नईम, ख्वाजा अब्दुल
तृणधान्याच्या संशोधनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ख्वाजा अब्दुल नईम यांचा जन्म परभणी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण परभणी येथे झाले. त्यांनी १९६८मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठातून बी.एस्सी.(कृषी) पदवी संपादन केली व १९७०मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातून तूर व हरभरा या पिकांचे रोप आनुवंशिकता आणि पैदास (जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग) या संशोधनात्मक विषयावर एम.एस्सी. (कृषी) प्रथम श्रेणीमध्ये संपादन केली. त्यांनी १९८० मध्ये ज्वारी पिकाचे रोप आनुवंशिकता आणि पैदास याबाबतचा संशोधनात्मक प्रबंध सादर करून मराठवाडा कृषी विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केली. नईम यांनी १९७० ते १९७३ या काळात उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेत शेती अधिकारी म्हणून काम पाहिले. पुढे १९७३ ते २००१ या काळात मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे शेती अधिकारी, वनस्पतिशास्त्रज्ञ, ज्वारी-उपपैदासकार, सहपैदासकार, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, साहाय्यक संचालक बीजनिर्मिती अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. ते २००२ ते २००७ या काळात नवी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं. यांच्या आधिपत्याखालील रीजनल रीसर्च स्टेशन वेलिंग्टन (निलगिरी जिल्हा) येथील केंद्राचे प्रमुख होते. तेथे त्यांनी गव्हाच्या तांबेरा प्रतिबंधक जातींची चाचणी घेऊन त्यास प्रतिबंधक जाती निर्माण करण्यासाठी मदत केली. नईम यांनी कृषी संशोधनामधून आदर्श वाणांची निर्मिती केली व यासाठी सहभागही घेतला. त्यांना ज्वारी (रब्बी), सी.एस.एच./७ व सी.एस.एच./८, मका (एकेरी) पी.एम.एच./१९, गहू अजंठा, कैलास, परभणी - ५१, जोड गहू - बुटका वाण एच.डब्ल्यू. १०९५, याशिवाय गव्हाच्या ३७ वाणांचे अनुवंश पंजीकरण करण्यात यश आले. सदर वाणांमधील तांबेरा प्रतिरोधक क्षमता असलेली जनुके त्यांनी सिद्ध केली.
डॉ. नईम यांचे ५८ संशोधनात्मक लेख, ८० तांत्रिक लेख, ८ पुस्तिका, २३ घडीपत्रिका (इंग्रजी, मराठी, तामीळ), शेतकऱ्यांसाठीचे १७५ लेख (इंग्रजी, मराठी, तामिळ व उर्दू) असे साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांनी एम.एस्सी. (कृषी)च्या १८ व पीएच.डी.च्या ५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सततच्या संशोधन कार्याच्या निमित्ताने त्यांना १९८६ मध्ये ऑस्ट्रेलिया व १९९२ मध्ये अमेरिका येथील कृषी संशोधन संस्थांना अभ्यासगट सदस्य म्हणून भेट देता आली. ते सध्या भारतामधील कृषी संशोधन संस्थांमध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच १० हून अधिक वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये फेलो व आजीव सभासद म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नईम यांना डॉ. एकबोटे पारितोषिक-१९९६, ‘मका शेतकऱ्यांसाठी वरदान’ या पुस्तिकेसाठी बळीराजा पुणेतर्फे दिला जाणारा डॉ. राहूडकर मराठी कृषी ग्रंथ पुरस्कार-१९९२, युनायटेड राइट्स असोसिएशन चेन्नई यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार, ज्वेल ऑफ इंडिया हा पुरस्कार-२००० सुवर्णपदक व जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेत.