Skip to main content
x

जोशी, सुरेश दामोदर

     अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक संग्रहालयाची स्थापना, उभारणी व त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक मानचित्रात मानाचे स्थान देण्यात ज्यांनी आपल्या आयुष्याची परिपूर्ती मानली, त्या सुरेश दामोदर जोशी यांचा जन्म नगर जिल्ह्यातील बांबारी या गावी झाला. श्री. द.वि. केतकर या त्यांच्या शालेय मुख्याध्यापकांनी लिहिलेले ‘इतिहासातील अंतःप्रवाह’ हे पुस्तक वाचून श्री. जोशींचे अंतःकरण उचंबळले आणि ‘इतिहास’ या शब्दाच्या व्याप्तीची त्यांना शालेय जीवनातच जाणीव झाली. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांना महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांसारख्या इतिहास संशोधकाचे साहचर्य व मार्गदर्शनही लाभले. शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे, नाणी, ऐतिहासिक कागदपत्रे जमवीत असताना ते अनेक इतिहास अभ्यासकांच्या संपर्कात आले.

     अहमदनगर महाविद्यालयातील १९५५ ते १९५९ या शिक्षणकाळात सुरेश जोशींच्या नगर शहरातील ओळखी वाढत गेल्या. त्या वेळी महाविद्यालयाचेे कार्यालयीन अधिक्षक प्रा. प्रमोद गद्रे यांनी डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रा.  ह.ध. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कल्चरल हिस्टरी ऑफ अहमदनगर’ हा संशोधन प्रकल्प लिहिला. त्या कामी जोशी यांनी प्रा. गद्रे यांना सहकार्य केले. नगरच्या या वास्तव्यात जोशी अनेक लोकांच्या संपर्कात आले. त्यामध्ये बाबासाहेब मिरीकर, सदाशिव निसळ, मुन्शी उम्मीद साहेब वगैरेंशी त्यांचा परिचय झाला व ते इतिहास संशोधनात रस घेऊ लागले.

     सुरेश जोशींच्या जीवनाला कलाटणी देणार्‍या दोन घटना सन १९६० साली घडून आल्या. पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब मिरीकरांच्या प्रयत्नांमुळे १ मे १९६० रोजी नगरपालिकेचा एक विभाग म्हणून ऐतिहासिक जिल्हा संग्रहालयाची स्थापना झाली. या संग्रहालयाच्या स्थापनेपासूनच जोशी हे त्याच्याशी संबंधित झाले. आपल्या जीवनाची इतिश्री (सन २०१२) होईपर्यंत ते या संस्थेशी इतके एकरूप झाले की ऐतिहासिक जिल्हा संग्रहालय व जोशी या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जाऊ लागल्या. दुसरी घटना म्हणजे जुलै १९६० ला जोशी हे पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. डॉ. सांकलिया, डॉ.शां.भा. देव, डॉ. शोभना गोखले, डॉ. अन्सारी यांच्याबरोबर त्यांनी नेवासे, आहाड आदी ठिकाणच्या उत्खननांत भाग घेतला. १९६२ मध्ये ते पुरातत्त्वशास्त्रात एम.ए. झाले. त्याच दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख व पुरातत्त्व विभागात डॉ.पी.एम. जोशी यांच्यामुळे ते ‘एक्सप्लोरेशन असिस्टंट’ या पदावर नोकरीला लागले. या फिरतीच्या नोकरीत त्यांना नगर जिल्ह्यातील संरक्षित ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन सर्वेक्षण करावे लागे. पुढे दोन- तीन वर्षांनी डॉ. पु.म. जोशी निवृत्त झाल्यानंतर डॉ. मोरेश्वर गंगाधर दीक्षित यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत सध्या अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक संग्रहालयात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाच्या चित्रावरून मतभेद होऊन जोशींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अस्थिरतेचा काळ पुन्हा सुरू झाला. पुढे (१९८३) पुण्याच्या राजा केळकर संग्रहालयातील क्युरेटर पदावर त्यांची नेमणूक झाली. परंतु तिथेही त्यांचे मन रमेना. जीवनाच्या सुरुवातीला ज्या संस्थेच्या कार्यामध्ये त्यांनी आपले स्वत्व शोधले होते, त्या अहमदनगर जिल्हा संग्रहालयाच्या उभारणीमध्येच ते पुन्हा रममाण झाले.

