Skip to main content
x

नॉय, जेम्स हॅरी

     भारताच्या प्रांतोप्रांतीच्या भाषांच्या आणि संस्कृतीच्या उत्थानात ज्ञानसंग्रह उभे करून क्रांती करणारे आधुनिक ज्ञानोपासक, शिकागो विद्यापीठाचे मुख्य ग्रंथपाल आणि दक्षिण आशियाई केंद्राचे प्रमुख म्हणून डॉ. जेम्स हॅरी नॉय प्रख्यात आहेत. भारताच्या चेन्नई, हैदराबाद, पुणे, लखनौ या राजधानी नगरात त्या त्या प्रांताची, भाषा-संस्कृतीची विपुल साहित्य असलेली ग्रंथालये स्वत: पदरमोडीने उभे करणारे ते एकमेव अमेरिकन पंडित होय. त्यांनी स्थापन केलेल्या ग्रंथालयातून, तामिळ-तेलगु-मराठी-हिंदी या प्रादेशिक भाषांच्या ग्रंथांचे हजारोच्या संख्येत संकलन करण्यात आले आहे.

      प्रा. जेम्स नॉय यांच्या वडिलांचे नाव हॅरी एडविन नॉय जेम्स हे विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या मॅडिसन नगरीत वास्तव्याला होते. जीन मॅरी त्यांच्या पत्नी, त्यांच्याच वयाच्या आणि पेशाने शिक्षिका होत्या.

     जेम्स नॉय यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन आक्सबर्ग महाविद्यालयामधून १९६४-६८मध्ये बी.ए. व धर्म या विषयात येल विद्यापीठातून १९६८-७०मध्ये एम.ए. पदवी मिळवली. नंतर १९७०मध्ये रोचेस्टर विद्यापीठातून हिंदी भाषेचा डिप्लोमा मिळवला. १९७०-७१मध्ये पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून ‘साउथ एशियन स्टडीज’ या विषयाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी १९७२-७४मध्ये ड्रेक्सेन विद्यापीठातून ग्रंथालय शास्त्राची पदवी मिळवली.

     १९८० पासून शिकागो विद्यापीठात ग्रंथपाल आणि साउथ एशियन स्टडीज या आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख म्हणून ते कार्य करू लागले.

     १९८१-८२ या वर्षात त्यांनी संस्कृत-हिंदी भाषांचा अभ्यास लेखन-वाचनासहित पूर्ण केला, जो पुढे पुणे विद्यापीठात त्यांना पुराणावर संशोधनात्मक काम करताना उपयोगी पडला.

     १९८२-८३ साली नॉय उपपुराणातील ‘विष्णु’ संकल्पनेवर अधिक संशोधन करण्यासाठी पुण्यात येऊन राहिले. पीवायसी ग्राऊंडजवळील एका बंगल्यात त्यांचे  सपत्नीक एक वर्ष वास्तव्य होते.

     साउथ एशियन स्टडीजच्या प्रकल्पातून भारतातील विविध प्रांतांच्या भाषांची सर्वसमावेशक ग्रंथालये निर्माण करून त्यासाठी निवडक संग्रह संकलित करून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर त्यांची जबाबदारी सोपवली. यातूनच लखनौ (हिंदी), पुणे (मराठी), हैदराबाद (तेलगू), चेन्नई (तमिळ) आदी भाषांची ज्ञानकेंद्रे भारतात उभी राहिली. गेल्या दोन-तीन वर्षांत श्रीलंका, काठमांडू (नेपाळ) येथील केंद्रेही सुरू केली. गतवर्षी लाहोर (पाकिस्तान) येथे उर्दू-पर्शियन भाषेचे केंद्र त्यांनी चालू केले.

     पुण्याच्या वास्तव्याने त्यांना शाकाहारी बनवले. त्यांचे घर म्हणजे ग्रंथालय कम् एथ्निक म्युझियमच आहे. साउथ एशियन स्टडीजच्या निमित्ताने इंग्लंड, रशिया, जपान, अमेरिकेचे विविध प्रांत आणि दक्षिण आशियाई देशातून जमवलेला वस्तुसंग्रह एखाद्या म्युझियमएवढा समृद्ध आहे.

    जगभरातल्या अनेक शोध प्रकल्पात प्रा. नॉय यांचे मोठे योगदान आहे — मग मुंबईतील संस्कृत पदव्युत्तर अभ्यासकेंद्र असो, पुण्यातील दाते सूची असो की मराठी भाषा-संस्कृती केंद्र असो, त्यावर छाप मात्र प्रा. नॉय यांच्या कार्य कर्तृत्वाचीच!

    प्रा. नॉय यांनी लिहिलेले काही ग्रंथ : ‘सेक्रेड कोरल म्युझिक इन प्रिंट’ (१९७४), ‘सेक्युलर कोरल म्युझिक इन प्रिंट्स’ (फिलाडेल्फिया/१९७४), ‘लायब्ररी ऑटोमेशन इन स्मॉल कॉलेजेस’ (१९७६).

वा. . मंजूळ

नॉय, जेम्स हॅरी