Skip to main content
x

पानतावणे, गंगाधर विठोबाजी

   वैचारिक आणि संशोधनपर लेखन करणारे गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडील गिरणीमध्ये कामगार होते. मात्र त्यांना एक शैक्षणिक दृष्टी होती. आपल्या मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना वाटत होते. वडिलांप्रमाणेच पानतावणे यांच्या शिक्षकांनीही त्यांच्या मनात शिक्षणाविषयीची जिज्ञासा उत्पन्न केली आणि ते संस्कार त्यांच्या पुढील वाटचालीस उपयोगी ठरले. लहानपणी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात पानतावणे जात होते. अंगावर लाल सदरा, खाकी पँट आणि हातात निळा झेंडा घेऊन  त्यांनी संचलन केले आहे, तसेच मैदानावर कवायतही केली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरच्या डी.सी.मिशन स्कूलमध्ये व माध्यमिक शिक्षण नवयुग विद्यालय व पटवर्धन हायस्कूल, नागपूर या ठिकाणी झाले. १९५६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९६०साली बी.ए. व १९६२ साली एम.ए. या पदव्या त्यांनी नागपूर विद्यापीठातून संपादन केल्या. एम.ए. झाल्यानंतर म.ना.वानखेडे यांच्या सल्ल्यानुसार पानतावणे यांनी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. तेथेच ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या निर्मितीची बीजे आहेत. १९८० या वर्षी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठी वृत्तपत्रीय लेखनाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर प्रबंध लिहून ते त्या वेळच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. झाले. कालांतराने त्याच विद्यापीठाच्या मराठी विभागात त्यांनी अध्यापन केले आणि मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. 

१९५५-५६च्या सुमारास पानतावणे यांनी काव्यलेखन केले. ‘सुषमा’, ‘वीणा’, ‘प्रतिष्ठान’, ‘युगवाणी’ यांसारख्या नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या. नंतर ते लोकसाहित्याकडे वळलेले दिसतात. १९५७ सालच्या ‘लोकसत्ते’च्या दिवाळी अंकात त्यांचा लोकसाहित्यासंबंधीचा लेख प्रकाशित झाला. ‘युगवाणी’, ‘वसंत’, ‘रोहिणी’ या मासिकांतूनही त्यांचे लोकसाहित्य विषयक लेख प्रसिद्ध झाले. याच काळात त्यांनी कथालेखनही केले. १९५७ मध्ये ‘माणुसकीचं बंड’ या नावाचे नाटक त्यांनी लिहिले. या नाटकामध्ये समाजजीवनाला वाहून घेणार्‍या एका त्यागी पुरुषाची कथा रंगविली आहे. या नाटकाचे सहा प्रयोग झाल्यानंतर ते बंद झाले, कारण त्यात प्रक्षोभ आहे; अशी बरीच चर्चा झाली. त्यांच्या साहित्यनिर्मितीची सुरुवात जरी ललितसाहित्याने झाली असली, तरी त्यांना मान्यता मिळवून दिली ती वैचारिक व संशोधनपर लेखनाने. साहित्याबरोबरच समाज व संस्कृती या विषयांच्या अभ्यासात व चिंतनात ते रमले. त्यांनी केलेले ‘मूल्यवेध’ (१९७६), ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’ (१९७६),  ‘दलितांचे प्रबोधन’ (१९७८),  ‘वादळाचे वंशज’ (१९८२), ‘प्रबोधनाच्या दिशा’ (१९८४), ‘चैत्य’ (१९९०), ‘साहित्य: प्रकृती आणि प्रवृत्ती’ (१९९९), ‘साहित्य: शोध आणि संवाद’ (२००५), ‘लेणी’ हे त्यांचे समीक्षात्मक लेखन आणि  ‘दलित वैचारिक वाङ्मय’ हे त्यांचे संशोधनपर लेखन त्यांच्या समीक्षादृष्टीचा व संशोधकीय क्षमतेचा परिचय करून देणारे आहे. ‘हलगी’ हा लेखसंग्रह, ‘स्मृतिशेष’ हा व्यक्तिविषयक लेखांचा संग्रह आणि ‘मूकनायक’ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र)  व ‘पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ ही आंबेडकरविषयक पुस्तके नावाजली गेली. त्यांची संपादित ग्रंथसंपदा मोठी आहे. ‘दलित आत्मकथन’, ‘दलित कथा’, ‘विचारयुगाचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘लोकचळवळींचे प्रणेते: महात्मा जोतीबा फुले’, ‘महारांचा सांस्कृतिक इतिहास’, ‘लोकरंग’, ‘स्त्री आत्मकथन’, ‘धर्मचर्चा’, ‘दलित साहित्य: चर्चा आणि चिंतन’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख’ (१९९८) इत्यादींचा तीत समावेश होतो. 

