Skip to main content
x

पालेकर, विष्णू केशव

अप्रबुद्ध

     माजात प्रतिथयश लेखकांना मानाचे स्थान आपोआपच मिळते. ललित साहित्य, काव्य, कादंबरी या प्रांतात यशस्वी लेखन करणारे कवी, लेखक, कादंबरीकार आपल्या कृतीमुळे मृत्युनंतरही कीर्तिरूपाने आज जीवंतच आहेत. त्यातही समाज हिताची व समाज प्रबोधनाची कळकळ घेऊन वेळ पडल्यास समाजाला न पटणारे व न रूचणारे विचार सांगणारे कर्ते सुधारक देखील कालांतराने समाजाला आदरणीय ठरतात. समाजाला अत्यंत आवश्यक पण समाज प्रवाहाच्या वेगळे लेखन करून वाङमयात कायम स्वरूपी नाव खोदून ठेवणार्‍या लेखकांत व देशभक्तात विष्णू केशव पालेकर उपाख्य अप्रबुद्ध यांचे नाव आदराने घ्यावे लागते.

     अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या गावी ३१ डिसेंबर १८८७ रोजी अप्रबुद्धांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशवराव पालेकर हे शिक्षण खात्यात शिक्षणाधिकारी होते. सर्व भावंडात धाकटे असल्यामुळे आईवडिलांचा त्यांच्यावर लोभ होता. लहानपणीच त्यांचे वडील वारले. त्यांचे शालेय शिक्षण अमरावतीत झाले व महाविद्यालयीन शिक्षण करीता ते नागपूर येथे आले. नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयामधून त्यांनी बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे वडील बंधू अमरावती येथे वकिली करीत असत. भारतीय कीर्तीचे प्रसिद्ध पुढारी व वकील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या जवळ अप्रबुद्धांचे वडील बंधू वकिली करीत असत. त्यामुळे पालेकर व खापर्डे या दोन्ही कुटुंबाचा स्नेह होता. नागपूर, अमरावती व यवतमाळ येथे त्याकाळी क्रांतिकारकांच्या चळवळी चालत असत. अप्रबुद्धांचा संबंध महाविद्यालयीन जीवनापासूनच या चळवळीशी आला. त्यांचा सक्रीय सहभाग त्या चळवळीत होता. टिळकांचे राजकारण तर दादासाहेब खापर्डे यांच्यामुळे त्यांच्यात मुरले होतेच. आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचा मंत्र केशवराव पालेकर यांना होता. त्यामुळे पालेकर कुटुंब आळंदी येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी जुळले होते. लो. टिळक ज्यांना गुरूस्थानी मानीत ते महर्षी पटवर्धन यांचादेखील संबंध पालेकर कुटुंबाशी त्याचमुळे आला. १९१० मध्ये वडील भाऊ आप्पासाहेब पालेकर यांच्यावर उपचार करण्यासाठी अप्रबुद्ध पुण्याला आले. ते मुक्कामी अण्णासाहेब पटवर्धनांकडेच राहिले. त्या आजारात अप्रबुद्धांचे वडील बंधू मरण पावले व अप्रबुद्ध मात्र महर्षी पटवर्धनांजवळ राहिले. अण्णासाहेब पटवर्धनाची पूर्ण सेवा त्यांनी केली. अण्णासाहेबांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. त्याच वेळी त्यांनी जीवनांत सरकारी नोकरी करायची नाही व ब्रह्मचारी राहून आजन्म देशसेवा करायची ही प्रतिज्ञा केली. स्वत: अण्णासाहेब पटवर्धनांनी केवळ बाह्य राजकारणानी देश स्वतंत्र होणार नाही त्या करीता ईश्वरी कृपा मिळायला पाहिजे व त्या करीता तपश्‍चर्येची गरज आहे हे ओळखून आपले उत्तरायुष्य त्या रीतीने घालविले. तोच कित्ता अप्रबुद्धांनी गिरविला.

      अण्णासाहेब पटवर्धनांजवळ त्यांना भारतीय संस्कृतीची मूलतत्वे व धर्माची गुह्येही कळून आली. १९१७ साली अण्णासाहेब पटवर्धन यांनी शरीरत्याग केल्यानंतर अप्रबुद्ध हिमालयात उत्तर काशी येथे गेले. तिथे तपश्चर्या व योगाभ्यास करून संस्कृतीच्या मूलतत्त्वांची अनुभवसिद्ध प्रचिती त्यांनी घेतली. १९२६ साली अमरावतीला परत आल्यावर त्यांनी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र हे ४५० पानांचे पुस्तक लिहिले. या चरित्रामुळे त्याकाळी खूप खळबळ उडाली. पुढे पुन्हा ते हिमालयात जाऊन एकांतात तपसाधनेत गुंतले. १९३४ साली न्या. दादासाहेब परांडे यांनी स्थापन केलेल्या वर्णाश्रम स्वराज्य संघ यांचे मुखपत्र असणार्‍या धर्मवीर या साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांना नागपूरला बोलविण्यात आले व ते नागपूरला आले. तीन वर्षे त्यांनी धर्मवीर चालविले. पुढे ते वर्तमानपत्र बंद पडले.

