Skip to main content
x

पाध्ये, प्रभाकर आत्माराम

     प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील लांजे या गावी झाला आणि त्यांचे देहावसान पुणे येथे झाले. आपल्या पंचाहत्तर वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जवळपास पन्नास वर्षे वृत्तपत्रीय लेखनाबरोबर कथात्म साहित्य, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, ललित गद्य, समीक्षा व सौंदर्यमीमांसा अशी निर्मिती अखंडपणे केली. प्रभाकर पाध्ये हे त्यांच्या आई-वडिलांच्या सहा मुलांपैकी दुसर्‍या क्रमांकाचे अपत्य. त्यांचे मूळ नाव प्रल्हाद, ते पुढे केव्हातरी प्रभाकर झाले. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी, पुणे, मुंबई येथे झाले. १९२७ साली ते मॅट्रिक झाले व १९३२ साली एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथून अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन बी.ए.झाले. एम.ए. होण्यासाठी ते पुण्याला गोखले अर्थशास्त्र संस्थेत दाखल झाले परंतु एम.ए. न होताच मुंबईस परतले व नोकरीला लागले. मुद्रणशोधनाची कामे, हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभा’ पाक्षिकात लेखन अशी त्यांच्या अर्थार्जनाची सुरुवात झाली. ते करता-करता योगायोगाने त्यांची पत्रकारिता सुरू झाली. याच काळात ‘आजकालचा महाराष्ट्र- वैचारिक प्रगती’ (१९३५) हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा वेध घेणारा ग्रंथ त्यांनी श्री.रा.टिकेकर यांच्या सहकार्याने सिद्ध केला. ग्रंथाच्या अखेरीस दिलेला १७९९ ते १९३४ या प्रदीर्घ कालखंडातील प्रमुख घटनांचा कालपट हा या ग्रंथाचा सर्वांत उल्लेखनीय विशेष. अशा प्रकारे मराठी ग्रंथांमध्ये कालपट देण्याची सुरुवात या ग्रंथापासून झाली. 

     ‘प्रतिभे’त लिहीत असतानाच मो.ग.रांगणेकर यांनी त्यांना ‘चित्रा’ या साप्ताहिकात नेले. ‘चित्रा’ने त्यांना पत्रकार बनविले. ‘चित्रा’तून ते ‘धनुर्धारी’त आले. ‘धनुर्धारी’त असतानाच प्रभाकर पाध्ये यांचा संसार सुरू झाला. ४ जानेवारी १९४० रोजी कमल गोठोस्कर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ‘धनुर्धारी’ला पाध्यांनी साहित्यदृष्ट्या वरच्या पातळीवर नेले. बी.ए. झाल्यानंतरचे पाध्ये मार्क्सच्या विचाराने भारावून गेलेले पाध्ये होते. १९३५-४०पासून घडत गेलेल्या घटना, दुसरे महायुद्ध आणि महायुद्धोत्तर कालखंड या दिवसांत साम्यवादी राष्ट्रांत ज्या घडामोडी घडल्या आणि मार्क्सवादी विचारांना क्रमशः जी वळणे लागली, त्यांमुळे पाध्ये मार्क्सवादाचे कट्टर विरोधक बनले.  

     पत्रकार म्हणून नावलौकिक संपादन केलेले पाध्ये ३० नोव्हेंबर १९४५ रोजी ‘नवशक्ती’चे संपादक झाले. ‘नवशक्ती’चा जेमतेम ९०० असणारा खप, पाध्यांनी प्रयत्नपूर्वक मोठमोठ्या लेखकांना लिहायला लावून आणि वृत्तपत्राविषयीच्या आपल्या अभिनव कल्पना राबवून प्रचंड वाढवला. ‘नवशक्ती’ हे वृत्तपत्र पाध्ये यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. कालांतराने व्यवस्थापनाशी झालेल्या तात्त्विक मतभेदांमुळे पाध्ये यांनी १८ मार्च १९५३ रोजी ‘नवशक्ती’ हे वृत्तपत्र सोडले. २२ मार्च १९५३ रोजी ते ‘द इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे चिटणीस झाले. नंतर दोन वर्षांनी जून १९५५ मध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आशिया खंडाचे चिटणीस- सेक्रेटरी जनरल म्हणून ते दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यापासून सुमारे एक तप पाध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक घटनांशी निगडित होते. त्यांच्या विद्याव्यासंगी आणि सर्व प्रकारची जिज्ञासा बाळगणार्‍या पत्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाला या संधीमुळे नवनवे पैलू प्राप्त झाले. जगभरातल्या मोठमोठ्या व्यक्तींना भेटण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे, त्यांचे जवळून अवलोकन करण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आणि ते प्रसंग पाध्ये यांचे अंतरंग समृद्ध करून गेले.

