Skip to main content
x

पाटील, भानुदास पंढरीनाथ

     सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गाव हे भानुदास पंढरीनाथ पाटील यांचे मूळ गाव. एका सामान्य शेतकरी कुटुंबात भानुदास पाटील त्यांचा जन्म झाला. त्यांनी सोलापूरमध्ये बी.ए. व बी.टी. ह्या पदव्या मिळविल्या. व्यवसायाच्या निमित्ताने पाटील कुटुंब नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावात आले. त्या काळात गावात एकही विद्यालय नव्हते. गावातील गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय नव्हती. या मुलांना इंग्रजी शिक्षण द्यावे या विचाराने पाटील यांनी पिंपळगाव बसवंत येथे १० जून १९४२ रोजी पिंपळगाव माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या शिक्षकी पेशास सुरुवात झाली.

     प्रारंभी चौथी पास झालेल्या मुलांसाठी इंग्रजी पहिली व सातवी पास झालेल्या मुलांसाठी स्वतंत्र वर्ग अशा दोन वर्गांनी शाळा सुरू झाली. सुरूवातीची पाच वर्षे हे दोन वर्ग गावाबाहेरच्या धर्मशाळेत भरत असत. पिंपळगाव परिसरातील अनेक खेड्यांत हिंडून शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण द्यावे म्हणून पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रबोधन केले. ते स्वत: शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने लोकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. पण शिक्षक खेड्यातील शाळेत नोकरी करण्यास तयार नसत. तेव्हा गावातील उच्चशिक्षित, वकील यांनी त्यांच्यावरील लोभामुळे मानधन न घेता शाळेतील विषय शिकविले.

      पाटील मुख्याध्यापक असल्याने गावात त्यांना मोठा मान होता. लोक त्यांना आदराने बाबासाहेब म्हणत. त्यांच्या शब्दाखातर गावकऱ्यांनी आर्थिक मदत केली. मुलांना शाळेत फीमध्ये सवलत मिळू लागली. घरचे पीक आल्यावर शुल्क भरण्याची सवलतही होती. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून निष्ठेने प्रयत्न करणारे सहकारी शिक्षक शाळेला मिळाले. या सर्व गोष्टींमुळे मुलांची संख्या वाढत गेली. शाळेसाठी इमारतीची गरज भासू लागली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांना शासनाने संस्थेला अकरा एकर जागा दिली. खेडोपाडी हिंडून त्यांनी इमारतीसाठी निधी जमविला. त्यातूनच शाळेची अठरा खोल्यांची भव्य इमारत इभी राहिली. निफाड, चांदवड, दिंडोरी तालुक्यांतील हे एकच विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची गरज निर्माण झाली. तीही पूर्ण झाली. उत्तम व्यवस्थापन असलेले १४ खोल्यांचे वसतिगृह बांधले. या सर्व काळात पाटील त्यांनी कधीही पूर्ण पगार घेतला नाही.

      सन १९६१ पासून शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची प्रथा सुरू झाली. पहिल्याच वर्षी या पुरस्कारासाठी पाटील यांची निवड झाली. ग्रामीण भागातून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले पाटील या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.

- प्रा. सुहासिनी पटेल

पाटील, भानुदास पंढरीनाथ