Skip to main content
x

नारळीकर, जयंत विष्णू

     जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. नारळीकरांचे शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण हे बनारस येथे झाले. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे याच बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. १९५७ साली विज्ञानातील पदवी मिळवल्यानंतर नारळीकरांनी आपले पुढील शिक्षण हे इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून घेतले. १९६३ साली फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली नारळीकरांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. या पदवीसाठी त्यांनी केलेले संशोधन हे विश्वाच्या विविध प्रारूपांशी संबंधित आहे. 

     १९७२ सालापर्यंत नारळीकरांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ‘किंग्ज कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या संस्थांत अध्यापन आणि संशोधन केले. त्यानंतर ते भारतात परतले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. या संस्थेत सैद्धान्तिक खगोल भौतिकशास्त्रावर संशोधन करणाऱ्या गटाचे ते प्रमुख होते. १९८९ साली आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या पुणे येथील संस्थेचे ते पहिले संचालक झाले. २००३ साली तेथून निवृत्त झाल्यानंतर एक वर्षाच्या काळासाठी पॅरिस येथील ‘कोलेज द फ्रान्स’मध्ये त्यांची ‘आंतरराष्ट्रीय प्राध्यापक’ म्हणून नियुक्ती केली गेली होती. तेथून परत आल्यावर त्यांना ‘आयुका’मध्येच ‘एमेरिटस प्रोफेसर’ हे सन्माननीय प्राध्यापकपद देण्यात आले.

     नारळीकरांचे सुमारे दोनशे संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या या संशोधनात विश्वशास्त्र, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय अभिरक्त विस्थापन, कृष्णविवरे, श्वेतविवरे अशा विविध अंगांचा समावेश आहे. त्यांचे विश्वाच्या ‘स्थिर-स्थिती’ प्रारूपाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. १९४८ साली हर्मन बाँडी, थॉमस गोल्ड आणि फ्रेड हॉएल यांनी मांडलेल्या या प्रारूपानुसार विश्व हे प्रारंभहीन आणि अंतहीन आहे. तसेच, विश्वाची घनता ही अचल असल्याचे हा सिद्धान्त मानतो. विश्वातील दीर्घिका आणि तारे ज्या गतीने नष्ट होत आहेत, त्याच गतीने त्यांची निर्मितीही होत आहे. मात्र, महास्फोट सिद्धान्तावर आधारित प्रारूपाप्रमाणे या प्रारूपानुसारही हे विश्व प्रसरण पावत आहे. या परिस्थितीत विश्वाची घनता अचल राखण्यासाठी विश्वात पदार्थांची निर्मिती अखंडपणे होत असायला हवी. ही अखंड पदार्थनिर्मिती आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षतेच्या चौकटीत शक्य असल्याचे हॉएल आणि नारळीकर यांनी दाखवून दिले.

     सुरुवातीच्या काळात विश्वाचे हे स्थिर-स्थिती प्रारूप महास्फोट सिद्धान्ताला महत्त्वाचा पर्याय ठरले होते. परंतु, महास्फोट सिद्धान्तानुसार अपेक्षित असलेल्या तापमानाचा स्पष्ट पुरावा मिळाल्यामुळे स्थिर-स्थिती प्रारूपाची स्वीकारार्हता कमी झाली. कालांतराने या स्थिर-स्थिती प्रारूपातील त्रुटींचे निराकरण करणारे विश्वरचनेचे एक वेगळे स्थिर-स्थितिसदृश प्रारूप फ्रेड हॉएल, जेफ्री बर्बिज आणि नारळीकरांनी मांडले. स्थिर-स्थिती प्रारूपाच्या या नव्या आवृत्तीनुसार विश्व जरी प्रसरण पावत असले, तरी त्याबरोबरच त्याचे काही प्रमाणात आवर्ती आकुंचनही होत असले पाहिजे. नारळीकरांनी हॉएल यांच्याबरोबर विद्युत गतिशास्त्रातही संशोधन केले. गुरुत्वाकर्षणीय सिद्धान्ताला नवे स्वरूप देणाऱ्या ‘समाकृती गुरुत्वाकर्षणा’च्या सिद्धान्तात या संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली. याबरोबरच, नारळीकरांनी वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली होणाऱ्या आकुंचनावरही संशोधन केले आहे.

