Skip to main content
x

पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र

     मराठी भाषेतील प्राचीन संत चरित्राचे लेखक, वक्ते आणि ग्रंथकार म्हणून उभ्या महाराष्ट्रात आदराने स्थान भूषविणाऱ्या लक्ष्मण रामचंद्र पांगारकरांचा जन्म पुण्याजवळील पौडगावचा. त्यांच्या मातोश्रीचे नाव जानकीबाई होते. पांगारकर यांचे प्रारंभीचे शिक्षण पुणे इथे झाले. त्यांनी बी.ए. झाल्यावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली. त्यांना सुरुवातीला पुण्यात आणि नंतर वऱ्हाडात जावे लागले. शिक्षकाची नोकरी करताना पांगारकरांना संत एकनाथांच्या साहित्याची गोडी लागली. नंतरच्या काळात मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर यांच्या रचना ते मुखोद्गत करू लागले. पाठांतर आणि ग्रहणशक्ती चांगली असल्याने ते कण्ठस्थ काव्य सुरात म्हणत असत. ते नित्याच्या बोलण्यातसुद्धा संतांची अवतरणे देत. नंतर त्यांना शिक्षकी पेशा अडचणीचा वाटू लागला. आवाज मधुर असल्याने पुढे-पुढे ते संतांच्या रचना गाऊन दाखवत असत. व्याख्याने, प्रवचने, वारकरी संप्रदायाची कीर्तने करण्यात त्यांना रस वाटू लागला. भावभक्तीपूर्ण शब्दांत संतांची रसाळ चरित्रे लिहिण्याची हातोटी याच काळात त्यांना साधली. शिक्षकाच्या नोकरीत त्यांना रस उरला नाही. जसा काळ जाऊ लागला, तसे पांगारकर भक्तीमार्गी संत बनले. पंढरीची वारी, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखाने हरिनाम यांतच ते गुंतले. संतांचा महिमा गाता-गाता त्यांची रसाळ चरित्रे लिहिते झाले. त्यातूनच भक्तीमार्गप्रदीप (शके १८६६) हा पहिला ग्रंथ अस्तित्वात आला. त्यांच्या रसाळ पण बुद्धिनिष्ठ कीर्तन-प्रवचनांतून श्रोते मंत्रमुग्ध होत असत. लेखनातही विद्वत्ता-चिकित्सा-रसिकता असल्याने नव्या पिढीला ती संतचरित्रे ‘पुराणातली वानगी’ न वाटता परंपरेचा ठेवा वाटू लागली. पांगारकरांच्या लेखणीने-वाणीने महाराष्ट्रात एक नवे पर्व निर्माण झाले.

     मोरोपंतांच्या शैलीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे नंतरच्या काळात मोरोपंतांचे चरित्र आणि काव्य-विवेचन ग्रंथ लिहून पराडकरांच्या अभ्यासाचा पाया त्यांनी घातला (इ.स.१९१५). एकनाथी भागवत रसाळ भाषेत लिहून भागवत पारायणाची सुरुवात करून दिली. ती आजतागायत खेड्यापाड्यांतून परंपरेने वर्षानुवर्षे समारंभपूर्वक चालू आहे. ‘ज्ञानेश्वरांची प्रभावळ’ (इ.स. १९२८) या ग्रंथाने ज्ञानदेवांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ (खंड १-३, इ.स. १९३५-३६) लिहून त्यांनी मराठी भाषिकांवर अनंत उपकार केले. ‘नारदभक्तिसूत्रे’ हा त्यांचा आणखी एक ग्रंथ! जो भक्ति सांप्रदायिकांत लोकप्रिय ठरला. ‘चरित्रचंद्र’ नावाने आत्मचरित्र लिहून आपले अंतरबाह्य प्रेमळ-रसाळ जीवन लोकांच्या समोर व्यक्त केले (१९३८). हे चरित्र वाचताना त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग लोक अनुभवतात.

     मराठी वाङ्मयाचा इतिहास हा पूर्व उल्लेखित ग्रंथ तीन खंडांत आणि तीन कालखंडांत विभागला आहे. १) ज्ञानेश्वर-नामदेव काळ. २) एकनाथ काळ. ३) तुकाराम-रामदास काळ. यांखेरीज पांगारकरांनी बरेचसे स्फुट लेखन केले. त्यांच्या ‘भक्तिमार्गप्रदीप’ ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. असे भाग्य आजवर इतर कोणालाही लाभले नाही.

    पांगारकरांवर त्यांच्या सुहृदांनी ‘पांगारकर साहित्य गौरव’, ‘पांगारकर स्मारक ग्रंथ भाग १-२’ आणि ‘पांगारकर स्मृति-सुमने’ असे तीन ग्रंथ लिहिले  आहेत.

वा.ल. मंजूळ

पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र