     ‘व्याधाची चांदणी’ (१९४४), ‘कृष्णकमळीची वेल’ (१९४५), ‘अर्धवर्तुळे’ (१९५१), ‘अंधारातील सावल्या’ (१९६५) हे पाध्ये यांचे चार कथासंग्रह. या चार कथासंग्रहांतील सर्व कथा एकत्र करून ‘निळे दिवस’ (१९७६) हा कथासंग्रह सिद्ध झाला आहे. पाध्ये यांच्या कथांतून प्रकटणारी मूल्ये ही सांकेतिक भासत असली तरी मूलतः दुर्बल असणार्‍या माणसाला समजावून घेण्याचा कथाकाराचा प्रयत्न त्यांच्या कथांना समृद्ध करतो. ‘त्रिसुपर्ण’ (१९८३) हा त्यांचा तीन दृष्टान्तकथांचा संग्रह कथानिर्मितीचा एक वेगळा प्रयोग म्हणून लक्षणीय आहे. सत्याचा शोध हे बीज असणार्‍या या दृष्टान्तकथा दृष्य विश्व आणि आत्मतत्त्व यांचे वेगळेपण व त्यांचे एकत्व यांचा बोध घडवितात. ‘मैत्रीण’ (१९६१) ही पाध्ये यांनी लिहिलेली कादंबरिका. ती मधून आदर्शाचा, ईप्सिताचा, नीतिमत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न पाध्ये यांनी केला आहे. ‘नवे जग: नवी क्षितिजे’ (१९५४), ‘अगस्तीच्या अंगणात’ (१९५७), ‘उडता गालिचा’ (१९५९), ‘तोकोनोमा’ (१९६१), ‘हिरवी उने’ (१९६४) ही पाध्ये यांची प्रवासवर्णने म्हणजे भारतात, युरोपात, अमेरिकेत, जपानमध्ये जिथे-जिथे म्हणून पाध्ये गेले, ज्या-ज्या व्यक्तींना भेटले, ज्या-ज्या घटनाप्रसंगात ते सामील झाले; त्या-त्या प्रसंगी लेखकाच्या चित्तात उमटलेल्या स्पंदनांचे आलेख आहेत. ‘प्रकाशातील व्यक्ती’ (१९४१), ‘तीन तपस्वी’ (१९४६), ‘व्यक्तिवेध’ (१९७३), ‘आगळी माणसे’ (१९७९) हे बहुविध व्यक्तिचित्रांचे त्यांचे संग्रह  व्यक्तीच्या बाह्यरूप वर्णनापेक्षा तिच्या अंतरंगदर्शनावर भर देणारे आहेत. ‘चिवारीची फुले’ (१९७८), ‘आभाळातील अभ्रे’ (१९८४) आणि ‘सायंकाळच्या सावल्या’ (१९८४) हे स्फुट लेखांचे संग्रह लेखकाची काव्यात्म वृत्ती, त्याचे निसर्गप्रेम, त्याची रसिकता, त्यांचा व्यासंग, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळा, त्यांचे सौंदर्यशोधक व्यक्तिमत्त्व यांचे दर्शन घडवते. 

     ‘पाकिस्तान की पन्नास टक्के?’ (१९४१) हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकावरील परीक्षणातून निर्माण झालेले पाध्ये यांचे पुस्तक, तर  ‘युगोस्लाविया: द लॅन्ड ऑफ न्यू होरायझन्स’ (१९५३) हे त्यांनी युगोस्लावियाला दिलेल्या भेटीवर आधारित पुस्तक. ‘विचारधारा’ (१९७९) हा त्यांच्या निवडक वैचारिक लेखांचा संग्रह म.द.हातकणंगलेकर यांनी संपादित केला आहे. ‘मानव आणि मार्क्स’ (१९८०) या ग्रंथाद्वारे पाध्ये यांनी मार्क्सचे तत्त्वज्ञान सुसंगतपणे स्पष्ट करून मार्क्सचे ऋण फेडले आहे. जगाच्या विचारधनात मार्क्सने टाकलेली भर व तिच्या मर्यादा सुव्यवस्थितपणे मांडून दाखविणारे हे लेखन आहे.

