Skip to main content
x

पै, वामनराव

वामनराव पै

     जगातील अनेक विचारवंतांनी माणसाच्या जीवनाचा सर्वांगीण विचार करून आपापल्या परीने जीवनभाष्ये लिहिली. परंतु जीवन म्हणजे निश्चित काय? त्याचे कोडे कोणीच सोडवू शकले नाही. जीवनाचे खरे स्वरूप व समस्या न समजल्यामुळे सारी मानवजात अशांतीच्या व अतृप्तीच्या अंधारात चाचपडत आहे. विचारवंतांना मानवी जीवनाचे कोडे सोडवता आले नाही. जीवनाचा खरा अर्थ सांगता आला नाही. परंतु सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्या ग्रंथांतून, भाषणांतून व प्रवचनांतून जीवनाचे कोडे सहज उलगडून दाखवले. तेही सर्वसामान्य लोकांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेतून!

सद्गुरू वामनराव पै यांचा जन्म मुंबई येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वामनराव पै हे सुशिक्षित व सुसंस्कृत होते. १९४४ साली त्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागात काम केले. इमाने-इतबारे नोकरी केल्यानंतर १९८१ साली ते डेप्युटी सेक्रेटरी या पदावरून निवृत्त झाले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ होती. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून ते नाना- महाराज शिरगावकर या सत्पुरुषाचे अनुयायी झाले. अध्यात्माची तीव्र ओढ, आत्मसंशोधनाचे (Self Realization) महत्त्व, प्रयत्न व चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी अध्यात्म क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त केले.

आत्मज्ञान व अध्यात्मातील आपली बैठक पक्की झाल्यानंतर वामनराव पै यांनी निरनिराळ्या आध्यात्मिक केंद्रांतून व मुंबई येथील विवेकानंद केंद्रातून प्रवचने द्यावयास सुरुवात केली. त्यांची प्रवचने ही अत्यंत विद्वत्ताप्रचुर होती. पाश्चिमात्य व पौर्वात्य विचारवंतांची उद्धरणे जनमानसांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत त्यांनी जीवनाचा खरा अर्थ समजावून देऊन मानवी जीवनाचे क्लिष्ट कोडे सोडविले. त्यांच्या प्रवचनांनी व विचारांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. दिवसेंदिवस शिष्यांची संख्या वाढू लागली. १९५५ साली त्यांच्या शिष्यांनी सद्गुरूंच्या जीवनविषयक आध्यात्मिक विचारांचा प्रचार करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला. त्याचे नाव होते, ‘संप्रदाय मंडळ’. पुढे हे संप्रदाय मंडळ ‘जीवनविद्या’ या नावाने ओळखले जाऊ लागले. सद्गुरूंचे शिष्य ‘नामधारक’ या नावाने ओळखले जातात. हे नामधारक आपल्या ‘जीवनविद्या’ संस्थेत सेवाभावी वृत्तीने व निरलसपणे काम करतात.

सद्गुरूंनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या प्रांतांत व अमेरिका वगैरे परदेशांत दहा हजारांहून अधिक प्रवचने दिली, तीही विनामूल्य, कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता. सद्गुरूंनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत जवळजवळ ४० ग्रंथ लिहिले असून या अनमोल ग्रंथांद्वारे शिष्य व सर्वसामान्य जनतेला बहुमोल मार्गदर्शन झालेले आहे. सद्गुरूंचे तत्त्वज्ञान हे प्रेरणादायक व जीवनास मार्गदर्शन करणारे आहे. त्यांची शिकवण प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उदात्त शिकवणीमुळे भक्तांच्या मनांत सद्गुरूंविषयी नितांत आदर, श्रद्धा व समर्पणाची भावना निर्माण झाली आहे.

आजचे युग हे विज्ञान युग आहे. अनेक शास्त्रीय शोधांमुळे मानवाला अनेक सुख-सुविधा मिळाल्या असून तो ऐहिक सुखामध्ये गुरफटला आहे. त्यातून तो बाहेर पडणे अशक्य आहे. त्यातच चंचल राजकारण व जीवघेणी सत्ता-स्पर्धा या गोष्टींमुळे त्याचा जीवनावरचा विश्वास उडत चालला आहे. प्राप्त परिस्थितीशी चार हात करून प्रश्न सोडविण्याऐवजी तो दैववादी व देववादी बनत चालला आहे. ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ असे निराशाजनक उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडत आहेत.

