पाडेकर, दत्तात्रेय तबाजी
विविध माध्यमांमध्ये सारख्याच सफाईने काम करणारे, उपयोजित आणि अभिजात कलेत आपली विशिष्ट शैली निर्माण करणारे चित्रकार दत्तात्रेय तबाजी पाडेकरांचा जन्म पुण्याजवळील आळे येथे झाला. आईचे नाव विठाबाई. वडील गुजरातेत बिलिमोरिया इथे नोकरीला असल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण गुजरातला झाले. शेतकरी कुुटुंबामधला जन्म आणि शाळेत झालेले चित्रकलेचे संस्कार यांनी पाडेकरांचे भावविश्व घडले. त्याचे पडसाद त्यांच्या तैलचित्रांमधून उमटलेले दिसतात.
पाडेकरांनी १९६८ मध्ये मुंबईच्या सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये उपयोजित कला विभागात प्रवेश घेतला व १९७२ मध्ये कमर्शिअल आर्ट मधील पदविका त्यांनी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आर्ट मास्टर आणि अभिजात कलेमधील पदविका (फाइन आटर्स डिप्लोमा) पाडेकर यांनी गुजरातमधून मिळवली.
वयाच्या बाविसाव्या वर्षी १९७२ मध्ये सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट येथे ते सह-अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. विविध माध्यमे हाताळण्यात त्यांनी मिळवलेले प्रावीण्य आणि त्याला असलेली प्रयोगशीलतेची जोड यांमुळे त्यांचे कलाजगतात नाव झाले. विविध स्पर्धा, महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शने यांमध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. त्यात ‘कॅग’ या उपयोजित व्यावसायिक कलासंघटनेच्या, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पारितोषिकांचा समावेश आहे.
त्यांनी १९७७ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कलाविभागात चित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात वृत्तपत्रे रोटरी, पण अक्षरमुद्रण (लेटरप्रेस) पद्धतीनेच छापली जात असत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रविवार आवृत्तीसाठी त्यांनी चित्रे काढायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच ‘कथाचित्रकार’ (इलस्ट्रेटर) म्हणून त्यांची स्वत:ची शैली विकसित झाली. ह्या शैलीचे वैशिष्ट्य असे होते, की मुद्रणतंत्र, वापरला जाणारा कागद, काळ्या रंगाचाच वापर ह्या सर्व मर्यादांचा कलात्मक वापर त्यांनी आपल्या रेखाटनांमधून केला. उदाहरणार्थ, स्क्रीनच्या पॅटर्नचा पाडेकरांनी कधी पार्श्वभूमी म्हणून, तर कधी चित्राचा भाग म्हणून अलंकरणात्मक वापर केला. कधी त्यातून निर्माण होणारा पोत आशय सूचित करण्यासाठी वापरला, तर वृत्तपत्र-कागदावर शाई पसरते, त्याचाच उपयोग करून टिंबाटिंबांनी युक्त रेषा शैली म्हणून वापरली.
पाडेकरांनी आपल्या कल्पकतेने मराठी वृत्तपत्रांच्या कथाचित्रांना आणि दृश्य मांडणीला एक वेगळा दर्जा दिला. ‘टाइम्स’ सोडल्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे नव्वदच्या दशकात पाडेकरांनी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रासाठी याच प्रकारचे काम केले. इथेही त्यांनी रंगीत चित्रांबरोबर सुलेखनशैलीचा शीर्षकांसाठी वापर करून आशयानुरूप अक्षररचनेचा एक यशस्वी प्रयोग केला.
पाडेकरांनी १९८५ पासून उपयोजित चित्रकार म्हणून स्वतंत्रपणे कामे करण्यास सुरुवात केली. त्यांनी जाहिराती, दिनदर्शिका, हाउस जर्नल, बोधचिन्हे, पुस्तकांची मुखपृष्ठे अशी विविध प्रकारची कामे केली. जाळीमुद्रण (स्क्रीन प्रिंटिंग) सारख्या मुद्रणतंत्रांचा वापर, रेखांकन आणि सुलेखन यांचे आशयाच्या मागणीनुसार नेमके उपयोजन यांमुळे इथेही पाडेकरांनी आपला वेगळा ठसा उमटवला.
कथाचित्रे (इलस्ट्रेशन) आणि सुलेखन (कॅलिग्रफी) या दोन्ही माध्यमांवर सारखीच हुकमत असणारे चित्रकार मराठीत अपवादानेच आहेत. पाडेकर हे त्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात शैलीदार, लोकप्रिय चित्रकारांची दलाल, मुळगावकरांपासून एक परंपरा आहे. रवी परांजपे आणि दत्तात्रेय पाडेकर या परंपरेत बसतात. सौष्ठवपूर्ण रेखांकन, लयबद्ध चित्ररचना आणि वास्तवाचे शैलीनिष्ठ चित्रांकन (स्टायलाइज्ड इलस्ट्रेशन) ही पाडेकरांच्या कथाचित्रांची वैशिष्ट्ये होत, तर वाचनसुलभतेला बाधा न आणता वापरलेली अक्षररचना ही त्यांच्या सुलेखनशैलीची वैशिष्ट्ये होत.
र.कृ.जोशी यांनी जुन्या हस्तलिखितांमधील सुलेखनशैली पुनरुज्जीवित केली आणि उपयोजित कलेत तिचा योग्य वापर केला. पाडेकर यांचे सुलेखनातले प्रयोगही असेच रचनेतले सौंदर्य जपणारे आहेत. पाडेकरांच्या चित्र आणि सुलेखनशैलीचे अनुकरण नंतर अनेकांनी केले.
दत्तात्रेय पाडेकरांचा मूळचा पिंड अभिजात चित्रकाराचा होता. व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे ते विद्यार्थिदशेत असल्यापासून करीत होते. प्रकाशन आणि जाहिरातकलेतील यशस्वी कारकिर्दीनंतर एका टप्प्यावर त्यांनी अभिजात चित्रकलेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि ते सर्वार्थाने रंगचित्रकलेकडे (पेंटिंगकडे) वळले. त्यांनी १९८१ मध्ये निसर्गचित्रांचे पहिले प्रदर्शन भरवले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रदर्शने होत राहिली. त्यांचे २००४ मध्ये लंडन येथे प्रदर्शन झाले.
पाडेकर यांनी विविध विषय आणि माध्यमे हाताळली आहेत. त्यांची चित्रे निसर्ग आणि मानवाकृतिप्रधान राहिली आहेत. उत्कीर्णन, लाइनो आणि वुडकट अशा पद्धतींनी त्यांनी केलेली मुद्राचित्रेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
‘स्लीपिंग ब्यूटी’, ‘फ्लॉवरिंग पाथ’, ‘द्वंद्व’, ‘आठवड्याचा बाजार’ या त्यांच्या प्रदर्शनांच्या शीर्षकांवरून आणि चित्रांच्या मध्यवर्ती कल्पनांवरून चित्र विषयांच्या विविधतेचा प्रत्यय येतो.
पाडेकरांच्या शैलीचे नाते यथार्थवादी शैलीशी अधिक जवळचे आहे. कलेचे पारंपरिक भावबंध जपू पाहणारी एक अभिरुची समाजाच्या एका वर्गाने जोपासलेली आहे. त्याला अनुरूप अशी पाडेकरांची शैली आहे.
त्यांचा विवाह मंगल नाईक यांच्याशी १९७७ मध्ये झाला. त्याही चित्रकार आहेत. मुलगा देवदत्तही चित्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत. देवदत्त यांची चित्रे परदेशातही प्रदर्शित होत असतात.
- दीपक घारे, रंजन जोशी