Skip to main content
x

पै, बाबूराव कृष्णराव

बाबूराव कृष्णराव पै हे चित्रपट क्षेत्रात मूव्ही मोघलम्हणून ओळखले जात. बाबूराव शिक्षण संपल्यावर बँकेत नोकरी करत असताना त्यांची मुंबईहून कराची येथे बदली झाली. तेथे त्यांची दादासाहेब तोरणे यांच्याशी भेट झाली. दोघांनाही चित्रपटांबद्दल आत्मीयता असल्याने दोघांनी मिळून चित्रपट वितरणाचा व्यवसाय सुरू केला. पंजाब, सिंध व वायव्य सरहद्द प्रांतामध्ये बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपटांचे वितरण करण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय त्यांना लाभदायी ठरला.

चित्रपट क्षेत्रातील संधी ओळखून बाबूराव पै व दादासाहेब तोरणे या दोघांनी बँकेतील नोकरी सोडून कराचीहून मुंबईला प्रयाण केले. येथे त्यांनी प्रभात व आर्यन फिल्म कंपनीच्या चित्रपटांचे वितरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी मुव्ही कॅमेरा कंपनीची स्थापना केली आणि त्याद्वारे चित्रपट निर्मितीसाठी व चित्रीकरणासाठी लागणाऱ्या गोष्टी निर्मात्यांना पुरवण्याचे काम सुरू केले. भारतात या दोघांनीच या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

१९२८-२९ च्या सुमारास फेमस पिक्चर्सया नावाने वितरण संस्था स्थापन करून संपूर्ण भारतात या संस्थेची कार्यालये सुरू केली. १९३१ मध्ये बोलपटांच्या आगमनानंतर तोरणे व पै यांनी अमेरिकेतील ऑडीओकेमिक्सच्या ध्वनिमुद्रण क्षेत्रातील कंपनीशी ध्वनिमुद्रण यंत्रासाठीची भारतातील एजन्सी मिळवली. याच यंत्रणेच्या साहाय्याने प्रभातचा आयोध्येचा राजाहा चित्रपट ध्वनिमुद्रित झाला. रणजित, सागर व वाडिया या चित्रपट संस्थांनाही या दोघांनी ध्वनिमुद्रण यंत्रे पुरवली. यानंतर तोरणे यांनी दोराबजी कोल्हा यांच्या मदतीने नानासाहेब सरपोतदारांचा आर्यन स्टुडिओ  विकत घेतला. सरस्वती सिनेटोनअसे त्याचे नामकरण करून त्याद्वारे श्यामसुंदरहा चित्रपट बनवला. त्यांच्या या वाटचालीत बाबूराव पै यांचा मोठा वाटा होता. बाबूराव पै यांनीच श्यामसुंदरया चित्रपटाला वेस्टर्न थिएटर मिळवून दिले. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला.

केशवराव धायबरांनी प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर बाबूराव पै तेथे भागीदार म्हणून सामील झाले. पुढे शांतारामबापूंनी प्रभात सोडल्यावर बाबूराव पैंच्या हाती त्या कंपनीची सर्व सूत्रे आली. तेव्हा पै यांची फेमस पिक्चर्सही संस्था वितरणक्षेत्रात कार्यरत होतीच. या संस्थेद्वारे हलसुख पिक्चर्सचा खजांचीचित्रपट मुंबईत कृष्णा थिएटरमध्ये थाटामाटाने प्रदर्शित करण्यात आला. वर्तमानपत्रातून या चित्रपटाच्या मोठ्या जाहिराती देण्यात आल्या. यानंतर पै यांनी प्रभातचा रामशास्त्री’, पांचालींचा जमीनदार’, ‘खानदान’, ‘लैला मजनूअसे रौप्यमहोत्सवी चित्रपट वितरित केले. याबरोबरच के.के. मोदी यांच्यासमावेत वेस्टर्न इंडिया थिएटर्स ही चित्रपटगृहांची साखळी निर्माण केली. मुंबईत व पुण्यात त्या वेळेस त्यांची जवळजवळ सव्वीस चित्रपटगृह होती. 

बाबूराव पै यांनी फेमस स्टुडिओची स्थापना केली. त्यामार्फत नर्गीस’, ‘बडी बहेन’, ‘प्यार की जीत’, ‘हमारी मंजिलयासारखे यशस्वी चित्रपट काढले. पुढे काही कारणाने व्यवसाय अयशस्वी झाल्याने पै यांनी फेमस स्टुडिओची चित्रनिर्मिती बंद करून चित्रपट व्यवसायातून निवृत्ती घेतली.

शांतारामबापूंनी झनक झनक पायल बाजेया चित्रपटाची निर्मिती करून प्रचंड यश मिळविले. त्या प्रसंगी बाबूराव पै यांनी पुढाकार घेऊन मुंबईत शिवाजी पार्क येथे चित्रपट व्यवसायिकांतर्फे शांतारामबापूंचा सत्कार घडवून आणला. या सत्कार सोहळ्यात आचार्य अत्रे यांनी शांतारामबापू यांना चित्रपतीही पदवी बहाल केली.

- द.भा. सामंत

पै, बाबूराव कृष्णराव