Skip to main content
x

नगरकर, किरण कमलाकर

     किरण कमलाकर नगरकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या किंग जॉर्ज शाळेत व माध्यमिक शिक्षण पुणे येथील सेन्ट व्हिन्सेन्ट हायस्कूल व मुंबईतील डॉन बॉस्को या शाळांत झाले. मुंबईचे सेन्ट झेविअर्स महाविद्यालय व पुण्याचे फर्गसन महाविद्यालय येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्लिश या विषयातील एम.ए.ची पदवी घेतली. ‘अभिरुची’मधील कथांनी त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली असली, तरी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ (१९७४) या पहिल्याच कादंबरीमुळे मराठी साहित्यविश्वात एक गंभीर लेखक म्हणून मराठी वाचक त्यांना ओळखू लागले. त्यानंतर ‘बेडटाइम स्टोरी’ (१९७८), ‘कबिराचं काय करायचं’ (१९९४) ही नाटके त्यांनी लिहिली. ‘रावण अ‍ॅन्ड एडी’ (१९९५), ‘ककोल्ड’ (१९९७) आणि ‘गॉड्स लिटिल सोल्जर’ या इंग्लिश कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. २००२ मध्ये ‘द आर्सोनिस्ट’ हे संतकवी कबिराचे सर्जनशील पुनर्कल्पन त्यांनी केले. पटकथा लेखनासाठी प्रसिद्ध असणार्‍या नगरकरांनी ‘द काँपिटिशिन’ (१९९१), ‘द परफेक्ट सर्कल’ (१९९७), ‘द जी गँग’ (२००१), ‘द ट्यूलीप’ (२००२) या पटकथा लिहिल्या. रॉकेफेलर फेलोशिपचे (१९९१, २००२) ते मानकरी आहेत. ‘ककोल्ड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०००) मिळाला आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीला प्रथम लिहिलेली सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून महाराष्ट्र शासनाचा हरि नारायण आपटे पुरस्कार (१९७५) मिळाला आणि १९९६मध्ये लेखनातून सामाजिक सुसंवाद निर्माण केल्याबद्दल दालमिया पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही नगरकरांची कादंबरी मराठी कादंबरीच्या इतिहासातील अत्यंत अपारंपरिक असे लेखन म्हणता येईल. कुशंक या नायकाच्या रूपाने आपले जीवन अत्यंत नेकीने जगण्याचा प्रयत्न करणार्‍या माणसाची ही कथा आहे. असंबद्धता व मृत्यूची छाया यांना सोबत घेऊन जगताना वाट्याला येणारी वेदना कादंबरीकाराने वेगवेगळ्या लेखनतंत्रांचा उपयोग करून सादर केली आहे. या कादंबरीला रूढार्थाने कथानक नाही, मात्र तीत अनेक व्यक्तिरेखा आहेत. त्या व्यक्ती, त्यांची कुटुंबे, त्यांच्या विभिन्न जीवनसरणी यांचे व्यामिश्र दर्शन या कादंबरीतून घडते. कालक्रमभंग करून वेगवेगळे प्रसंग एकमेकांत मिसळून कादंबरीकाराने विभिन्न भावस्थितीतून उत्पन्न होणारे ताण कादंबरीच्या माध्यमातून प्रकट केले आहेत. उत्कट प्रेमातून, रतिकर्मातून व शारीर दु:खभोगातून वाट्याला येणारे जिणे किती यातनामय असते, त्याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. अतिशय गुंतागुंतीच्या घटना-प्रसंगांनी युक्त असणार्‍या, आधुनिक व उत्तराधुनिक जीवनदृष्टी व्यक्त करणार्‍या तरीही इथल्याच मातीतील अनुभवांवर इथल्याच संमिश्र भाषेत लिहिलेल्या, सर्वसामान्य वाचकाची मती गुंग करणार्‍या या कादंबरीने मध्यमवर्गीय अभिरुची व वास्तवतावादी साहित्य यांना सरावलेल्या मराठी वाचकवर्गाला मोठाच धक्का दिला. त्यामुळे या कादंबरीच्या गुणवत्तेबाबत मराठी जगतात वेगवेगळ्या उलटसुलट प्रतिक्रिया निर्माण झाल्या. 

