Skip to main content
x

निमसे, त्रिंबक दादा

     त्रिंबक दादा निमसे हे सव्विसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या ‘बी’ कंपनीमध्ये कार्यरत होते. ‘बजरंग’ मोहिमेमध्ये दि.१९ मार्च १९९१ रोजी निमसे यांच्या नेतृत्वाखालील तुकडीला एक संशयित दहशतवादी पकडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ज्या घरात दहशतवादी लपले होते, त्या घरास त्यांनी वेढा घातला. ते स्वत: रांगत रांगत त्या घरापाशी गेले. दहशतवादी खिडकीतून बाहेर पळून जात असताना त्यांनी  त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले.

     त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे आसाममधील हाटी गावात आसाम युनायटेड लिबरेशनच्या लपून बसलेल्या पंचवीस दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात आली. यातही हवालदार निमसे आघाडीवर होते. या मोहिमेमध्ये दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू असताना एका दहशतवाद्याने स्वत:चा जीव वाचविण्याकरिता वाटेतील नाल्यात उडी मारली. ते पाहून निमसे यांनीही त्याच्या पाठोपाठ नाल्यात उडी मारली. दोघांमध्ये बरीच झटापट झाली; परंतु संध्याकाळची वेळ असल्याने हळूहळू अंधार वाढत गेला व काही दिसेनासे झाले. दुसर्‍या दिवशी तेथे दोघांचेही मृतदेह सापडले.

हवालदार निमसे यांच्या अतुलनीय व साहसपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले.

- रूपाली गोवंडे

निमसे, त्रिंबक दादा