     १९६५ साली पाध्ये यांचा एकुलता एक मुलगा प्रशांत याचे अपघाती निधन झाले. या घटनेचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यानंतर ते दिल्ली सोडून पुण्याला आले. स्वत:चे मनोबल एकवटून आणि सुहृदांच्या स्नेहाच्या आधारावर त्यांनी आपले पुढले आयुष्य सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाला, त्यांच्या आवडत्या विचार-विनिमयाला व विविधांगी लेखनाला दिले. ‘मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा’ (१९७०), ‘पाटणकरांची सौंदर्यमीमांसा’ (१९७७) आणि ‘सौंदर्यानुभव’ (१९७९) हे पाध्ये यांचे सौंदर्यशास्त्रविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथ. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत प्रभाकर पाध्ये मुख्यत्वे ओळखले जातात ते त्यांच्या सौंदर्यमीमांसेमुळे. यांपैकी ‘सौंदर्यानुभव’ला १९८२चे साहित्य अकादमीचे पारितोषिक लाभले. या ग्रंथातून पाध्ये यांची सौंदर्यशास्त्रविषयक स्वतंत्र भूमिका वाचकांसमोर येते. मानवी अनुभव तीन प्रकारचे असतात; एक सौंदर्यानुभव, दुसरा व्यावहारिक व नैतिक स्वरूपाचा अनुभव, तिसरा तात्त्विक/वैचारिक स्वरूपाचा अनुभव. या प्रत्येक अनुभवप्रकारामागे अनुभव घेणार्‍याची दृष्टी भिन्न-भिन्न स्वरूपाची असतेे. “सौंदर्यानुभव म्हणजे मनाचा एक भ्रम नव्हे, त्याला मेंदूच्या रचनेत व व्यापारात भक्कम आधार आहे.” असे पाध्ये यांचे प्रतिपादन आहे. सौंदर्यानुभवाच्या अनुषंगाने पाध्ये यांनी सौंदर्यवृत्ती, सौंदर्यास्वाद, स्वरसरंजनात्मकता, प्रतिभा व तीन मेंदूंचे कार्य, आणि कलेच्या प्रतीतीमुळे विस्तारणार्‍या अनुभवकक्षा इत्यादींविषयी मानसशास्त्रीय विचारांच्या आधारे विस्तारपूर्वक विवेचन केले आहे. 

     ‘कलेची क्षितिजे’ हे पाध्ये यांचे डिसेंबर १९४२मध्ये प्रसिद्ध झालेले समीक्षालेखांचे पहिले पुस्तक. कला आणि जीवन, कला आणि मतप्रचार, कलानिर्मितीचे मानसशास्त्र, यांसारखे एकंदर अकरा समीक्षालेख या संग्रहात आहेत. “हे लेख निरनिराळ्या वेळी आणि प्रसंगांनी लिहिलेले असले तरी ते तितकेसे स्वयंपूर्ण नाहीत” ही या लेखांची मर्यादा स्वत: लेखकाने पुस्तकाच्या आरंभी प्रास्ताविक मजकुरातल्या पहिल्याच वाक्यात सांगितली आहे. ‘वामन मल्हार आणि विचारसौंदर्य’ (१९७८) हा ग्रंथ मुंबई मराठी साहित्य संघात ‘वा. म. जोशी स्मारक व्याख्यानमाले’त पाध्ये यांनी दिलेल्या तीन व्याख्यानांतून सिद्ध झाला आहे. या ग्रंथात त्यांनी विचारसौंदर्य या संकल्पनेचा अभ्यासपूर्वक उलगडा केला आहे. या ग्रंथात त्यांनी मांडलेली ‘स्वरसरंजनात्मकते’ची संकल्पना ही मराठी समीक्षेला मिळालेली देणगी म्हणता येईल. ‘कादंबरीकार खानोलकर’ (१९७७) या पुस्तकात त्यांनी कथासूत्र, वातावरण, व्यक्तिरेखा, कथानक, नाट्यमयता, काव्यमयता आणि रचना अशा वेगवेगळ्या घटकांच्या आधारे खानोलकरांच्या दहा कादंबर्‍यांची चिकित्सा केली आहे. ‘आस्वाद’ (१९७७) हा त्यांच्या समीक्षालेखांचा संग्रह वेगवेगळ्या साहित्यकृतींची/कलाकृतींची सूक्ष्म चर्चा करतो. याखेरीज पाध्ये यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेला ‘प्रिन्सिपल्स ऑफ जरनॅलिझम’ (१९९१) हा ग्रंथ ‘पत्रकारितेची मूलतत्त्वे’ (१९९१) या नावाने प्र.ना.परांजपे व वसुधा परांजपे यांनी अनुवादित केला आहे. 

     आयुष्यभर केलेली सातत्ययुक्त ज्ञानसाधना, चर्चा व विचारमंथन यांतील निरंतर निमग्नता आणि बहुविध साहित्यनिर्मितीची क्षमता हे प्रभाकर पाध्ये यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सारभूत विशेष म्हणता येतील. 

     - प्रा. डॉ. विलास खोले

पाध्ये, प्रभाकर आत्माराम