Skip to main content
x

गोखले, शोभना लक्ष्मण

       शोभना गोखले यांचा जन्म सांगली येथे झाला व त्यांचे शिक्षण अमरावती येथे झाले. विवाहानंतर त्यांनी डेक्कन महाविद्यालयामधून प्रथम प्राचीन इतिहास व पुरातत्त्व या विषयात एम.ए. व १९६० मध्ये डॉक्टरेट या पदव्या संपादन केल्या. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा विषय मध्य प्रदेशातील सांस्कृतिक व ऐतिहासिक भूगोल असा होता. प्रबंध पूर्ण होताच डेक्कन महाविद्यालयात त्या १९६०मध्येच व्याख्याता या पदावर रुजू झाल्या व तेथूनच १९८८ मध्ये निवृत्त झाल्या. या काळात त्यांनी पुराभिलेखविद्या (Epigraphy) व नाणकशास्त्र ( Numismatics) या दोन क्षेत्रांत संशोधनाचे व अध्यापनाचे कार्य केले.

शोभना गोखले यांनी १९६० ते १९६८ या काळात प्रथम विदर्भात व नंतर गुजरातमध्ये अभिलेखांवर संशोधन केले. या दरम्यान त्यांनी वाकाटक, क्षत्रप व अभीर यांच्या इतिहासांमध्ये मोलाची भर घातली. कोकणातील ताम्रपटांचे विस्तृत अध्ययन (१९६८-१९७२) केल्यानंतर त्यांनी १९७२ ते १९७६ या काळात मराठवाड्यात काम करून राष्ट्रकूट राजवंशासंबंधी अभिलेखीय संशोधन केले. तसेच त्यांनी पंढरपूर येथील शिलालेखांचे संपादन केले.

शोभना गोखले यांचे इतिहास व पुरातत्त्व यांतील सर्वांत महत्त्वाचे कार्य पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यांनी १९७६ पासून सातत्याने कान्हेरी, जुन्नर, नाशिक व इतर ठिकाणी केलेल्या अभिलेखीय संशोधनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध धर्माच्या इतिहासाविषयी मोलाची माहिती प्रकाशात आली. तसेच सातवाहन राजवंशाच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर पडली.

क्षत्रप राजवंशाच्या नाणेनिधीच्या एका  (Coin Hoard) अभ्यासाने शोभना गोखले यांच्या नाणकशास्त्रातील संशोधनाला १९७४मध्ये सुरुवात झाली. त्यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वी कलचुरी, क्षत्रप व सातवाहन या राजवंशाच्या नाण्यांचा अभ्यास करून अनेक शोधनिबंध प्रकाशित केले.

सेवानिवृत्त झाल्यानंतरही शोभना गोखले कार्यरत होत्या. त्यांनी पुणे येथील भारत संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या रॉयल न्युमिस्मॅटिक्स सोसायटीच्या फेलो होत्या. पुराभिलेखविद्या आणि नाणकशास्त्र या दोन क्षेत्रांत शोभना गोखले यांना बिडुल्फ पदक (१९८५) व परमेश्वरीलाल पदक (२००६) असे मान-सन्मान मिळाले आहेत.

  डॉ. प्रमोद जोगळेकर

गोखले, शोभना लक्ष्मण