      अनेक अवकाशस्थ वस्तूंच्या वर्णपटातील परिचित रेषांची लहरलांबी ही अपेक्षेपेक्षा वेगळी असल्याचे दिसून येते. वर्णपटातल्या रेषांचे हे विस्थापन वेगवेगळ्या कारणांमुळे असते. या विस्थापनाला अवकाशस्थ वस्तूचा निरीक्षकाच्या सापेक्ष वेग, विश्वाचे प्रसरण, वस्तूचे स्वत:चे गुरुत्वाकर्षण, अशा अनेक बाबी कारणीभूत ठरतात. अशाच प्रकारचे विस्थापन किंताऱ्यांच्या (क्वेसार्सच्या) वर्णपटातूनही दिसून येते. किंतारे हे अंतराळातले अतिदूरवरचे तारकासदृश असे प्रचंड ऊर्जेचे स्रोत आहेत. या किंताऱ्यांबाबतीतले विस्थापन हे अपेक्षेपेक्षा खूपच मोठे असल्याचे आढळले आहे. या असंगत विस्थापनामागील कारणेसुद्धा डॉ.नारळीकरांनी गुरुत्वाकर्षणाशी संबंधित आपल्या संशोधनाद्वारे स्पष्ट केली. श्वेतविवरे ही ऊर्जेचे प्रचंड स्रोत असून विश्वातील काही स्फोटक घटनांशी असलेला त्यांचा संबंधही त्यांनी दाखवून दिला.

     टॅकिऑनस या प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकणाऱ्या; पण अजूनतरी फक्त सैद्धान्तिक स्वरूपात अस्तित्वात असलेल्या कणांवर होणाऱ्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावावरही नारळीकरांनी सैद्धान्तिक स्वरूपाचे संशोधन केले आहे. आपल्या अतिघनस्वरूपामुळे कृष्णविवरांच्या निकट गुरुत्वाकर्षण हे अत्यंत तीव्र असते. परिणामी, कृष्णविवरांतून प्रकाश बाहेर पडू शकत नाही व कृष्णविवरे ही अदृश्य राहतात. पण टॅकिऑनस हे कण जेव्हा कृष्णविवरांत त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली ओढले जातात, तेव्हा त्या कृष्णविवराचे अतिघनस्वरूप नष्ट होण्याची शक्यता नारळीकरांनी आपल्या संशोधनातून व्यक्त केली आहे. असे झाल्यास टॅकिऑनसच्या संपर्कात आलेल्या कृष्णविवराला सर्वसाधारण वस्तूचे स्वरूप प्राप्त होऊन ती वस्तू दृश्य स्वरूपात प्रकट होऊ शकेल. यामुळे कृष्णविवरे ही टॅकिऑनसचे अस्तित्व दर्शवण्यास उपयुक्त ठरू शकतील हा महत्त्वाचा निष्कर्ष या संशोधनातून काढता येतो.

     १९९९ सालापासून नारळीकरांनी एका वैशिष्ट्यपूर्ण आंतरराष्ट्रीय संशोधन मोहिमेचे नेतृत्व केले आहे. या मोहिमेच्या दोन दशके अगोदर हॉएल आणि नलिनचंद्र विक्रमसिंघे यांनी पृथ्वीवर पसरत असलेल्या साथीच्या रोगांपैकी काही रोग हे अंतराळातून धूमकेतूंसारख्या अवकाशस्थ वस्तूंद्वारे येणाऱ्या जीवाणूंमुळे होत असल्याची शक्यता व्यक्त केली होती. या शक्यतेचा प्रत्यय घेण्यासाठी ही संशोधन मोहीम आखली गेली होती. या मोहिमेद्वारे केल्या गेलेल्या निरीक्षणांत सुमारे ४१ किलोमीटर उंचीवरही काही जीवाणूंचे अस्तित्व दिसून आले. ह्या मोहिमेला भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचा सहभाग लाभला आहे.

     विज्ञानप्रसाराचे महत्त्व पूर्णपणे जाणून असणाऱ्या नारळीकरांनी आपल्या विषयाशी निगडित असलेल्या लेखनाबरोबरच, सामान्यांना समजेल अशा भाषेत इंग्रजी, मराठी तसेच हिंदीतून विपुल प्रमाणात वैज्ञानिक लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या किंवा लेखनात त्यांचा सहभाग अथवा संपादन असलेल्या पुस्तकांची संख्या शंभराहून अधिक आहे. यातली जवळपास पंचवीस पुस्तके ही मराठी भाषेतली आहेत. या मराठी वैज्ञानिक पुस्तकांत ‘खगोलशास्त्राचे विश्व’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘पोस्टकार्डातून विज्ञान’ यांसारख्या अनेक उल्लेखनीय पुस्तकांचा समावेश आहे. यांतले ‘पोस्टकार्डातून विज्ञान’ हे पुस्तक नारळीकरांकडे शंकानिरसनासाठी आलेल्या असंख्य पत्रांतून जन्माला आलेले आहे.

