Skip to main content
x

पाध्ये, माधव गोविंद

       कृषीप्रधान भारत देशाच्या दृष्टीने जलसिंचनाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून स्वातंत्र्यानंतर शासनाने जलसिंचन तंत्रज्ञानाला उत्तेजन देणारं जे धोरण अमलात आणलं त्याला कार्यान्वित करणाऱ्या अभियंता पिढीचे एक प्रतिनिधी असलेल्या माधव गोविंद पाध्ये यांचा जन्म कोल्हापूरजवळच्या ऐतिहासिक पन्हाळा गावात झाला. याच परिसरात शेती हा तुलनेने सुखवस्तू आणि मोठ्या पाध्ये कुटुंबाचा व्यवसाय होता. माधव पाध्ये यांच्या आईचे नाव अन्नपूर्णा होते.

       माधव पाध्ये यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पन्हाळा येथील शाळेत झाले. त्यानंतर ११वी पर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला झाले. माधव पाध्ये इंटरची परीक्षा कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले. इंटरनंतर बांधकाम अभियांत्रिकी (सिव्हील इंजिनीअरिंग) क्षेत्रातील पदवीसाठी त्यांनी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. १९४८ साली झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेत माधवरावांसह फक्त तीन विद्यार्थ्यांना पहिला वर्ग मिळाला होता. माधवरावांनी एका विषयात सुवर्णपदकही मिळवले होते.

        भारतीय प्रशासन सेवेत माधव पाध्ये यांचा प्रवेश ब्रिटिश राजवटीतल्या सरकारी धोरणानुसार झाला. ते १९४८ ला पदवीधर झाले आणि हे वर्ष स्वतंत्र भारत सरकारचे पहिलेच वर्ष असल्याने प्रशासकीय सेवा ब्रिटिश धोरणानुसारच होती. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातून पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या काळच्या ‘बॉम्बे सर्व्हिस ऑफ इंजिनीअर्स’ अंतर्गत थेट प्रथम वर्गपदावर नियुक्त केले जात असे. पाध्ये या नियुक्तीसाठी पात्र असल्याने त्यांना लगेचच सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्या वेळचा मुंबई इलाखा हे त्यांचे भौगोलिक कार्यक्षेत्र होते. यात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांच्या काही भागांचा समावेश होता. या भौगोलिक क्षेत्रासाठी सिंचनासह एकत्र सार्वजनिक बांधकाम विभाग होता.

        माधवराव यांचा १९५३मध्ये पद्मजा यांच्याशी विवाह झाला. आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेत माधव पाध्ये यांचा तत्कालीन मुंबई इलाखा आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पात सक्रीय सहभाग होता. पुण्याजवळ खडकवासला आणि पानशेत, नाशिकचे गंगापूर, अहमदनगर-संगमनेर परिसर, कृष्णा खोर्‍यातली कोयना-धोम-भीमा-कुकडी नद्यांवरची धरणं, जळगावातली गिरणा आणि हातनूर धरणं या सर्व प्रकल्पांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान आहे. गुजरातच्या सरदार सरोवर आणि पंजाबच्या भाक्रा-नानगल प्रकल्पातही त्यांचा सहभाग होता. पानशेत धरण १९६१ फुटलं त्यावेळी ते त्या धरणावरच कार्यरत होते. धरणाला असलेला धोका लक्षात येताच त्यांनी जीवितहानी टाळण्याचे खूप प्रयत्न केले.

        १९७६मध्ये पाध्ये प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले. केंद्रीय जलसंसाधन विभागाच्या योजना मंडळाचे सदस्य म्हणून त्यांचा नवनवीन सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात सहभाग होता. बदलत्या तंत्रज्ञानानुसार धरणांसाठी आवश्यक असलेले प्रचंड दरवाजे भारतातच तयार करता यावेत यासाठीचे आलेखन (डिझाईन) करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. केंद्रीय जलआयोगाचे पदसिद्ध सचिव म्हणून त्यांनी १९७८ ते १९८२ पर्यंत काम केले. जलसंसाधन मंत्रालयातून सचिव पदावरून १९८५मध्ये पाध्ये निवृत्त झाले. प्रचलित संकेतानुसार केंद्र शासनात सचिव पदावर भारतीय प्रशासन सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच नियुक्त होतात. पण माधव पाध्ये हे प्रशासन सेवा परीक्षेच्या बाहेरून आलेले पहिले सचिव होते. आपल्या प्रदीर्घ सेवेत सिंचनासंदर्भात भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून नेपाळ, श्रीलंका, भूतान, सिक्किम, बांगला देश आणि इतरही अनेक देशांत जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.

          - सुधाकर कुलकर्णी

पाध्ये, माधव गोविंद