Skip to main content
x

ओंबळे, तुकाराम गोपाळ

      तुकाराम गोपाळ ओंबळेंचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात वसलेल्या केंडबे ह्या खेड्यात  झाला. केंडबे गाव डोंगराच्या कडेकपारीत वसलेेले, त्यामुळे शेतीमधील उत्पन्नदेखील तुटपुंजे असायचे. त्यामुळे  तुकारामांनी जगण्यासाठी आपल्या थोरल्या व धाकट्या भावांसह मुंबई गाठली. मुंबईत लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर त्यांना अठराव्या वर्षीच मुंबई पोलीस दलात नोकरी मिळाली.

      कॉन्स्टेबल म्हणून सेेवेला सुरुवात केलेल्या ओंबळेंनी त्यानंतर ३४ वर्षांच्या कारकिर्दीत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत यशस्वी मजल गाठली होती. अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर, वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सभ्यतेने वागणे आणि मितभाषी स्वभावामुळे ओंबळेंबद्दल पोलीस खात्यात आदरच होता. डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेल्या तुकाराम ओंबळेंच्या आयुष्यातील २६नोव्हेंबर२००८ हा दिवस आगळावेगळा ठरला. कारण तो त्यांच्यासह आणखी सोळा अधिकारी, कर्मचारी, तसेच २०० हून अधिक निरपराध नागरिकांसाठी मृत्यूचा दूत बनून आला होता.

       २६नोव्हेंबर२००८ च्या रात्री ओंबळे गिरगाव चौपाटीवर बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावीत होते. त्याच वेळी त्यांच्या बिनतारी यंत्रावर संदेश थडकला की, ‘दक्ष राहा, गेटवे परिसरातून दोन दहशतवादी, चौपाटीच्या दिशेने येत आहेत. त्यांच्याकडे स्कोडा एमएच ०२ जेपी १२७६ ह्या क्रमांकाची गाडी आहे.’ इस्माईल नावाचा दहशतवादी ती गाडी हाकत होता व त्याच्या शेजारी अजमल कसाब एके-४७ मशीनगन घेऊन बसला होता.

       संदेश ऐकताच एरवी रस्त्यावर दोन अडथळे (बॅरॅकेड) उभे करणाऱ्या ओंबळेंनी या वेळी सहा-सहा फुटांच्या अंतराचे तीन अडथळे लावले. अंदाजाप्रमाणेच गाडी हाकणाऱ्या इस्माईलने दोन अडथळे तोडले; परंतु तिसऱ्या अडथळ्यापाशी त्यांची स्कोडा गाडी बंद पडली.

       ही संधी साधत तुकाराम ओंबळेंनी कसाबच्या दिशेचा दरवाजा विजेच्या चपळाईने झेपावत उघडला. तोवर दुसरीकडून ओंबळेंच्या दोन सहकाऱ्यांनी इस्माईलला आपल्या ९ एम.एम. पिस्तुलामधून कंठस्नान घातले होते. परंतु कसाबने मात्र आपल्या एके-४७ मशीनगनमधून ह्या अत्याधुनिक बंदुकीतून ओंबळेंच्या दिशेने बेछूट फैरी झाडायला सुरुवात केली. गोळ्या लागून ओंबळे कोसळत होते. त्यांच्या हाती काहीही शस्त्र नव्हते. तरीही जिवाच्या आकांताने त्यांनी गोळ्या ओकणाऱ्या बंदुकीची नळी पकडली आणि नंतर त्याला विळखा घालून बाहेर खेचला.

        कसाब हतबल झाला आणि ओंबळेंच्या अन्य साथीदारांनी त्याला पुरता जेरबंद केला. ओंबळेंच्या प्रसंगावधानामुळे आणि योग्य कृतीमुळे कसाब ह्या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडता आले. त्यामुळेच २६/११ च्या हल्ल्याच्या खटल्यातील चौकशी व तपासाचे मार्ग सुलभ झाले. पण या हातघाईत तुकाराम ओंबळे मात्र गिरगाव चौपाटीजवळ आपल्या प्राणांची आहुती देऊन हुतात्मा झाले. उणापुऱ्या सहा मिनिटांच्या ह्या कल्पनेहूनही थरारक घटनेमध्ये एरवी अन्य सर्व दहशतवाद्यांप्रमाणेच कसाबलाही पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यूचा मार्ग दाखविता आला असता; परंतु त्यामुळे ह्या कटाची व पाकिस्तानच्या कुटिल कारवायांची माहिती जगाला कधीच कळली नसती. ओंबळेंमुळेच कसाब जिवंत सापडू शकला व पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. ओंबळेंच्या ह्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना २००९च्या प्रजासत्ताक दिनी ‘अशोकचक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आले. ह्या वेळी बोलताना भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील ह्यांनी असे प्रशंसोद्गार काढले, की “कोणत्याही शस्त्राविना दहशतवाद्यांवर तुटून पडणारे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय शौर्याला माझा सलाम आहे.”

       ओंबळेंची सेवा अजून साडेचार वर्षे शिल्लक होती. त्यांच्या पश्चात पत्नी ताराबाई, तसेच चार कन्या असा परिवार आहे.

- संदीप राऊत

ओंबळे, तुकाराम गोपाळ