मराठी विज्ञानकथेच्या क्षेत्रात नारळीकरांनी आपला खास ठसा उमटवला आहे. या क्षेत्रातील त्यांचे पदार्पण नाट्यपूर्ण  ठरले. इ.स. १९७४ साली ‘नारायण विनायक जगताप’ यांनी लिहिलेल्या  ‘कृष्णविवर’ या कथेला मराठी विज्ञान परिषदेचे पहिले पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच नारायण विनायक जगताप म्हणजेच जयंत विष्णू नारळीकर हे स्पष्ट झाले. आपल्या नावाचा प्रभाव परीक्षकांच्या निर्णयावर पडू नये म्हणून डॉ. नारळीकरांनी आपल्या आद्याक्षरांचा उलटा क्रम वापरून हे टोपणनाव निर्माण केले व या टोपणनावाने ही कथा लिहिली. यानंतर त्यांनी लिहिलेले  ‘यक्षाची देणगी’सारखे विज्ञानकथासंगह, तसेच ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’ यांसारख्या कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत. डॉ. नारळीकरांच्या अनेक कथांची अन्य भारतीय भाषांतही रूपांतरे केली गेली आहेत. यांतील काही कथा नाटिकांच्या स्वरूपातही सादर केल्या गेल्या आहेत.

     डॉ. नारळीकरांना प्रभावी वक्तृत्वाची देणगी आहे. नारळीकर आपल्या विषयावरील सखोल व्याख्याने ज्या परिणामकारकरीत्या देतात, तितक्याच परिणामकारक पद्धतीने ते सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेतही व्याख्याने देतात. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांत नारळीकरांचा सहभाग होता. दूरदर्शनने सादर केलेला ‘आकाशाशी जडले नाते’ हा नारळीकरांचा प्रमुख सहभाग असलेला खगोलशास्त्रावरील चर्चात्मक कार्यक्रम अमाप लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमात नारळीकरांनी अनेक किचकट खगोलशास्त्रीय संकल्पना सोप्या शब्दांत श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या.

     नारळीकरांनी विविध शासकीय समित्यांवरही काम केले आहे. १९८६-८९ या काळात ते पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य होते. भारत-अमेरिका या देशांदरम्यान स्थापन झालेल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाशी संबंधित आयोगावरही त्यांनी भारतातर्फे १९८५-८९ या काळात प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या विश्वरचनाशास्त्रावरील आयोगाचे ते १९९४ ते १९९७ या काळात अध्यक्ष होते.

    अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सन्माननीय सदस्य असणाऱ्या नारळीकरांना अनेक राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान लाभले. केंब्रिज विद्यापीठात ‘रँग्लर’, खगोलशास्त्रातील टायसन पदक, अ‍ॅडम्स पुरस्कार आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळविलेल्या नारळीकरांना युनेस्कोने विज्ञानप्रसाराबद्दल कलिंग पुरस्कार व फ्रान्सच्या खगोलशास्त्रीय संस्थेचे जान्सेन सुवर्णपदक मिळाले आहे.

     शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवले गेलेले नारळीकर हे फाय फाउण्डेशनचा राष्ट्रभूषण सन्मान, कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीचे दुर्गाप्रसाद खैतान सुवर्णपदक, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचा इंदिरा गांधी पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठेच्या सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. केंद्रशासनातर्फे नारळीकरांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) हे पुरस्कार देण्यात आले. इ.स. १९९१ ते १९९४ या काळात नारळीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्याअगोदर नारळीकर हे मराठी विज्ञान परिषदेच्या जालना येथील इ.स. १९७३ सालच्या विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते. तेव्हा अवघे पस्तीस वर्षांचे असणारे नारळीकर हे विज्ञान संमेलनांच्या इ.स. १९६६ सालापासून इ.स. २००४ सालापर्यंतच्या जवळजवळ चार दशकांच्या इतिहासातले सर्वांत तरुण संमेलनाध्यक्ष ठरले. २०१० साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. तर २०१४ साली ‘चार नगरातील माझे विश्व’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

- डॉ. राजीव चिटणीस

नारळीकर, जयंत विष्णू