Skip to main content
x

नायक, दत्ताराम बाबूराम

एन.दत्ता

न. दत्ता ऊर्फ दत्ताराम बाबूराम नायक यांचा जन्म पेणजवळील आरोषा या गावी झाला. त्यांचे बालपण गोव्यात गेल्याने त्यांच्यावर पोर्तुगीज व कोकणी संगीताचे संस्कार झाले. लहानपणापासून संगीताकडे ओढा असल्याने शिक्षण अर्धवट सोडून दत्ता मुंबईला आले. येथे बी.आर. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली देवधर संगीत विद्यालयात संगीत शिकू लागले.

चित्रपट संगीताची गोडी लागल्याने त्यांनी गुलाम हैदर या संगीत दिग्दर्शकाकडे काही काळ उमेदवारी केली. त्याच काळात गीतांना स्वतंत्रपणे संगीत देऊन ते गाण्याचे कार्यक्रमही करू लागले. अशाच एका कार्यक्रमात ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनी त्यांना हेरले व स्वत:चा साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची नेमणूक केली. १९५१ मध्ये आलेल्या ‘सजा’ या चित्रपटापासून या दोघांची जोडी जमली. पुढे एन. दत्ता यांनी अनेक चित्रपटांसाठी बर्मन यांचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.

तथापि १९४९ मध्ये आलेल्या ‘ती आणि ते’ या चित्रपटाने एन. दत्ता यांना पार्श्‍वसंगीत देण्याचा स्वतंत्र अनुभव आलेला होता. दत्ता यांनी १९५१ मध्येच ‘मिलाप’ या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत देत आपली संगीत दिग्दर्शनाची कारकिर्द सुरू केली. परंतु १९५९ ते १९६३ या काळात गंभीर आजारपणामुळे त्यांना काम करता आले नाही. नंतर १९६४ मध्ये आपली संगीत दिग्दर्शनाची कारकिर्द पुन्हा सुरू करताना ‘चाँदी की दीवार’ या चित्रपटाला संगीत दिले. दत्ता यांचे ‘साधना’ (औरत जनम दिया मर्दो को), ‘चंद्रकांता’ (मैने चाँद और सितारोंकी तमन्ना की थी), ‘धूल का फूल’ (तेरे प्यार का आसरा चाहता हूँ) या चित्रपटातील गाणीही गाजली. त्यानंतर ते मराठी चित्रपटांकडे वळले. १९६४ ते १९८१ या काळात त्यांनी संगीतबद्ध केलेले बारा मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. ‘एक दोन तीन’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर आलेल्या ‘मधुचंद्र’ या चित्रपटातील ‘मधू इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात’ व ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ ही गाणी रसिकांच्या अजूनही स्मरणात आहेत. १९६९ मध्ये आलेल्या ‘अपराध’ व १९७७ मध्ये आलेल्या ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटांनी एन. दत्ता यांना राजमान्यता मिळाली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गोविंदा आला रे आला’ हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर व्याधींनी ग्रासल्यामुळे त्यांना चित्रपटसंन्यास घेणे भाग पडले. मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

- शशिकांत किणीकर

नायक, दत्ताराम बाबूराम