     बाबासाहेब मिरीकरांच्या प्रयत्नांमुळे १९६२मध्ये कलेक्टर बंगल्याच्या आवारातील जागा अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक संग्रहालयासाठी मिळाली. बाबासाहेब मिरीकर हे या संग्रहालयाचे पहिले कार्यकारी विश्वस्त झाले. बाबासाहेब मिरीकरांना    श्री. जोशींच्या ‘तात्त्विक’ स्वभावाची चांगलीच कल्पना होती. शासकीय नोकरीतून बाहेर पडलेल्या जोशींचे कोणाशीही पटणे अवघड आहे, त्यांनी बाहेर कोठेही काम करू नये म्हणून बाबासाहेब मिरीकरांनी जोशींना संग्रहालयात क्युरेटर या पदावर नेमले. तेथे त्यांनी विविध उपक्रम, सभा-संमेलने, वस्तूंचे संकलन व  संशोधन केले. १९६८ ते १९९० या काळात सध्या अस्तित्वात असलेली संग्रहालयाची इमारत उभी राहिली. जोशींनी इतिहास परिषदेचे अधिवेशनही घेतले. त्यांनी सुरू केलेल्या डॉ. जिन्सिवाले व्याख्यानमाला व पंडित वासुदेवशास्त्री व्याख्यानमाला नगरकरांमध्ये लोकप्रिय झाल्या. त्यामध्ये द.वा. पोतदार, प्रा. न.र. फाटक, सेतूमाधवराव पगडी, बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारखे नावाजलेले अभ्यासू वक्ते येऊन गेले. मिरीचे ऐतिहासिक दर्शन, निजामशाहीची राजधानी अहमदनगर, निवृत्ति-मुक्ताई संवादरूप ‘ज्ञानबोध’ इत्यादी ऐतिहासिक विषयांवरील पुस्तके त्यांनी लिहिली. गावोगावी जाऊन, लोकांकडून ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू, शस्त्रे व कागदपत्रे संग्रहालयासाठी मिळविण्यात त्यांचा हातखंडा होता. या ऐतिहासिक साधनांचे संशोधन तर त्यांनी केलेच परंतु, सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी जागृती व्हावी यासाठी वृत्तपत्रे आणि मासिके यांमधून लेखनही केले. त्यातूनच त्यांची दोन पुस्तके इतिशोध व शोधपर्व (अप्रसिद्ध) तयार झाली. पुणतांबा येथील हस्तलिखित संग्रह, नगर जिल्ह्यातील, पळशी येथील होळकरांचे दिवाण पळशीकर यांचा कागदपत्र संग्रह, डुबेर, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील थोरल्या बाजीरावांच्या आजोळचा म्हणजेच बर्वे यांचा कागदपत्र संग्रह, भांबोरकर- भोसले संग्रह, कडेकर देशमुखांकडील जन्मपत्रिका, लक्ष्मणराव पोतदारांकडील छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाचे चित्र, रतनगडचे किल्लेदार असलेल्या टाकळकर घराण्यातील १२० रंगीत चित्रांचा संग्रह, वेल्हाळे, ता. संगमनेर येथील यादव सामंत वेसुराज यांचा ताम्रपट तसेच यादव सम्राट भिल्लम, दुसरा यांचा ताम्रपट, राष्ट्रकूट सम्राट गोविंद चतुर्थ याचा सांगली ताम्रपट अशा शेकडो वस्तू व कागदपत्रे त्यांनी संग्रहालयासाठी गोळा केल्या. इतिहास संशोधनाच्या प्रसिद्धीसाठी संग्रहालयातर्फे ‘इतिहास संशोधन प्रदीप’ नावाचे त्रैमासिकही सुरू केले होते. अशा या अवलिया इतिहास संशोधकाचे वृद्धापकाळाने निधन झाले. ‘अहमदनगर जिल्हा ऐेतिहासिक संग्रहालय’ या संस्थेच्या रूपाने सुरेश जोशींचे स्मरण आपणास सदैव राहील.

            — डॉ. गिरीश मांडके

जोशी, सुरेश दामोदर