Skip to main content
x

नरके, अरुण दत्तात्रेय

रुण दत्तात्रेय नरके यांचा जन्म कोल्हापूर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सुमन होते. त्यांच्या वडिलांनी शेती करतानाच कोल्हापूर येथे कुणबी-कासारी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यामुळे अरुण नरके यांना सहकाराचे प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळाले. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथेच झाले. त्यांनी 1966 मध्ये बी. एस्सी.  (कृषी)ची पुणे विद्यापीठाची पदवी मिळवली; तर 1970 मध्ये एम. एस्सी. (कृषी)ची पदवी पुणे विद्यापीठातून प्राप्त केली.

नरके यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर या आपल्या जन्मगावीच शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचा पर्याय निवडला. नरके यांनी 1972 मध्ये युथ डेव्हलपमेंट को-ऑप. बँकेची स्थापना केली व या बँकेचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी 1977-1978 मध्ये कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघाची (गोकुळ) स्थापना केली. तेव्हा महाराष्ट्र शासनाने या संघाच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती केली. ते 1990 ते 2000 या दहा वर्षांच्या काळात सदर संघाचे अध्यक्ष होते. त्यांची 1978 मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर निवड झाली. त्यांनी या बँकेचे संचालकपद सलग 20 वर्षे सांभाळले.

तसेच त्यांनी दूध संघाचे संचालक म्हणून सलग 25 वर्षे काम पाहिले. त्यांनी 1987 मध्ये यशवंत तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना केली.

सहकार क्षेत्रात पदार्पण करताना नरके यांनी वडील दत्तात्रेय व मामा यशवंत पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता; तसेच त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्या विचारसरणीचाही प्रभाव होता.

नरके यांनी सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल 1970 मध्ये त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते 12 आंतरराष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार देण्यात आले. तसेच ते दुग्ध व्यवसायात सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या डॉ. कोरिअन पुरस्काराचेही मानकरी ठरले.

नरके यांनी ‘इंडियन डेअरी असोसिएशन, दिल्ली’ या संस्थेचे संचालकपद सलग 18 वर्षे समर्थपणे सांभाळले. त्यानंतर ते या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून 5 वर्षे कार्यरत होते. भारतातील राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळातर्फे त्यांची जागतिक दुग्धव्यवसाय परिषदेसाठी दोन वेळा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. पहिल्या परिषदेच्या वेळेस ते ब्रुसेल्स येथे गेले; तर दुसरी परिषद दिल्ली येथे भरली होती. नरके यांना 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार देण्यात आला. ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार्‍या कोल्हापूर पुरस्काराचेही मानकरी ठरले. तसेच त्यांना फाय फाउण्डेेशन पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले.

नरके यांनी सहकारविषयक अनेक कार्यशाळा व परिषदांसाठी परदेश दौरेही केले. त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड, इस्त्राएल, सिंगापूर, बँकॉक-फ्रान्स, हाँगकाँग या देशांना भेटी दिल्या.

नरके यांना संदीप व चेतन असे दोन पुत्र आहेत. संदीप हे महाराष्ट्र स्टेट को-ओप. मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत, तर चेतन हे ‘मार्स’ या बहुराष्ट्रीय चॉकलेट कंपनीत कार्यरत आहेत.

- अर्चना कुडतरकर

नरके, अरुण दत्तात्रेय