‘बेडटाइम स्टोरी’ हे त्यांचे अप्रकाशित नाटक अस्पृश्य, आदिवासी आणि स्त्रिया यांच्या दृष्टिकोनातून महाभारताचा सर्वस्वी भिन्न अन्वयार्थ लावते. या नाटकाचा पहिला प्रयोग १९९५ मध्ये झाला. त्यानंतर अगदी मोजके प्रयोग होऊन राजकीय शक्तीच्या दबावामुळे व कायद्याच्या कटकटींमुळे ते बंद पाडले गेले. नाटकाच्या विवाद्य आशयामुळे या नाटकाची संहिता प्रकाशित होऊ शकली नाही.  ‘कबिराचं काय करायचं’ हे १९९३च्या हिंदू-मुसलमान दंगलीनंतर लिहिले गेलेले नाटक जमातवादी दंगलीचे वातावरण साकार करते. १९९५ मध्ये या नाटकाचे वाचन व सादरीकरण झाले तथापि तेही प्रकाशित झाले नाही. 

नगरकरांच्या ‘रावण अ‍ॅन्ड एडी’ या कादंबरीचा अनुवाद (१९९६) करणार्‍या रेखा सबनीस यांनी ‘ककोल्ड’ या कादंबरीचा ‘प्रतिस्पर्धी’ या नावाने २००८ साली अनुवाद केला. या अनुवादास कमल देसाई यांनी प्रस्तावना लिहून ‘ककोल्ड’ या कादंबरीच्या अंतरंग-सामर्थ्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. ‘प्रतिस्पर्धी’ या कादंबरीचे कथानक जरी सोळाव्या शतकातले असले, तरी तिचे आवाहन मात्र कालातीत आहे. त्या काळातील वास्तव जिवंत करत असतानाच मेवाडच्या राजघराण्यातील अंतर्गत कलह आणि मानसिकता यांचे नगरकरांनी केलेले चित्रण हा कादंबरीचा गाभा आहे. स्त्री-पुरुषांचे शारीरिक अथवा नैतिक संबंध, राजकीय महत्त्वाकांक्षा, हेवेदावे, युद्ध आणि जयपराजय, भक्ती व धर्म, तसेच विविध कला या सर्वांचा आपल्या जीवनाशी संबंध जोडणारी ही कादंबरी गतिमान आहे. माणसाच्या अस्तित्वाची खूण पटवणार्‍या, परवड करणार्‍या आणि माणसाला फरपटत नेणार्‍या युद्ध आणि प्रेम या क्रूर खेळाचे मिथक म्हणजे किरण नगरकर यांची ‘प्रतिस्पर्धी’ ही कादंबरी. स्वत: लेखकानेच मुलाखतीत सांगितल्यानुसार ‘प्राधान्याने इंग्रजी भाषेचाच विचारासाठी व व्यवहारासाठी उपयोग करणार्‍या, आंग्लाळलेल्या प्रार्थना समाजिस्ट घरात जन्माला आलेल्या या लेखकाची साहित्यनिर्मिती आशयदृष्ट्या व रूपदृष्ट्या  मराठीत तरी अपवादात्मक म्हणता येईल.’ इंग्लिशमध्ये लिहिणारे जे भारतीय लेखक आहेत त्यांत किरण नगरकर यांना फार वरचे स्थान दिले जाते.

साहित्य अकादमी पुरस्कार, द हिंदू लिटररी प्राईज  असे पुरस्कार नगरकर यांना प्राप्त झाले आहेत. 

- प्रा. डॉ. विलास खोले/ आर्या जोशीं

नगरकर, किरण कमलाकर