Skip to main content
x

पाध्ये, प्रभाकर नारायण

पाध्ये, भाऊ

     भाऊ पाध्ये यांचा जन्म मुंबईत झाला. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले. सुरुवातीला एलआयसीमध्ये नोकरी करताना कामगार चळवळीत सक्रिय झाले. ‘हिंदू मजदूर संघटने’त त्यांनी काम केले. पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवातही याच दरम्यान झाली. ‘नवा काळ’, ‘नवशक्ती’ ह्या वृत्तपत्रांतून लेखन केले. चित्रपट सृष्टीच्या पत्रकारितेमध्ये स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली.

     कामगार चळवळ त्यांनी जवळून अनुभवल्याने पहिल्या कादंबरीचे बीज याच विषयाशी संबंधित असल्याचे दिसते. ‘वासुनाका’ (१९६५) ही पहिली कादंबरी होय. त्यानंतरच्या ‘वैतागवाडी’ (१९६५), ‘बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर’ (१९६७), ‘अग्रेसर’ (१९६८), ‘राडा’ (१९७५), ‘ब्रिगेड’ (१९७४) ‘जेलबर्ड्स’ (१९८२), ‘वणवा’ (१९७६), ‘वॉर्ड नं. ७’ (१९८०) या कादंबर्‍या आणि ‘एक सुनेरा ख्वाब (१९८०), ‘थोडी सी जो पी लो’ (१९८६), ‘मुरगी’ (१९८१), ‘थालीपीठ’ (१९८४) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले.

     भाऊ पाध्ये यांनी लेखनाची रूढ चौकट मोडून  आपली स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांचे लेखन समकालीनांपेक्षा दोन पावले पुढेच होते, त्यामुळेच समाजमानसाला आणि साहित्याविश्वालाही धक्का देणारे होते. आपल्या कादंबरीतून त्यांनी समाज जीवनातील भीषण वास्तवाचा शोध घेतला. तळागाळातील समाजाचे जिणे जसे आहे, तसेच अगदी त्याच भाषेत साहित्यातून मांडताना त्यांची लेखणी कचरली नाही. आपल्या मांडणीवरून झालेल्या वादालाही ते सामोरे गेले. त्यांनी वाचकांना ज्या साहित्याचा परिचय घडवला, तसे लिखाण आज आधुनिकतेच्या परिभाषेत मांडले जात आहे; त्याची बीजे पाध्ये यांच्या लिखाणात सुप्त आहेत, असे म्हटले पाहिजे. आहे तसे जीवन त्याच भाषेत रेखाटल्यामुळे रूढ लेखनपरंपरेला भाऊ पाध्ये यांनी हादरा दिला. ‘वासुगिरी’ हा टगेगिरीला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो, तो ‘वासूनाका’ कादंबरीतील पाध्ये यांच्या भाषावैशिष्ट्यांमुळेच! भाऊंचे ‘ऑपरेशन धक्का’ (१९६९) हे नाटक प्रकाशित झाल्यानंतरही त्यांना वादाला सामोरे जावे लागले होते. त्यांचे लेखन असे वादाचा विषय बनल्यामुळे ‘भाऊ पाध्ये’ हे नाव साहित्यविश्वात सतत चर्चेत राहिले.

- संपादक मंडळ

संदर्भ
१.  पाध्ये प्रभाकर; ‘पुण्याचे ते दिवस’, विशाखा दिवाळी अंक - १९८३.
२.  चिरमुले शरदचंद्र; ‘माझे ज्येष्ठ सुहृद प्रभाकर पाध्ये’ ; हंस - दिवाळी अंक १९८४.
पाध्ये, प्रभाकर नारायण