Skip to main content
x

नेमीकुमार, देवीचंदजी

आनंदॠषी

     नंदॠषीजी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी (शिराळ) या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव हुलसादेवी व वडिलांचे नाव देवीचंदजी असे होते. चिंचोडी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून देवीचंदजी यांंना सर्व जण सन्मान देत होते. आनंदॠषींचे मूळ नाव नेमीकुमार असे होते. जैन धर्मातील पाच संप्रदायांनी आपसातील मतभेद मिटवून आनंदऋषींना ‘आचार्य’ म्हणून स्वीकारले. छोट्याशा नेमीकुमारला लहान वयातच पितृवियोगाचे दु:ख सोसावे लागले. आई हुलसादेवी यांनी मोठ्या हिमतीने नेमीकुमारांचे संगोपन केले व त्यांच्यावर उत्तमोत्तम असे धार्मिक संस्कार केले. छोटा नेमीकुमार हा मातृभक्त होता. मुलांबरोबर खेळण्यास न जाता तो आईस घरकामात मदत करीत असे. आईने केलेल्या संस्कारांमुळेच नेमीकुमारचा स्वभाव व वृत्ती धर्मपरायण झालेली होती. चिंचोडीसारख्या छोट्या गावात जैन धर्मगुरू श्री रत्नॠषीजी महाराज आले असता त्यांच्या सेवेचा लाभ छोट्या नेमीकुमारला झाला व त्यांच्या सत्संगाने-सहवासाने नेमीकुमारच्या मनात जैन धर्मासाठी आपले जीवन व्यतीत करण्याचा संकल्प उदयमान झाला. नेमीकुमारची बुद्धी, सेवावृत्ती आणि धर्मनिष्ठा लक्षात घेऊन श्री रत्नॠषी महाराज यांनी त्यांच्या आईकडे नेमीकुमारची मागणी केली.

     ‘‘या मुलाचा जन्म आपल्या धर्माचे नाव उज्ज्वल करण्यासाठी झाला आहे, त्याला तुम्ही केवळ तुमच्या कुटुंबाचा समजू नका, त्याचा जन्म समाजकार्यासाठी झालेला आहे,’’ असे सांगून श्री रत्नॠषींनी माता हुलसादेवीची समजूत घातली आणि जैन धर्म प्रचारार्थ नेमीकुमारला आईने व चिंचोडी गावकर्‍यांनी आनंदाने व अभिमानाने निरोप दिला.

     श्री रत्नॠषी महाराजांनी नेमीकुमारच्या शिक्षणाची व्यवस्था केली. कुशाग्र बुद्धीच्या या बालकाने अपेक्षेपेक्षा अल्पवेळेतच सर्व विद्या आत्मसात केल्या व शिक्षण पूर्ण केले. १९१३ साली एका रविवारी नगर जिल्ह्यातील ‘मिरी’ येथे श्री रत्नॠषींनी नेमीकुमारला जीन शासनाची सेवा करण्यासाठी समारंभपूर्वक दीक्षा दिली. दीक्षाविधीनंतर नेमीकुमारचे नाव ‘आनंदॠषी’ झाले.

     आनंदॠषींचे जीवन म्हणजे विद्येसाठीची अविरत तपश्चर्या आहे. श्री रत्नॠषींची इच्छा होती, की आपल्या शिष्याने सर्व शास्त्रांचा, दर्शनांचा, संस्कृत वाङ्मय, प्राकृत ग्रंथांचा अभ्यास करून एक प्रकांड पंडित, प्रचंड व्यासंगी बहुमुखी विद्वान असा लौकिक मिळवावा. गुरूची ही इच्छा लक्षात घेऊन आनंदॠषी यांनी सकल शास्त्रांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी संस्कृतचे राष्ट्रीय पंडित कृष्णाजी शास्त्री, पंडित व्यंकटेश लेले शास्त्री व पंडित सिद्धेश्वरशास्त्री अशा विद्वानांकडे जाऊन संस्कृतचा अभ्यास केला. बनारस विश्वविद्यालयातील पंडित राजधारी त्रिपाठी यांनीही आनंदॠषींना व्याकरण, दर्शन, साहित्याचे विशेष ज्ञान दिले. तसेच, आनंदॠषींनी जैनागमांचाही सूक्ष्म अभ्यास केला. काही वर्षांतच आनंदॠषींची; एक कुशाग्र बुद्धीचा व्यासंगी विद्वान अशी सर्वत्र ख्याती झाली.

     गुरू रत्नॠषीजींचे स्वप्न साकार झाले; पण शिष्याचे पुढील काळातील दिग्विजय पाहण्यास गुरू राहिले नाहीत. इ.स. १९२७ मध्ये गुरू रत्नॠषी महाराज यांचे निर्वाण झाले. गुरूंच्या वियोगाचे आनंदॠषींना दु:ख वाटले; पण मृत्यू हे एक शाश्वत सत्य असल्याने त्याबद्दल शोक न करता गुरूंच्या आज्ञेनुसार ते नव्या जोमाने, नव्या जबाबदार्‍या पेलण्यास सिद्ध झाले. ज्ञानप्रसाराचे महत्त्व लक्षात घेऊन आनंदॠषी यांनी ‘त्रिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळा’ची स्थापना केली आणि जागोजागी शाळा, विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली. त्याचबरोबर, जैन समाजात एकी होण्यासाठी वेगवेगळ्या नऊ संघांना त्यांनी एकाच आचार्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. नऊ संघांपैकी पाच संघ एकत्र होण्याची ऐतिहासिक घटना घडली व या पाच संघांनी आचार्य म्हणून खुद्द आनंदॠषी यांनाच नेतृत्व दिले.

     १९४९ मध्ये ब्यावर (राजस्थान) येथे ही ऐतिहासिक घटना घडली. १९५२ मध्ये ‘श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ’ स्थापन करण्यात त्यांना यश आले. त्याचे प्रथम आचार्य श्री. आत्माराम यांना करण्यात आले. श्री. आत्माराम यांच्यानंतर ‘आचार्य’ हे सर्वोच्चपद आनंदॠषी यांच्याकडे चालून आले.

     भगवान महावीरांचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी त्यांनी अखंड प्रवास व सत्संग, चतुर्मास सोहळे केले. शरीर थकले तरी ते अखंड कार्यरत होते. अखंड पायी विहार (पदयात्रा) आणि सतत बोलण्याचे, प्रवचनांचे कार्यक्रम याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता; पण महावीर संदेश प्रचार हेच आपले जीवनकार्य आहे म्हणून ते श्रमाची, कष्टाची पर्वा करत नव्हते. पुणे येथे १९७५ मध्ये आनंदॠषी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त अमृतमहोत्सव सोहळा साजरा करण्यात आला व समाजसेवेसाठी ‘आनंद फाउण्डेशन’ नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात आली. रक्तपेढी, नेत्रपेढी अशी अनेक प्रकारची समाजकार्ये सुरू करण्यात आली.

     वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी अहमदनगर येथेच त्यांचे निर्वाण झाले.

विद्याधर ताठे

नेमीकुमार, देवीचंदजी