सामान्य लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दैववादी, प्रारब्धवादी आणि नशीबवादी बनत चालला आहे.  ‘आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे, ते सर्व आधीच ठरून गेलेले आहे. आपण केवळ कळसूत्री बाहुल्या असून त्या सर्व बाहुल्यांना नाचविणारा सूत्रधार कोणीतरी देव म्हणून वेगळा आहे. तो आकाशाच्या पलीकडे कोठेतरी राहतो. त्याच्या इच्छेनुसार सर्वकाही घडणार, त्यामुळे आपल्या हातात काहीही नाही, अशा तर्‍हेचे विचार त्याच्या डोक्यात येऊन तो क्रियाहीन व किंकर्तव्यमूढ बनतो. त्याच्या या भांबावलेल्या परिस्थितीचा गैरफायदा समाजातील धूर्त लोक घेतात. त्याचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषणही करतात. असे भांबावलेले सर्वसामान्य लोक बुवा, भगत, फकीर आणि अंगात येऊन घुमणारे यांचा आश्रय घेतात. बुवाबाजीला बळी पडणाऱ्या लोकांचा आपल्या समाजात मुळीच तोटा नाही. सुशिक्षित माणसेसुद्धा भूतबाधा, पिशाच्चबाधा, करणी, मूठ मारण्याचा प्रकार अशा गोष्टींवर विश्वास ठेवताना दिसतात. म्हणून माणूस आर्थिक दारिद्य्राने पिडलेला नसून तो वैचारिक दारिद्य्राने पछाडलेला आहे, तो सुसंस्कारांच्या दारिद्य्राने पछाडलेला आहे, असे म्हणणेच योग्य ठरेल!

सद्गुरू वामनराव पै यांना अशा दुर्बल मनाच्या व अंधश्रद्धेच्या नादी लागलेल्या लोकांची कीव येते. देव प्रसन्न होतो तो एकाच गोष्टीने, ती म्हणजे भक्ताने आपले मन-सुमन देवाच्या चरणी अर्पण केल्याने. ‘‘भोळसट व बावळट भक्त असण्यापेक्षा बुद्धिमान व हुशार नास्तिक बरा,’’ असे सद्गुरू वामनराव पै म्हणतात. सद्गुरू वामनराव पै यांनी असमाधानाकडून समाधानाकडे, दु:खाकडून सुखाकडे, अतृप्तीकडून तृप्तीकडे नेणाऱ्या विद्येलाच ‘जीवनविद्या’ असे म्हटले आहे.

मानवाचे जीवन हे देवावर किंवा दैवावर अवलंबून नाही, तर ते प्रत्येकाच्या हातातच आहे. विचाराचे तंत्र व मंत्र समजावून घेऊन सुयोग्य संस्कार आपणच आपल्यावर करवून घेऊन स्वत:चे जीवन सुखाचे केले पाहिजे. ‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत’, हा विचारच मानवाने उराशी बाळगून जीवनात प्रगती केली पाहिजे. मानवाचे जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी सद्गुरू महाराजांनी अनेक महामंत्र सुचविले आहेत.

सद्गुरू वामनराव पै असे म्हणतात, ‘‘संगीतात एकंदर ‘सा, रे, ग, म, प, ध, नी’ असे सात स्वर आहेत. हे सात स्वर जो सुरेखपणे व कौशल्याने हाताळतो, तो सुरेल व मधुर असे संगीत साकारतो. अगदी त्याचप्रमाणे जीवनात, ‘जग, कुटुंब, शरीर, इंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन व परमात्मा’ असे सप्तसूर आहेत. हे सातही सूर आपापल्या परीने महत्त्वाचे असून त्या प्रत्येक सुराला मनुष्याच्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्वाचे स्थान आहे.’’

 — प्रा. नीलकंठ पालेकर

पै, वामनराव