Skip to main content
x

कोल्हटकर, गोविंद महादेव

         स्वातंत्र्यपूर्व मुंबई इलाख्याला यथार्थदर्शी (अकॅडमिक) शिल्पकलेची समृद्ध परंपरा आहे. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतून अनेक तोलामोलाचे शिल्पकार निर्माण झाले. बडोद्याचे गोविंद महादेव कोल्हटकर हे त्यांपैकीच एक होत. जे.जे.स्कूलच्याच धर्तीवर, परंतु मुख्यत्वे कलेच्या तांत्रिक अंगांवर जास्त भर देणारी ‘कलाभवन’ नामक एक संस्था श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या प्रोत्साहनाखाली चालत असे. (चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी छायांकनाचे धडे येथेच गिरवले.) गोविंदरावांचे वडील महादेव काशिनाथ कोल्हटकर हेही एक सिद्धहस्त शिल्पकार होते आणि ते या कलाभवनात काही काळ अध्यापन करीत असत. नंतर त्यांनी पश्‍चिम भारतात नावाजलेला ‘कोल्हटकर आर्ट स्टूडिओ’ चालू केला. त्यांनी शिल्पकलेचे प्राथमिक धडे वडिलांच्या हाताखाली घेतले आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी जे.जे.मध्ये प्रवेश घेतला. जे.जे. स्कूलमधील प्रशिक्षणामुळे त्यांच्या कामाला अधिक प्रगल्भता आली. व्यक्तिचित्रणातील विशेष कौशल्यामुळे त्यांच्याकडे अनेक संस्थांची रीघ लागू लागली.

         प्रभासपाटणमधील सोरठी सोमनाथ मंदिरासमोरील सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, अकोला शहरातील शिवछत्रपतींची प्रतिमा, कलकत्त्यातील (कोलकाता) लोकमान्यांचे लक्षवेधी शिल्प आणि संसदेच्या प्रांगणातील लाला लजपतराय यांचे विराटकाय शिल्प ही त्यांची काही महत्त्वाची कामे. त्यांची इतर अनेक शिल्पे भारतभर सार्वजनिक स्थळांना भूषवीत आहेत.

         सर्जनात्मक शिल्पाकृतींची आत्यंतिक ओढ असूनही ‘कमिशन्ड वर्क’च्या ओझ्यामुळे त्या क्षेत्रात मनसोक्त काम करता न आल्याची खंत ते वारंवार बोलून दाखवीत. पण त्यांची सौंदर्यदृष्टी आणि तंत्रावरील हुकमत पाहता, त्याही क्षेत्रात त्यांनी असामान्य काम केले असते याची खात्री वाटते. त्यांच्या शिल्पक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन गुजरात राज्य ललित कला अकादमीने १९८६ मध्ये त्यांचा सन्मान करून त्यांना मानपत्र अर्पण केले.

- दीपक कन्नल

कोल्हटकर, गोविंद महादेव