Skip to main content
x

पारीख, अरविंद नटवरलाल

रविंद नटवरलाल पारीख यांचा जन्म अहमदाबाद येथे, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा छोटा, स्वतंत्र व्यवसाय होता, तर आई चंद्रकला श्रीमंत कुटुंबातील होती. आजोबा गोवर्धन पारीख हे शैक्षणिक अधिकारी असून त्यांना गाण्याची आवड होती. बडोद्यात असताना पारीख सतार शिकले होते. आकाशवाणीवरील संगीत सभाही ते ऐकत. यातूनच अरविंद पारीखांनाही संगीतामध्ये रुची निर्माण झाली. त्यांच्या आईने त्यांना संगीत शिकण्यास विशेष प्रोत्साहन दिले.
अरविंद पारीख यांनी अकराव्या वर्षी संगीत शिकायला प्रारंभ केला. सुरुवातीला अहमदाबाद येथील गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व ग्वालियर घराण्याचे गायक गोपाळ जोशी यांच्याकडून ते दिलरुबा शिकले. त्यांचे शालेय शिक्षण अहमदाबादच्या चिमणलाल नगिनदास विद्यालयातून झाले. याच शाळेतील संगीत विभागातील प्राणलाल शहांकडून ते व्हायोलिन शिकले. याबरोबरच त्यांना मॅण्डोलिनदेखील येत होते. शाळेमध्ये असताना त्यांनी दिलरुबावर पंकज मलिकचे गाणे वाजवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तसेच, ज्युथिका रॉय या बंगाली गायिकेबरोबर मॅण्डोलिनची साथ केली होती.
वयाच्या बाराव्या वर्षी पारीख यांनी मकरंद बादशहा या वादकाकडे सतार शिकायला सुरुवात केली. मकरंद बादशाह हे आग्रा घराण्याचे उस्ताद अताहुसेन आणि मुशर्रफखान बीनकार यांचे शिष्य होते. याच सुमारास पारीख यांनी विलायत खाँची सतार ऐकली व ते प्रभावित झाले व मनोमन त्यांनाच गुरू करायचे असा त्यांनी निर्धार केला. त्यांची १९४४ साली विलायत खाँकडे तालीम सुरू झाली. ते १९४५ साली ते मुंबईत आले. पुढे १९५६ साली त्यांनी विलायत खाँचा गंडा बांधला.
अरविंद पारीख यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत, एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले. १९४८ साली ते मुंबई विद्यापीठाचे पदवीधर झाले. घरच्या पारंपरिक कापड उद्योगात त्यांना फारसा रस नव्हता. ते वडिलांच्या ‘ली अ‍ॅन्ड म्युरिहेड’ कंपनीचे काम पाहू लागले.
विलायत खाँसाहेबांची तालीम पारीख यांना अव्याहत चाळीस वर्षे मिळाली. १९४७ साली पारीख यांनी पहिल्यांदा आकाशवाणीवर कार्यक्रम सादर केला. येथून त्यांची सांगीतिक कारकीर्द सुरू झाली. अनेक संगीत संमेलनांतून त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. याचबरोबर परदेशांतही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचा १९४९ साली मुंबईच्या किशोरी जव्हेरी यांच्याशी विवाह झाला. किशोरी पारीख नृत्य आणि संगीतात प्रवीण असून इंडियन नॅशनल थिएटरच्या नृत्यनाट्यांमध्ये काम करीत.
संगीताच्या क्षेत्रातील त्यांचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे १९९० पासून संगीत क्षेत्रातील विविध विषयांवर आयोजित केलेल्या कार्यशाळा व चर्चासत्रे होय. इंटरनॅशनल म्युझिक काउन्सिल आणि संगीत रिसर्च अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एनसीपीए आणि म्युझिक फोरम (प.) यांच्या सहकार्याने ही चर्चासत्रे गेली वीस वर्षे होत आहेत. भारतातील आणि भारताबाहेरील भारतीय संगीतातील कलाकार, तसेच संगीतशास्त्राचे अभ्यासक यांचा यात  सहभाग  असतो.
अनेक विषयांवर या चर्चासत्रांमध्ये चर्चा झाल्या असून या चर्चेचे लिखित स्वरूपही उपलब्ध करून दिले जाते. परंपरा आणि बदल, वैश्विकीकरण आणि भारतीय संगीत, वाद्यनिर्माते, सतार, सारंगी, तानपुरा इत्यादी विषय या चर्चासत्रांत आजवर घेतले गेले आहेत. त्यांचे भारतीय संगीतातील विचारमंथनाच्या दृष्टीने केलेले हे कार्य महत्त्वाचे आहे. याशिवाय अनेक गायक-वादकांचे ध्वनिमुद्रण (दस्तऐवजीकरण) त्यांनी करून ठेवले आहे. त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या ‘गुंजीकौंस’ या रागाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाची सीडी, इंडियन म्युझिक, न्यूयॉर्क यांनी निर्माण केली आहे. याशिवाय इतरही कंपन्यांनी त्यांच्या वादनाच्या ध्वनिचकत्या काढल्या आहेत.
ते ऑल इंडिया म्युझीशियन ग्रुपचे प्रमुख सदस्य आहेत. तसेच त्यांनी भारतीय संगीताला उद्योगक्षेत्रातून मोठे सहकार्य मिळवून देण्याचे काम केले. अरविंद पारीख यांनी अनेक शिष्य तयार केले असून सुवर्णलता राव, दीपक राजा, गणेश मोहन, विनायक चित्तार, भूपाल पणशीकर, शुभाषा मिश्रा, वंदना शहानी इत्यादींचा यांत समावेश होतो.

रंजना पोहनकर, माधव इमारते

पारीख, अरविंद नटवरलाल