     अप्रबुद्धांनी वैदिक संस्कृतीचा प्रसार हेच आपले जीवनकार्य निश्चीत केले. धंतोली येथील एका झोपडीत एकटेच राहून ते आपले कार्य करीत असत. वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने, वैयक्तिक संपर्क, लेखन हे त्यांचे कार्य नागपूरला सुरू झाले. वर्णाश्रम स्वराज्य संघाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी अखिल भारतीय दौरे ही केले. त्यातच त्यांनी संस्कृतीची मूलभूत तत्त्वे व विवरण करणारी वैदिक संस्कृतीची पुनर्घटना आणि ग्वेदाचा संदेश ही पुस्तके लिहीली.

     अण्णासाहेब पटवर्धनांच्या शिकवणीचे सार व मूलभूत भारतीय संस्कृतीची मूलतत्वे विवरण करणारी अण्णासाहेब पटवर्धनांचे चरित्र, वैदिक संस्कृतीची पुनर्घटना व ऋग्वेदाचा संदेश ही तीन पुस्तके होत.  पुढे त्यांनी पातंजली योगसूत्रावर मराठीत पुस्तक लिहिले व इंग्रजीत डलळशलिश षि धसिर हे मोठे पुस्तक लिहिले. सर्व तज्ञांनी हे पुस्तक वाखाणले आहे. पातंजल योगसूत्रावर अनुभवसिद्ध लेखकाने लिहिलेले पुस्तक अशी अनेकांनी भलावण केली आहे.

     अप्रबुद्धांनी लिहीलेली आणखी पुस्तके- मराठ्यांचा उदयास्त, शिक्षणाचा खेळखंडोबा, वेदांचे अपौरूषेयत्व, लाल गुंडगिरी कम्युनिस्टांचे आरोपाचे उत्तर, जगायचे असेल तर, दोन साम्यवाद, आयुष्याच्या शेवटी लिहिलेले शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरीवरील मराठी अनुवादासह केलेले विवरण, भारतीय विवाह शास्त्र

     अप्रबुद्धांच्या भोवती तरुणांचा भरणा असे. त्यातील पुढे प्रसिद्ध झालेले विद्वानांची कांही नावे अशी- डॉ. ब.स. येरकुंटवार, अर्थशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक भा.ह.मुंजे, पुणे विद्यापीठाचे डॉ. गर्दे, ज्यांनी रा.स्व. संघाची संस्कृत प्रार्थना लिहीली ते श्री. न. ना. भिडे पूर्ण महाराष्ट्र ज्यांनी आपल्या वक्तृत्वाने गाजविला ते म. म. बाळशास्त्री हरदास इत्यादी. अप्रबुद्धांनी कुणाला गुरूमंत्र दिला नाही पण ही सर्व मंडळी अप्रबुद्धांना गुरुस्थानी मानणारी होती. अकिंचन अवस्थेत राहून व अपरिग्रहाचे व्रत घेऊन त्यांनी आयुष्य काढले. अण्णासाहेब पटवर्धनांच्या देहावसानानंतर त्यांनी अन्नत्याग केला, तो आयुष्याच्या अखेरपर्यंत. थोडे फराळाचे जिन्नस खाऊन ते राहत असत. नागपूर येथे त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या देहावसानाच्या वेळी व आजारपणात रा.स्व.संघाचे पू. गुरूजी हजर होते. पुढे बाळशास्त्री हरदासांच्या देवस्थानात अप्रबुद्धांच्या छायाचित्राचे अनावरण पू. गुरूजींच्या हस्ते झाले. त्यावेळी पू. गुरूजींनी अप्रबुद्धांची व त्यांच्या साहित्याची समाजाकडून अक्षम्य उपेक्षा झाली, याबद्दल खंत व्यक्त केली. ‘प्रज्ञालोक’ हे त्रैमासिक त्यांच्याच प्रेरणेने सुरू झाले. कोणतीही जाहिरात न घेता, कोणतेही अनुदान न स्वीकारता प्रज्ञालोक केवळ अप्रबुद्धांच्या आशीर्वादावर चालत आहे.

श्रीश हळदे

पालेकर, विष्णू केशव