विपुल ग्रंथसंपदेप्रमाणेच पानतावणे हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या संपादनकार्यामुळे. दलित साहित्याच्या चळवळीला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाची सुरुवात, त्याची जोपासना व प्रस्थापना हे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य होय. दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची चर्चा सबंध महाराष्ट्रात ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातूनच झाली. ‘अस्मितादर्श’ म्हणजे अस्मितेचा आरसा. या अस्मितेचा संबंध इतिहासाशी तसेच वर्तमानाशी आहे. परिवर्तनाच्या चळवळीशी बांधील असणारे सर्व जण ‘अस्मितादर्श’च्या विचारमंचाशी निगडित आहेत. या नियतकालिकामधून अनेक तरुण दलित लेखकांच्या वाटचालीला पानतावणे यांनी प्रोत्साहन दिले. अनेक उदयोन्मुख लेखक-कवींना हेरून, उत्तेजन देऊन त्यांनी दलित लेखक घडवले. ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाने नवलेखकांना प्रशिक्षित केले. साहित्याचा विचार समग्र जीवनाच्या संदर्भात करणे गरजेचे असते, याची जाणीव त्यांच्या ठिकाणी उत्पन्न केली. दलित साहित्याची सातत्याने अभ्यासपूर्वक पाठराखण करून दलित साहित्याला व चळवळीला योग्य दिशा दाखवण्याचे, तिच्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याचे काम पानतावणे यांनी निष्ठापूर्वक पार पाडले. विद्रोह, नकार आणि निषेध ही त्रिसूत्री पानतावणे यांनी दलित लेखकांच्या मनात रुजविली. ‘अस्मितादर्श’चे सातत्याने भरलेले मेळावे ही महाराष्ट्रातील फार मोठी सांस्कृतिक घटना ठरली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गौतम बुद्ध व महात्मा फुले यांच्या विचारांवर अधिष्ठित आहे, मानवी प्रतिष्ठेची प्रस्थापना हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि वैज्ञानिकता व वस्तुनिष्ठानुभुती हे या विचाराचे पोषणद्रव्य आहे, ही पानतावणे यांच्या विचारांची दिशा आहे. दलित संस्कृती ही सर्वहारासंस्कृती आहे व आत्मशोधाच्या बळातून या संस्कृतीला नवे परिमाण लाभले आहे, ही भूमिका पानतावणे यांच्या वैचारिक मांडणीतून व्यक्त होते. ‘मूल्यवेध’ हा त्यांचा ग्रंथ जीवनाकडे व साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा समग्र दृष्टिकोन व्यक्त करतो. ‘मूकनायक’ हे लहानसे चरित्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवते. ‘वादळाचे वंशज’मधून त्यांनी आंबेडकरपूर्व काळातील दलितांच्या मुक्तीसाठी ज्या-ज्या दलित व्यक्तींनी आपले आयुष्य खर्ची घातले, त्या-त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला आहे. ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’ ह्या ग्रंथातून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या तत्त्वांवर नवा समाज निर्माण करावयाचा असेल, तर विषमतेविरुद्ध विद्रोह पुकारावाच लागेल, असे विचारप्रतिपादन पानतावणे यांनी केले आहे. ‘पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ हा त्यांचा ग्रंथ पीएच.डी. पदवीसाठी लिहिलेल्या प्रबंधावर आधारित ग्रंथ आहे. तो ग्रंथ पत्रकारितेच्या क्षेत्रातील बाबासाहेबांच्या कामाचा उलगडा करतो. आपल्या प्रबंधातून पानतावणे यांनी बाबासाहेब हे थोर ध्येयवादी पत्रकार कसे होते, ते त्यांच्या पत्रकारितेचे वेगवेगळे पैलू सुस्पष्ट करून सांगितले आहे. साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, मानववंशशास्त्र हे सर्व पानतावणे यांच्या विचारविश्वातील विषय आहेत त्यामुळे त्यांच्या लेखनातून समृद्ध अशी साहित्यमीमांसा केली गेली आहे. दलित साहित्यप्रवाहाचा उदय, या प्रवाहास प्रस्थापितांनी केलेला विरोध, या विरोधाला पानतावणे यांनी दिलेली तर्कशुद्ध उत्तरे, आंबेडकरी विचारव्यूहाचा उपयोग करून दलित साहित्याला त्यांनी मिळवून दिलेली प्रतिष्ठा हे पानतावणे यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. 

