Skip to main content
x

कौंडिण्य, मधुसूदन विष्णू

     प्रा.मधुसूदन कौंडिण्य ह्यांचा जन्म एका वेदशास्त्रपारंगत घराण्यात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठामधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम. ए. केले. राष्ट्रभाषा कोविद परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. शिक्षण घेत असतानाच गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ते नोकरी करीत होते. धनंजयराव गाडगीळ, प्रा. वि.म. दांडेकर ह्यांच्या सहवासात त्यांची वैचारिक जडणघडण होत गेली. कौंडिण्य यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर ते वनवासींच्या सहवासात पन्नास दिवस राहिले. ह्या काळात मिळालेल्या अनुभवातून त्यांना स्वत:च्या भावी जीवनाची दिशा मिळाली.

     नंतरच्या काळात अहमदनगर महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले व विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचे नाव झाले. १९६१ मध्ये संगमनेरच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अनेक शैक्षणिक प्रकल्प प्रत्यक्षात आणून त्यांनी संगमनेर महाविद्यालय नावारूपास आणले. त्यांची आणि गोदूताई परुळेकर ह्यांची भेट झाली. गोदूताई परूळेकरांच्या कार्याने भारावून जाऊन त्यांनी महाविद्यालयामध्ये ‘ग्रामीण विकास केंद्रा’ची स्थापना केली. शिक्षण व ग्रामीण भाग ह्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला. फाऊंडेशन कोर्सेस, कन्व्हेशनल कोर्सेस, अ‍ॅप्लाइड वर्क व प्रोजेक्ट वर्क अशा अभ्यासक्रमांचे शिक्षण सुरू केले. शिक्षण क्षेत्रास साचेबंद चौकटीतून काढून प्रवाही करण्याची प्रक्रिया यांतून त्यांनी सुरू केली. वास्तवाची जाणीव निर्माण करणारे नव्या शिक्षण प्रयोगांचे केंद्र म्हणून संगमनेर महाविद्यालय ओळखले जाऊ लागले.

     केंद्र सरकारने डॉ. यशपाल ह्यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या पंचवार्षिक योजनेसाठी महत्त्वपूर्ण सूचना मागविण्यासाठी समिती नेमली होती. ह्या समितीत उच्च व प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात कौंडिण्य यांचा समावेश करण्यात आला. दिल्लीत ज्येष्ठ विचारवंत नानाजी देशमुखांशी त्यांची भेट झाली. चित्रकूट येथे नानाजी देशमुखांनी वनवासी क्षेत्रात चालू केलेले कार्य त्यांनी पाहिले. संस्थेच्या वतीने ‘मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठा’ची त्यांनी स्थापना केली. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे ह्यांनी संस्थेस बारा लाख रुपयांची देणगी दिली. 

     ‘मुक्तांगण’च्या स्थापनेमुळे ‘गाव हीच प्रयोगशाळा’ (व्हिलेज लॅबोरेटरी) ही संकल्पना प्रत्यक्षात आली. परिसरातील खेड्यांना स्वावलंबी करणारी ही संस्था म्हणजे महात्मा गांधी, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे मूर्त रूप होते. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी छपाईकाम, धातु जोडकाम, छायाचित्रण, संगणक, शेती, वनीकरण, योगविद्या, ग्रंथालय अशा विद्याशाखांतील शिक्षणाची सोय केली.

     येथील विद्यार्थी ‘कमवा व शिका’ या तत्त्वानुसार संस्थेच्या शेतांमध्ये काम करून पैसा मिळवितात. शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात न जाता खेड्यात जातात व स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात. या योजनेत त्यांनी रामोशी, पारधी समाजातील मुलांनाही सहभागी करून घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधला जातो. प्राध्यापकांच्या मनात सामाजिक बांधिलकीची बीजे रुजतात. या प्रयोगामुळे समाजात एक अर्थपूर्ण संदेश पोहोचला.

     विधवा व परित्यक्तांसाठी महाविद्यालयाच्या आवारात ‘चैतन्य मुद्रणालय’ काढले. संगमनेर तालुक्यात प्रौढ शिक्षणाची चाळीस केंद्रे या योजनेच्या माध्यमातून चालवली जात आहेत. ‘गाव तेथे ग्रंथालय’ प्रत्यक्षात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्राहक संस्था आहेत. ह्या सर्व प्रकल्पांच्या यशस्वितेचे श्रेय कौंडिण्य यांचे आहे. ह्या सर्व अनुभवांचे शब्दांकन त्यांनी ‘संघर्षाकडून सामंजस्याकडे’ ह्या आत्मचरित्रात केले आहे. महाविद्यालय दर्शन, व्यक्तिदर्शन, तालुकादर्शन, व्यवसायदर्शन ह्या उपक्रमांतून ‘दर्शन’ ह्या ग्रंथाची निर्मिती झाली. प्लेटो, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी ह्या विचारवंतांच्या शिक्षणविषयक विचारांचा अभ्यास करून त्यांनी  शिक्षणविषयक विपुल लेखन केले आहे. 

     पुणे विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य, शालान्त परीक्षा मंडळ सदस्य, पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता, कुसुमाग्रज प्रतिष्ठान व भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान यांचे विश्वस्त, धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठानचे प्रवर्तक म्हणून त्यांचे बहुमोल काम आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जी. डी. पारीख पुरस्कार, एस. व्ही. कोगेकर पारितोषिक, इंडियन मर्चंट चेंबर्स पारितोषिक, चतुरंग प्रतिष्ठान जीवन गौरव पुरस्कार अशा प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या पुरस्कारांनी मधुसूदन कौंडिण्य यांचा गौरव झाला आहे.

     सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. पुण्यात त्यांनी ‘अथश्री ग्रामीण विकास केंद्रा’ची स्थापना केली आहे. ह्या केंद्राच्या वतीने विविध विधायक प्रकल्प सुरू आहेत. असे एक कृतिशील शिक्षणतज्ज्ञ म्हणून कौंडिण्य यांचे रचनात्मक कार्य चालू आहे.

- ह. शं. भदे

कौंडिण्य, मधुसूदन विष्णू