Skip to main content
x

पालोदकर, माणिक सांडूजी

माणिक सांडूजी पालोदकर यांचा जन्म पालोद येथे एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे शिक्षण एस.एस्सी. पर्यंत झालेे. त्यांचा राजकीय प्रवास हा सहकार क्षेत्रापासून सुरू झाला. सर्वप्रथम ते सिल्लोड तालुका पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी 1962 ते 1967 या काळात सिल्लोड पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. त्यांनी 1968 ते 1972 मध्ये औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले. ते 1971 ते 1977 या काळात लोकसभेचे खासदार होते. त्यांनी 1967 ते 1972 या काळात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष व 1972 ते 1975 या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. ते 1978 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. ते 1980 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्षपदही भूषविले. साखर संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी साखर तंत्रज्ञानाच्या जिज्ञासेपोटी  ऑस्ट्रेलिया, अमेरिका व जर्मनी या देशांचे दौरे केले.

सिल्लोड तालुका हा माळरानावरील दुष्काळग्रस्त व कोरडवाहू शेतीचा तालुका होता. तालुक्यातील शेतकर्‍यांना ऊसासारख्या नगदी पिकातून अधिक पैसे मिळावे या उद्देशाने पालोदकर यांनी 1969 मध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याची सहकार तत्त्वावर नोंदणी केली. पुढे 1971-1972 पासून उभारणी सुरू करून अत्यंत काटकसरीने रुपये 314.00 लाखांमध्ये कारखाना उभा केला. कारखान्याची चाचणी 1974-1975 मध्ये गळीत हंगामी घेण्यात आली. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या रूपाने त्यांनी सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरात अनेक छोटे मोठे उद्योग सुरू करण्यात आले. यामध्ये वाहनाचे गॅरेज, सुट्ट्या भागांची दुकाने, कापडाची दुकाने, किराणा दुकाने सिल्लोड शहरामध्ये सुरू झाली. त्यामुळे सिल्लोडची बाजारपेठ नावारूपास आली. सुरुवातीला 1250 मे. टन. गाळप क्षमता असलेल्या कारखान्याच्या गाळप क्षमतेचा विस्तार करून 2000 मे. टन क्षमता करण्यात आली. तसेच  त्यांनी 30,000 लीटर प्रतिदिन क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला.

सिल्लोड तालुक्यात सहकारी तत्त्वावर चालणारे जिनिंग प्रेसिंग, मार्केट कमिटी, खरेदीविक्री संघ, औद्योगिक वसाहत इ. संस्थाच्या स्थापनेमध्येही पालोदकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठवाड्यातील सिल्लोड तालुक्याला सहकारी संस्थांची ओळख त्यांच्यामुळेच झाली. त्यांनी अत्यंत काटकसरीने, सचोटीने व कार्यक्षमतेने काम करून कारखाना चालविला. त्यांनी कष्टकरी, शेतकरी व कामगार यांचे हित जोपासले व सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सभासद व कर्मचारी यांना कुटुंबातील सदस्यांसारखे सांभाळले.

सिल्लोड तालुक्यातील गोर-गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पालोदकर यांनी आस्थेने राजर्षि शाहू शिक्षण संस्था स्थापन केली. आज या संस्थेचे यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिल्लोड येथे कार्यरत असून सिल्लोड व फुलंब्री या तालुक्यामध्ये 10 माध्यमिक शाळा चालविण्यात येत आहेत. मुलींचे वसतिगृह, कन्याशाळा तसेच इंग्रजी शाळा सुरू करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने पालोदकर यांच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली. ते 1985 मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात बांधकाम व उत्पादन शुल्क राज्यमंत्री होते. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सहकार व महसूल राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्ष, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. ते 1990 मध्ये विधान सभेवर पुन्हा निवडून आले. याप्रमाणे एकूण पंधरा वर्षे त्यांनी विधानसभेत सिल्लोड मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिले. ते रेल्वे बोर्ड हैद्राबाद विभाग सिकंदराबादच्या कमिटीवर सदस्य म्हणून कार्यरत होते. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व वसंतदादा शुगर संस्था, पुणे या संस्थेचे सदस्य होते.

पालोदकर यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केल्यानंतर उद्योगधंदे, व्यापार उद्योग यांना चालना मिळण्यासाठी व होतकरू सुशिक्षित बेकारांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँकेची सिल्लोड येथे स्थापना करण्यातही पुढाकार घेतला. त्यांनी सिद्धेश्वर नागरी पतसंस्थेची स्थापनाही केली. सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँकेने पुढे औरंगाबाद व जालना जिल्ह्यामध्ये 3 शाखाही उघडल्या.

- संपादित

पालोदकर, माणिक सांडूजी