Skip to main content
x

नारळीकर, विष्णू वासुदेव

     केंब्रिज विद्यापीठात ‘बी-स्टार रँग्लर’ ही पदवी मिळविणारे गणिती, बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, गणिताचे अध्यापन, संशोधन व लेखन करण्यात आयुष्य व्यतीत करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणितज्ञ, अनेक पारितोषिकांचे मानकरी आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचे व्यासंगी अभ्यासक अशी विष्णू वासुदेव नारळीकर यांची ओळख आहे.

     रँग्लर वि.वा. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न वासुदेवशास्त्री हे संस्कृत पंडित आणि प्रवचनकार होते. नारळीकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्या परीक्षेत कोल्हापूर केंद्रात ते पहिले आले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आता विज्ञान संस्था) या संस्थेतून ते १९२८ साली गणित विषय घेऊन बी.एस्सी. झाले. या परीक्षेत ९५.५ टक्के गुण मिळवून त्यांनी एक उच्चांक प्रस्थापित केला. या यशामुळे त्यांना मंगलदास नथुभाई प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली. याखेरीज त्यांना टाटा शिष्यवृत्तीही मिळाली. कोल्हापूर दरबाराने त्यांना उच्चशिक्षणासाठी आठ हजार रुपये कर्जाऊ दिले.

     पुढील शिक्षणासाठी त्यांनी गणित या विषयाचे अध्ययन करण्याचे ठरविले आणि केंब्रिज विद्यापीठातील फिट्झविल्यम हाउसमध्ये ते दाखल झाले. केंब्रिजमधील वास्तव्यात त्यांनी ‘लियापाडनोफल सोल्युशन फॉर रोटेटिंग लिक्विड्स’ या विषयात प्रा. बेकर यांच्या मदतीने संशोधन केले. त्यांचा संशोधन निबंध ‘रॉयल सोसायटी’च्या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाला. त्या लेखाचे महत्त्व सांगणारी प्रस्तावना त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक लार्मर यांनी लिहिली होती. त्यांचे ‘हाइएस्ट अ‍ॅटॉमिक नंबर्स १’ विषयावरील संशोधन १९३२ साली ‘नेचर’ मासिकात प्रसिद्ध झाले. या विषयात पदवी परीक्षेत १९३० साली त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला आणि बी-स्टार रँग्लरचा बहुमान मिळविला. यामुळे त्यांना ‘टायसन’ पदक आणि ‘आयझॅक न्यूटन’ ही बहुमानाची, २५० पौंडांची शिष्यवृत्ती मिळाली. केंब्रिजमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर निबंध लिहावा लागे. उत्कृष्ट ठरलेल्या निबंधांना पारितोषिके दिली जात. नारळीकरांच्या निबंधाला ‘रॅले’ पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक मिळविणारे ते पहिले भारतीय होते.

     आयझॅक न्यूटन शिष्यवृत्तीतून नारळीकरांनी खगोलशास्त्रावर संशोधन केले. या संशोधनात त्यांना सर जोसेफ लार्मर व सर आर्थर एडिंग्टन या जगविख्यात शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन निबंधासाठी नारळीकरांना ‘स्मिथ’ पारितोषिक मिळाले.

     बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले असताना, त्यांनी केंब्रिज येथे जाऊन नारळीकरांची भेट घेतली व तेथील अभ्यास पूर्ण झाल्यावर बनारस विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून येण्याचे आमंत्रण दिले. नारळीकरांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि केंब्रिजमधील अभ्यास संपल्यावर १९३२ साली ते बनारस विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. बनारस विद्यापीठात १९३२ ते १९६० अशी अठ्ठावीस वर्षे त्यांनी गणित विभाग प्राध्यापकाची जबाबदारी पार पाडली.

     सर आर्थर एडिंग्टन हे जगविख्यात गणिती, आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद व विश्वरचनाशास्त्र या विषयांत संशोधन करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारळीकरांनी त्या विषयात संशोधन सुरू केले.

     बनारस विद्यापीठात रुजू झाल्यावर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने या विषयाच्या अभ्यासासाठी व्यापक सापेक्षतावाद संशोधन केंद्र निर्माण केले. त्यांचा एक विद्यार्थी बी.आर. राव याने आइन्स्टाइनच्या सिद्धान्तात सुधारणा करणारी काही नवीन समीकरणे स्थापित केली होती. त्याबद्दल त्याला डॉक्टरेट पदवी मिळाली. या संशोधनाचे परीक्षण करणारे प्रा. एन्फेल्ड हे आइन्स्टाइनचे प्रमुख सहकारी होते. पुढे त्यांनीच प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या या विषयावरील ग्रंथात राव-नारळीकर यांच्या रीतीचा सविस्तर उल्लेख केलेला आहे.

