Skip to main content
x

पालेकर, देवीदास गणपत

        देवीदास गणपत पालेकर यांचा जन्म उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कारवार येथील सरकारी हायस्कूलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये आणि कायद्याचे शिक्षण गव्हर्नमेंट लॉ महाविद्यालयमध्ये झाले. बी. ए. आणि एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर २ फेब्रुवारी १९३४ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. पाच वर्षे उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही प्रकारचे खटले त्यांनी लढविले. जून १९३९मध्ये ते मुंबई न्यायसेवेत कनिष्ठ वर्ग दिवाणी न्यायाधीश म्हणून रुजू झाले. १९४९ ते १९५४ या काळात ते सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. १९५४ ते १९५६ या काळात त्यांची नेमणूक राज्य सरकारच्या कायदा खात्यात उपसचिव म्हणून झाली. त्यानंतर १९५६ ते १९५८ या दरम्यान ते जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. ऑक्टोबर १९५८मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून, तर जानेवारी १९५९मध्ये रजिस्ट्रार म्हणून झाली.

       १४ऑक्टोबर१९६१ रोजी पालेकर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. २७ऑगस्ट१९६२ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९जुलै१९७१ रोजी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. ४सप्टेंबर१९७४ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यानंतर कनिष्ठ वर्ग दिवाणी न्यायाधीशपदापासून सुरुवात करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोहोचणारे न्या.पालेकर हे पहिले न्यायाधीश होत.

        न्या.पालेकर यांच्या सर्वोच्च न्यायालयातील कारकिर्दीतच केशवानंद भारती हा अत्यंत गाजलेला खटला झाला. त्याची सुनावणी त्यावेळच्या न्यायालयाच्या सर्वच्या सर्व तेरा न्यायाधीशांसमोर झाली; त्यामुळे न्या.पालेकरही त्या पीठाचे सदस्य होतेच. यांतील अकरा न्यायाधीशांनी आपापली स्वतंत्र निकालपत्रे लिहिली. न्या.पालेकर यांनीही आपले स्वतंत्र निकालपत्र लिहिले. याशिवाय अन्य अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्या.पालेकरांचा सहभाग होता. पी.रॉयप्पा आणि समशेरसिंह खटले आणि राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी काही मुद्द्यांवर राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा मागितलेला सल्ला, ही त्यांतील विशेष उल्लेखनीय प्रकरणे म्हणता येतील. हिंदू कायद्याचे त्यांचे ज्ञान सखोल आणि अचूक होते.

        न्या.पालेकर निवृत्त झाल्यावर त्यांची नियुक्ती पत्रकारांचे वेतन आणि सेवाशर्ती ठरविण्यासाठी एक-सदस्य आयोग म्हणून झाली. या संबंधात त्यांनी दिलेला निवाडा ‘पालेकर निवाडा’ (पालेकर अ‍ॅवॉर्ड) म्हणून प्रसिद्ध आहे.

      अतिशय तत्त्वनिष्ठ म्हणून न्या.पालेकरांचा लौकिक होता. न्यायासनावर असेपर्यंत आपण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही, असे त्यांनी कनिष्ठ वर्ग दिवाणी न्यायाधीश असतानाच ठरविले होते आणि हे व्रत त्यांनी अखेरपर्यंत निष्ठेने पाळले. निवृत्तीनंतरचे जीवन त्यांनी लोणावळा येथे जवळजवळ एकांतवासात व्यतीत केले.

- शरच्चंद्र पानसे

पालेकर, देवीदास गणपत