिनेटोनच्या ‘मराठ्यातील दुही’ (१९३२) मध्ये बोलपटातील पहिली भूमिका बी. नांद्रेकर यांनी केली व ‘मर्द बहाद्दर मराठा गडी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला पोवाडा स्वत:च्या आवाजात नांद्रेकर यांनी सादर केला. १९३३ मध्ये त्यांनी सरदार यादव निर्मित ‘कुरुक्षेत्र’ या हिंदी व मराठी भाषेतील चित्रपटात अर्जुनाची भूमिका केली.

      दामले-फत्तेलाल यांनी नांद्रेकर यांना ‘तुकाराम’मध्ये (१९३६) भूमिका दिली. यात त्यांनी शिवाजीची भूमिका केली होती. शांतारामबापूंच्या ‘अमर ज्योती’ या हिंदी चित्रपटात नांद्रेकर यांनी शांता आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका केली आणि ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. यामुळे त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका करण्यासाठी निमंत्रणे आली. परंतु प्रभातशी त्यांचा करार झाला होता, त्याप्रमाणे नांद्रेकर यांनी प्रभातव्यतिरिक्त इतर कोणाचेही चित्रपट करायचे नाहीत, अशी अट होती. ती मोडल्यामुळे बी. नांद्रेकर यांना प्रभात कंपनीने कोर्टात खेचले, तेव्हा सिराज अली नांद्रेकर यांच्या पाठीशी उभे राहिले व बॅरिस्टर जीनांच्या मदतीने बी. नांद्रेकर करारमुक्त झाले. त्यानंतर नांद्रेकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून कामे केली. १९४१ मध्ये पुनर्निर्मिती केलेल्या चित्रपटात बी. नांद्रेकर यांनी प्रदीप कुमारची भूमिका केली होती. १९३८ मध्ये दिग्दर्शक ए.आर. करदार यांच्या ‘बागबान’ चित्रपटात नायकाची भूमिका पायात कोल्हापुरी चप्पल घालून केली होती. त्यामुळे ती चप्पल पुढे बी. नांद्रेकर या नावाने ओळखली जाऊ लागली. शांता आपटे, लीला देसाई, नर्गिस या नायिकांबरोबर त्यांनी नायकाची कामे केलेली आहेत.

     १९३९ साली त्यांनी ‘इंडिया इन आफ्रिका’ या चित्रपटात त्यांनी काम केले. परदेशात चित्रित करण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते आफ्रिकेला जाऊन आले होते. भालजी पेंढारकरांच्या ‘अलख निरंजन’ (१९४०), ‘कैदी’ (१९४०), ‘चित्रलेखा’ (१९४१) इत्यादी चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. वयाच्या ३३व्या वर्षी अल्पशा आजाराने बी. नांद्रेकर यांचे निधन झाले.

- श्रीराम ताम्रकर

नांद्रेकर, बाबासाहेब दादासाहेब