     बनारस विद्यापीठात रँग्लर नारळीकरांनी आपल्या विद्यार्थ्यांसह ‘सापेक्षतावाद’, ‘युनिफाइड फील्ड थिअरी’ इ. विषयांवर संशोधन चालू ठेवले. त्या विद्यार्थ्यांपैकी डॉ. पी.सी. वैद्य, डॉ. के.आर. करमरकर, डॉ. एस.पी. सिंग, डॉ. रामजी तिवारी, डॉ. द.व. मोने हे उल्लेखनीय संशोधन करून प्रसिद्धीस आले. डॉ. पी.सी. वैद्य यांनी आइन्स्टाइनची सूत्रे सोडविण्याची सोपी पद्धत शोधली. त्यांचा हा निबंध फक्त वैद्यांच्याच नावावर प्रसिद्ध करून नारळीकरांनी त्यांचे सर्व श्रेय वैद्यांनाच दिले होते. हा शोध ‘वैद्य पद्धती’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्यांचे विद्यार्थी केवळ पीएच.डी.साठी अभ्यास न करता, त्यांचा व्यासंग सतत चालू ठेवून आपापल्या विद्यापीठात संशोधन करीत होते. आपल्या संशोधन काळात रँग्लर नारळीकरांनी ७२ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले होते.

     वि.वा. नारळीकरांना निरनिराळ्या विद्यापीठांमधून व्याख्यानांसाठी आमंत्रणे येत. केंब्रिजहून परतल्यावर त्यांना मुंबई विद्यापीठाने १९३३ साली व १९३८ साली सापेक्षतावादावर व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले. १९३९-१९४० या वर्षात त्यांनी पाटणा विद्यापीठात तरंग यांत्रिकी (वेव्ह मेकॅनिक्स) या विषयावर व्याख्याने दिली. ती पाटणा विद्यापीठाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. १९५३ साली इंडियन सायन्स काँग्रेसच्या लखनऊ अधिवेशनात ते गणित विभागाचे अध्यक्ष होते. भारतातील अनेक नामवंत संस्थांनी त्यांना सभासदत्व देऊन त्यांचा गौरव केला.

     नारळीकर जसे गाढे विद्वान होते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक होते, उत्तम प्राध्यापक होते, तसेच उत्तम वक्तेही होते. गणितासारखा अवघड विषय सामान्य श्रोत्यांना सुलभ रितीने समजावून देऊन ते मंत्रमुग्ध करीत असत. १९६९ साली नाशिकला झालेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या चौथ्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्या वेळी त्यांनी ‘शोध कसे लागतात?’ या विषयावर भाषण केले होते.

    सन १९६६ मध्ये नारळीकर पुणे विद्यापीठात टिळक प्रोफेसर म्हणून आले. येथे त्यांनी रायनिअन भूमिती व सापेक्षतावाद या विषयांत विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवीसाठी मार्गदर्शन केले.

     २६ सप्टेंबर, १९६८ रोजी नारळीकरांना ६० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ अहमदाबाद येथे विद्यापीठ अनुदान मंडळ, वास्तवशास्त्र संशोधन संस्था व गुजरात विद्यापीठ यांच्या सहकार्याने सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण व विश्वरचना या विषयांवर एक अखिल भारतीय चर्चासत्र १९,२०,२१ फेब्रुवारी, १९६९ रोजी भरले होते. यासाठी प्रा. फ्रेड हॉयल हे इंग्लंडमधून व प्रा. इव्हॅनेत्को हे मॉस्को येथून व्याख्याने देण्यास आले होते. याशिवाय डॉ. जयंत नारळीकर व इतर भारतीय विद्वानांची भाषणे झाली. या व्याख्यानांचे पुस्तक बनारस हिंदू विद्यापीठाने प्रसिद्ध केले.

     नारळीकरांच्या पत्नी सुमतीबाई या संस्कृत विषयात एम.ए. झाल्या होत्या. त्यांचे दोन मुलगे जयंत व अनंत हे नामवंत शास्त्रज्ञ झाले. नारळीकर निवृत्त झाल्यानंतर जयंतरावांकडे राहायचे. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांचे राहत्या घरीच शांतपणे निधन झाले.

- र. म. भागवत

नारळीकर, विष्णू वासुदेव