Skip to main content
x

नित्यानंद, बाबा

    पूर्वाश्रमीचे रामन म्हणजेच नित्यानंद बाबा यांचा जन्म १८४५ साली झाला असे मानतात; कारण याच साली ते त्यांच्या दत्तक आई-वडिलांना एका शेतात सापडले होते. केरळ राज्यातील कोजिकोड जिल्ह्यात तुनेरी गावातील चातू नायर आणि उन्नी यांच्या शेतात त्यांनी एका पहाटेस हे अर्भक पाहिले. तेज:पुंज कांती असलेल्या त्या मुलाच्या डोक्यावर एक नागराज आपल्या फण्याची सावली धरून बसला होता. गावातील प्रतिष्ठित वकील ईश्वर अय्यंगार यांनी त्या दाम्पत्याला ते मूल वाढवण्यासाठी सुचवले. चातू आणि उन्नीला आधीच पाच मुले होती, त्यात आणखी एकाची भर पडली. त्यांनी त्याचे नाव ठेवले रामन. बाळ रामनच्या लीला आश्चर्यमुग्ध करणाऱ्या होत्या. त्यातच चातू,उन्नीला त्या मुलाच्या दैवीपणाबद्दल स्वप्नात वारंवार दृष्टान्त येऊ लागले. त्यामुळे या असामान्य मुलाला दोघांनी जिवापाड जपले.

उन्नीअम्माकडे असताना रामनला सुखंडी नावाचा पोटदुखीचा आजार जडला होता. हा रोग इतका त्रासदायक होता, की लहानग्या रामनच्या तीव्र वेदनांनी ओरडण्याचा शेजाऱ्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांनी रामनला चक्क नदीत फेकून देण्याचे ठरवले. कुणीतरी रामनला कावळा खायला देण्याविषयी सांगितले. कावळा खाल्ल्यानंतर रामन खडखडीत बरा झाला.

रामन तीन वर्षांचा झाला आणि दुष्काळाने थैमान घातले. गरिबीच्या झळांनी प्रथम चातू आणि नंतर उन्नीनेही देह ठेवला. ईश्वर अय्यंगार यांनी रामनला आपल्या ताब्यात घेतले. ईश्वर अय्यंगारांनी रामनला स्वत:च्या मुलाहूनही अधिक प्रेमाने वाढवले. रामन शाळेत जायला कंटाळा करायचा, तेव्हा अय्यंगारांनी त्याला घरीच शिकवले. रामन ते सारे शिकवलेले चटकन समजून घेई. अय्यंंगार यांच्या सोबतीने रामन भारतभर फिरला. विशेषत:, उत्तर भारतातील काशी, गया, प्रयाग; तेथील हनुमान घाट, मनकर्णिका घाटावर रामन तासन्तास बसत असे. पुढे रामन स्वत:च हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात एकटेच फिरू लागले. तेथे ध्यान-धारणा, तपाचरण करू लागले. एवढेच नव्हे, तर हिमालय यात्रा पूर्ण करून ते पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्मा, लंका, मलाया इत्यादी देशांतही भ्रमंती करून आले. कोळशाची पोती वाहणारा हमाल बनून त्यांनी प्रसंगी बोटीतील प्रवास केला. या भ्रमंती दरम्यान ईश्वर अय्यंगारांच्या इतर मुलांची विवाहादी कार्ये पार पडली. परंतु रामनला मात्र वेगळ्याच सच्चिदानंदाचे वेड लागले होते.

ईश्वर अय्यंगार जेव्हा मरणघटका मोजीत होते, त्या वेळी त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानुसार रामन घरी आले. अय्यंगारांनी ‘‘मला सूर्य दाखव,’’ म्हटल्यावर रामन यांनी दिव्यशक्तीने अय्यंगारांना प्रत्यक्ष सूर्यदर्शन घडविले. त्यावर ईश्वर यांनी ‘‘तू माझा ‘नित्यानंद’ आहेस,’’ असे बोलून कृतज्ञता व्यक्त केली आणि आपले प्राण सोडले. तेव्हापासून रामन, ‘नित्यानंद’ म्हणून ओळखले जाऊ लागले. एरव्ही लोक त्यांना ऋषी, साधू, महात्मा म्हणून संबोधत असत. शहरातील उच्चपदस्थ, अधिकारी, धनवान त्यांच्या चरणी लीन होऊ लागले.

बाबा या लोकांच्या माध्यमातून गरजूंना अन्नदान, वस्तुदान करीत. लोकांची दुखणी-खुपणी आपल्या ध्यान सामर्थ्याने बरी करून देत. बाबा कधी उंच झाडांवर चढत. तेथून व्याधिग्रस्तांना त्या विशिष्ट झाडाचे पान खायला देत. मंगळुरातच एकदा तत्कालीन योगी परमहंस शिवानंद यांच्याशी नित्यानंदांची भेट झाली होती.