दलित साहित्यासंबंधी मीमांसा करताना त्यांच्या दृष्टीपुढे मराठी साहित्याचा संपूर्ण परिप्रेक्ष्य उभा असतोे. त्यांची वाङ्मयीन निरीक्षणे मार्मिक असतात. साडेसातशे वर्षांचा मराठी साहित्याचा इतिहास ते अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. “कधी हे साहित्य नियतीच्या भोवर्‍यात अडकले तर कधी टाळ -मृदंगाच्या घोषात स्वत्व विसरून गेले, कधी या साहित्याने ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करण्यात धन्यता मानली, तर कधी परभृतता आणि परपुष्टतेत आत्मानंद व्यक्त केला. अघळपघळ होत असला तरी पश्चिमी डगला अंगावर चढवून कधी अस्सलपणाचा खोटा आनंद मिळवला तर कधी जीवनाच्या मूलभूत आशयाला पाठमोरे होऊन बद्द नाणेही कलदार म्हणून जयघोष करू लागले. पायात चाळ बांधून लावण्यवतीच्या कमरेला बिलगणारे साहित्य जसे इथे निर्माण झाले तसे कमरेखालचे साहित्यही दिमाखाने पदक्षेप करू लागले.” पानतावणे यांच्या या भाष्यासंबंधी मतभेद होऊ शकतील, परंतु त्यामधील स्वतंत्र वैचारिकतेची प्रभावी शक्ती नाकारता येत नाही.

पानतावणे यांनी दलित साहित्याची पाठराखण अधिकारवाणीने केली आहे. “दलित साहित्याने अंधार नाकारला आहे कलंकित भूतकाळ नाकारला आहे, मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत.” असे प्रतिपादन पानतावणे करतात. समूहनिष्ठता हे दलित साहित्याचे अपूर्वत्व असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्याचप्रमाणे दलित साहित्यावरील नकारात्मकतेचा आक्षेप त्यांनी धुडकावून लावला आहे. दलित साहित्य हे पुराणव्यवस्थेला, तदुद्भुत मानसिकतेला व विचारांना नकार देते, ही क्रांती आहे. हे भान त्यांनी समाजमनात उत्पन्न केले. माणसा-माणसांतील सौहार्द, सामाजिक न्यायोचितता, मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा यांचा दलित साहित्याने केलेला पुरस्कार ही नकाराची सकारात्मक बाजू आहे 

पानतावणे यांनी केलेल्या कार्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार (लंडन), दिल्लीच्या अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार, इचलकरंजी येथील फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य- संस्कृती मंडळाची गौरववृत्ती इत्यादी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. त्यांचे ग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारांनी गौरविले गेले आहेत. अभिव्यक्ती मराठवाडा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, चंद्रपूर येथील आंबेडकरवादी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, अमेरिकेत अयोजित केलेले पहिले विश्वमराठी साहित्य संमेलन (फेब्रुवारी २००९) अशा अनेकानेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. वेगवेगळ्या व्याख्यानमाला त्यांनी गुंफल्या आहेत आणि समाजप्रबोधनाचे व विचारपरिवर्तनाचे त्यांचे कार्य तर अखंड सुरू आहे.

२०१८ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या नातेवाईकांनी तो स्वीकारला. 

- प्रा. डॉ. विलास खोले/ आर्या जोशी

पानतावणे, गंगाधर विठोबाजी