Skip to main content
x

गलगलीकर, विठ्ठल दिगंबर

            विठ्ठल दिगंबर गलगलीकर यांचा जन्म यवतमाळ येथे झाला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी १९५२मध्ये बी.एस्सी. (कृषी), १९५५ मध्ये एलएल.बी. आणि १९६०मध्ये अर्थशास्त्रातील एम.ए. या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांनी १९७४मध्ये एम. एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यांनी १९८०मध्ये डॉ. पं.दे.कृ.वि.तून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यांनी डॉ. पं.दे.कृ.वि.मध्ये विविध पदे भूषवली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक एम.एस्सी. (कृषी) व पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन केले. त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासिकांमधून संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात विदर्भातील सिंचन प्रकल्पाचा सामाजिक व आर्थिक अभ्यास पूर्ण केला.

           डॉ. गलगलीकर यांना ‘एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन, टोकियो-जपान’ या संस्थेच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली होती. आशिया खंडातील देशांच्या कृषी उत्पादकतेची वाढ मोजणे आणि त्याचे विश्‍लेषण करणे, यासाठी १९८४मध्ये एका आठवड्याचे चर्चासत्र या संस्थेने जपानमध्ये आयोजित केले होते. या चर्चासत्रात डॉ. गलगलीकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९४९ ते १९८१-८२ या कालखंडात भारतीय शेतीतील उत्पादन व उत्पादकता वाढ यांचा आढावा घेणारा विस्तृत अहवाल सादर केला. ‘एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन, टोकियो-जपान’ या संस्थेने हा अहवाल त्यांच्याकडील पुस्तकामध्ये प्रकाशित केला. त्यांनी १९८९मध्ये कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख या पदावरून सेवानिवृत्ती पत्करली. नागपूर येथे त्यांचे निधन झाले.

           -  प्रा. पद्माकर दत्तात्रय वांगीकर

गलगलीकर, विठ्ठल दिगंबर