Skip to main content
x

निगवेकर, अरुण शंकर

    डॉ.अरुण शंकर निगवेकर हे शिक्षणक्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म आणि शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागामध्ये केली. पुणे विद्यापीठात डॉ. मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘क्ष’ किरणांचा वापर करून स्थायू पदार्थविषयक संशोधन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा, नवी दिल्ली, यार्क विद्यापीठ, त्याचप्रमाणे वेस्टर्न ऑन्टॅरिओ विद्यापीठ, कॅनडा येथे संशोधनाचे कार्य केले. पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी प्रगत पदार्थविज्ञान केंद्राची स्थापना केली. या विषयात संशोधन करून त्यांनी एकवीस विद्यार्थ्यांना एम.फिल. व पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्तर शोधनिबंध प्रसिद्ध केले. पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावर त्यांनी जवळजवळ आठ वर्षे काम केले. त्यांच्या कार्यकाळामध्ये भौतिकशास्त्र विभागाची अनेक अंगांनी प्रगती झाली. विद्यापीठातील अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे अनेक विभागांमध्ये योगदान करून त्यांनी उत्कर्षास हातभार लावला.

     शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात डॉ. अरुण निगवेकर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पुणे विद्यापीठात कार्यरत असतानाच त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या, त्याचप्रमाणे युनेस्कोच्या अनेक शैक्षणिक कार्यांमध्ये भरीव योगदान दिले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भौतिकशास्त्रातील अभ्यासक्रम निर्मिती प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम केले. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे केलेल्या ‘फिजिक्स एज्युकेशन’ या नियतकालिकाच्या संपादकपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. या नियतकालिकाला त्यांच्या कार्यकाळामध्ये स्थैर्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. युनेस्कोतर्फे राबविले जाणारे ‘फाउण्डेशन कोर्स इन फिजिक्स’ या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी केलेल्या कामावर आधारित पुस्तक युनेस्कोतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. डॉ. निगवेकर हे नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिएशन कौन्सिल (‘नॅक’) या विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्चक्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी स्थापन केलेल्या संस्थेचे संशोधन संचालक होते.

     डॉ. निगवेकर यांनी भारतातील व्यापक व क्लिष्ट अशा उच्चशिक्षण पद्धतीसाठी गुणवत्ता मापन करण्याची सरळ आणि सोपी पद्धत विकसित केली. ‘इंटरनॅशनल नेटवर्क फॉर क्वालिटी अ‍ॅश्युरिंग एजन्सीज इन हायर एज्युकेशन’ (आय.एन.क्यू.ए.एच.ई.) या आंतरराष्ट्रीय संस्थेने या पद्धतीवर नॅकच्या स्थापनेनंतरच्या दुसऱ्याच वर्षात मान्यता दिली. २००४ साली नॅकचा दशकपूर्ती समारंभ झाला. त्या समारंभात भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी डॉ. अरुण निगवेकर यांचा ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता चळवळीचे जनक’ (फादर ऑफ क्वालिटी मूव्हमेंट इन इंडिया) अशा उद्गारांनी गौरव केला.

     एप्रिल १९९८ ते सप्टेंबर २००० या कालावधीत डॉ.निगवेकर यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. या काळात त्यांनी विद्यापीठामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. त्याचप्रमाणे, सत्त्याऐंशीव्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यशस्विरीत्या आयोजन केले. डॉ. निगवेकर हे नऊ वर्षे विद्यापीठ अनुदान मंडळाचे (यू.जी.सी.) सदस्य होते. यु.जी.सी.च्या सदस्यकाळात त्यांनी यु.जी.सी.च्या विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव मांडला, विकेंद्रीकरण केले व गोवा आणि महाराष्ट्राकरिता विभागीय कार्यालय पुणे विद्यापीठाच्या आवारात आणले. सप्टेंबर २००० ते जुलै २००२ या काळात त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष या पदावर काम केले. त्या काळात दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उच्चशिक्षणाबाबतचे धोरण निश्चित केले.

     जुलै २००२मध्ये त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष या सर्वोच्च पदावर नेमणूक झाली. हा कार्यभार त्यांनी सप्टेंबर २००५पर्यंत सांभाळला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विद्यापीठांना जोडणारे जाळे (नेटवर्क) प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे, सोळा मिरर साईट्स तयार करण्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली. एकूण सोळा ठिकाणी संशोधनविषयक साहित्य साठवून ठेवणे शक्य झाल्यामुळे विद्यापीठाच्या संशोधनाला बळकटी आली. डॉ. अरुण निगवेकर यांनी आपल्या कार्याचा ठसा भारतातील उच्चशिक्षणावर निश्चितपणे उमटविला आहे. डॉ. अरुण निगवेकरांच्या कुलगुरुपदाच्या कालावधीत १९९९ साली पुणे विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. त्या वेळी पुणे विद्यापीठाचा इतिहास तयार करून घेतला. तसेच, ‘जीवन गौरव’ प्रथा सुरू केली.

     २००३ साली यू.जी.सी.चा सुवर्णमहोत्सव ते यू.जी.सी.चे अध्यक्ष असताना झाला. यू.जी.सी.ला नवीन बोधचिन्ह व बोधवाक्य याच काळात दिले गेले. देशातील सोळा ई.एम.आर.सी.चे त्यांनी ‘इ-लर्निंग अ‍ॅण्ड मल्टिमीडिया कन्सोर्टियम फॉर एज्युकेशन कम्युनिकेशन’ उभे केले.

    त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. त्यांमध्ये १९८४ साली विद्यापीठ अनुदान आयोगाचे ‘राष्ट्रीय व्याख्याता’ पारितोषिक, १९९१ साली ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक’ पारितोषिक, १९९३ साली ‘आस्पेन ऑनर’ पारितोषिक, १९९६ साली ‘एफ.आय.ई. फाउण्डेशन’ पारितोषिक, १९९८ साली भारतीय विद्याभवनचा ‘अ‍ॅड.डी.आर. नगरकर फाउण्डेशन’ पारितोषिक, १९९९ साली ‘स्वामी विवेकानंद’ पारितोषिक, ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स’ पारितोषिक, ‘वायस’ पारितोषिक,  आणि २००२ साली ‘दि सेंटेनरियन मॅन ऑफ द इयर’ पारितोषिक, मिळाले, तर तिलका मांझी भागलपूर विद्यापीठ, नागार्जुन विद्यापीठ, गुरू नानक देव विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांची ‘डॉक्टरेट’ ही पदवी मिळाली आहे.

     निवृत्तीनंतरही ते नवनवीन उपक्रमांत सहभागी होत आहेत. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. ह्या संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्रांचा शोध घेणे आवश्यक आहे. परंतु हे होण्यासाठी पारंपरिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण व्हायला हव्यात, हा त्यांचा विचार अ‍ॅनिमेशन, गेमिंग, ब्रॉडकास्ट मीडिया या विषयांवर तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘सीमलेस एज्युकेशन’ ही संस्था स्थापन करून त्यांनी प्रत्यक्षात आणला आहे.

     

-डॉ. पंडित विद्यासागर

निगवेकर, अरुण शंकर