Skip to main content
x

ओक, वामन दाजी

वामन दाजी ओक यांचा जन्म हेदवी येथे झाला. ते प्राचीन मराठी काव्याचे व्यासंगी अभ्यासक व संशोधक होते. १८७० साली रत्नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिकला ‘जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती’ प्रथम संपादन करण्याचा मान त्यांनी मिळवला. मुंबईच्या प्रख्यात विल्सन महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी ते गेले, परंतु आर्थिक बाबीमुळे पदवीपर्यंत पोचू शकले नाहीत. पुढे त्यांना शिक्षकाची नोकरी करण्यासाठी मध्य प्रांतात वर्‍हाड येथे जावे लागले. नागपूरच्या नॉर्मल स्कूलचे ते सुपरिटेन्डेन्ट होते. अखेरच्या काळात रायपूरच्या शाळेत ते मुख्याध्यापक पदावर होते.

इंग्रजी, मराठी, संस्कृत या तीनही भाषांतील साहित्याचे त्यांनी चौफेर वाचन केले. नागपूरचे त्यांचे स्नेही व समानधर्मी श्री. हरी माधव पंडित हे १८७५-७६ मध्ये ‘विविधज्ञानविस्तार’चे संपादक झाल्यामुळे ओकांचा लेखक या नात्याने संबंध आला. मोरोपंतांच्या काव्याविषयी निबंधमालाकार विष्णुशास्त्र्यांशी त्यांची जी चर्चा झाली, त्यावरून मराठी काव्याचे त्यांचे सूक्ष्म व साक्षेपी अध्ययन प्रकट झाले. “त्यांच्या अध्ययनाचे पद्धतशीर व तौलनिक स्वरूप होते. ही अध्ययन पद्धती ओकांनी काव्यसंग्रहाच्याद्वारे अखिल महाराष्ट्रास शिकवली.” असे नी.ब.भवाळकर म्हणतात.

‘काव्यसंग्रह’ मासिकात त्यांनी मुक्तेश्वर, वामन पंडित, मोरोपंत, अनंत, वगैरे अनेक प्राचीन मराठी कवींची कविता चिकीत्सकपणे संपादिली. अर्वाचीन मराठी कवितेतील उत्तम वेच्यांचा संग्रह ‘काव्यमाधुर्य’ (१८८४) मध्ये प्रसिद्ध केला. ‘काव्येतिहासिक संग्रह’मध्ये नागपूरकर भोसल्यांची बखर आणि इतर कागदपत्र प्रसिद्ध केले. उच्च प्रतीच्या वाङ्मयविषयक लेखांच्या प्रकाशनाबाबत विविधज्ञानविस्ताराने जो लौकिक मिळविला तो मिळवून देण्याच्या श्रेयाचे एक वाटेकरी वामनरावजी आहेत. जानेवारी १८९० पासून सुरू झालेल्या ‘काव्यसंग्रह’ मासिकाचे संपादक जनार्दन बाळाजी मोडक काही महिन्यांतच निवर्तले. त्यामुळे निर्णयसागर छापखान्याच्या मालकांनी मासिकाची जबाबदारी ओक यांच्यावर निश्चिंतपणे सोपविली. ओकांनी सात वर्षे संपादन कार्य करून १८९१पासून त्यांनी आनंदतनय, अमृतराय, मुक्तेश्वर, अनंत, वामन पंडित, मोरोपंत, विठ्ठल, देवनाथ  महाराज व अनेक कविकृत कविता साहित्यशास्त्र विषयक व अवांतर माहितीच्या टीपा देऊन संपादित केली. त्यांनी प्राचीन मराठी कवितेचे मौल्यवान भांडार सहज उपलब्ध करून दिले. वामनराव स्वत: कवी व इतिहास संशोधकही होते.

सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) यांच्यावर १८८० मध्ये ‘गणपति निधन विलाप’ व १८८३ मध्ये ‘मन्माधव नृपतिनिधन’ अशी दोन विलाप-काव्ये लिहिली. ‘काव्यरत्नावलि’ या काव्यविषयक मासिकाच्या परीक्षक मंडळात ओक होते.

१८८४ ते १८८९ या काळात त्यांनी ‘लॉर्ड बेकन’, ‘बाबा नानक’ ही चरित्रे, व कादंबरी-‘मुद्राराक्षस-वासवदत्ता: कथासार’ ही छोटी-छोटी पुस्तकेही प्रसिद्ध केली. ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजन’ हा त्यांचा प्रदीर्घ लेख विविधज्ञानविस्तारच्या मार्च १८९८च्या अंकात प्रसिद्ध झाला. मराठी वाङ्मयाची त्यांची बहुविध सेवा ही मोलाची व चिरस्मरणीय आहे. वामन दाजी ओकांच्याच हेदवी गावी त्यांच्यापूर्वी ५ वर्षे जन्मलेले विनायक कोंडदेव ओक आपल्या ‘बालबोध’ मासिकात वामनरावांचे कर्तृत्व पुढीलप्रमाणे शब्दबद्ध करतात-

 ‘वामनरावांपुढे मराठी भाषा अगदी हात जोडून उभी होती. मनातला कोणताही अर्थ अगदी बरोबर रीतीने व्यक्त करण्यास त्यांस मुळीच प्रयास पडत नसत. असें असून भाषा शुद्ध, सरळ, गोड, रसाळ आणि मोठी भारदस्त अशी असे. त्यातही पुस्तक परीक्षणाविषयी त्यांचा हातखंडा असे. पुस्तकांतील गुण आणि दोष हे दोन्ही समूह त्यांच्यासमोर जसे एकमेकांवर उड्या घेत असत आणि ते त्यावर चर्चा मोठ्या उदार बुद्धीने व निःपक्षपातीपणे करीत असत.’

- वि. ग. जोशी

 

ओक, वामन दाजी