दक्षिणेतील काननगड सोडून १९४५ च्या आसपास बाबा मुंबईत कुर्ला येथे आले. रात्री ते पानवाल्याच्या बंदिस्त टपरीत झोपत. सकाळी उठून एका भक्ताच्या घरी जाऊन त्याची कामे करीत. भक्ताकडून सेवा घेण्यापेक्षा भक्ताचीच सेवा करायला हवी हा बाबांचा दंडक होता. बाबा असे विचित्र वागत. कधीतरीच अंगावर संपूर्ण कपडे घालत. अन्यथा केवळ कमरेला एकच वस्त्र गुंडाळून गावभर भटकत असत.

एकदा चौपाटीवर काँग्रेसची मीटिंग होती. तेथे हा अवलिया खादीची गांधी टोपी व पँट-शर्ट घालून वावरला होता. याच दरम्यान काही काळ पुन्हा दक्षिणेत काननगड येथे घालवल्यानंतर बाबा पुन्हा मुंबईजवळील बोरीवली येथील कान्हेरी गुंफांमध्ये राहू लागले.

त्यानंतर मात्र १९४७-४८ च्या दरम्यान ते भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील अकलोली येथे कायम वास्तव्यासाठी आले. गणेशपुरीतील त्यांच्या एक तपाहून अधिक काळात त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग लोकप्रियता मिळविली. तिथल्या आदिवासीबहुल भागात सामाजिक कार्यदेखील केले. अकलोली येथील औषधी गुण असलेल्या गरम पाण्याच्या नैसर्गिक झर्याच्याभोवती बांधकाम करून नागरिकांना स्नानादी स्वच्छतेच्या दृष्टीने खुले करून दिले, विहिरी बांधल्या. तेथील शिव मंदिराजवळ वैकुंठ आश्रम, धर्मशाळा बांधली. तेथील आदिवासी आणि गरीब मुलांसाठी शाळा बांधली व ती जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केली.

जवळच्या वसई तालुक्यातील राजगोपाल भट, वकील पी.के.नायर, मोनप्पण्णा, तसेच तत्कालीन प्रसिद्ध अभिजन तेथे जाऊन आपले योगदान देत. बाबांनी अनेकांना वज्रेश्वरी, तुंगारेश्वर परिसरातील औषधी वनस्पतियुक्त जंगलात नेऊन त्यांना त्रिफळा चूर्ण, ब्राह्मी तेल आदी औषधी वस्तू बनविण्यास शिकविले. थोडक्यात, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. गणेशपुरी परिसरात भद्रकाली देवीचे मंदिर बांधले, अनुष्ठान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनसूया मंदिराचा जीर्णोद्धार केला. अन्नछत्रे सुरू केली. आदिवासींसाठी आरोग्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या. गणेशपुरीत डिझेलवर चालणारे पॉवर हाउस त्या काळी बांधले. वसईकडे जाणारा रस्ता गणेशपुरीपर्यंत वाढवून घेतला व भाविकांची सोय केली.

पुढे बाबांच्या निर्वाणानंतर हरी गोविंदराव म्हणजे भाऊसाहेब वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली ‘श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्था’ स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे आज शाळा, बालभोजनगृह चालविले जाते.

बाबांचा भक्तगण दिवसेंदिवस वाढत होता. पुरीचे श्री शंकराचार्य, श्रीमत् विश्वेश्वरतीर्थ, स्वामी चिन्मयानंद असे आध्यात्मिक क्षेत्रातील महानुभाव, तसेच निजलिंगप्पा, कन्नमवार, जत्तींसारखे राजकीय धुरीण, पं. मदनमोहन मालवीयांचे जामात डॉ. ऋषी असे दिग्गज गणेशपुरीत प्रस्थान ठेवत असत. बाबांच्या भक्तगणांची फार मोेठी संख्या परदेशात आहे. बाबांचे शिष्य चाळीसगावचे स्वामी मुक्तानंद यांनी कार्य पुढे चालविले. ‘गुरुदेव सिद्धपीठ आश्रमा’चे कामकाज पाहण्यास सुरुवात केली. बाबांनी सुरुवातीला बांधलेल्या दोन खोल्यांच्या धर्मशाळेचे ‘गुरुदेव सिद्धपीठ आश्रम’ या अत्याधुनिक ध्यान-धारणा वास्तूत रूपांतर झाले. या वास्तूत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दहा एकर भूखंडामध्ये सध्या विस्तृत म्युझियम उभे आहे. बाबांनी स्वामी मुक्तानंदांना आपल्या पादुकांच्या रूपात वारसा बहाल केला. स्वामी मुक्तानंदांनी ही आध्यात्मिक परंपरा पुढे चालू ठेवली.

समाधी घेण्यापूर्वी बाबांनी त्यांच्या एका भक्ताने बांधून दिलेल्या ‘बेंगलूरवाला’ इमारतीत वास्तव्य केले. याच काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाबांनी प्रायोपवेशन करून आपले प्राण त्यागले. ‘स्वामी झाला, ऋषी- महात्मा झाला, देव झाला; आता स्थिर समाधी’ हे बाबांनी उच्चारलेले शेवटचे वाक्य आहे.

   — संदीप राऊत

नित्यानंद, बाबा