पाटील, गणेश हरी
रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिलेल्या ‘रानजाई’ काव्यसंग्रहाचे कवी गणेश हरी पाटील यांचे जन्मगाव जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी आहे. पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण, त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बी.ए. पदवी धारण केलेले पाटील मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून बी.टी. झाले. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये नोकरी केल्यानंतर ते जळगाव, धुळे, बोर्डी, पुणे येथील ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन ह्या संस्थेचे प्राचार्य होते. काही काळ शिक्षण अधिकारी पद भूषविल्यानंतर १९६२ साली ते निवृत्त झाले. अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांना नियुक्त केले होते. पाठ्यपुस्तकातून समाविष्ट झालेल्या त्यांच्या बालकविता गेल्या तीन पिढ्यांना मुखोद्गत होत्या. पाटील यांच्या सर्वच कविता वृत्तबद्ध आहेत.
‘रानजाई’तल्या कविता शांताबाई शेळके यांना खूप आवडल्या, कारण त्यांतल्या अनेक कवितांमध्ये पाटलांनी रंगवलेला निसर्ग हा माझ्या भोवतालचा, माझ्या ओळखीचा होता. ती सोनावळीची फुले, ती खुळखुळे वाजवणारी तरवड बाळे..... या सार्याची पाटलांनी आपल्या कवितेतून रेखाटलेली शब्दचित्रे पाहून मी मुग्ध होऊन गेले. या शब्दांत दाद देऊन त्या स्पष्ट करतात की, त्यांच्या ‘कवितेमधून हा निसर्ग जेव्हा मला भेटला, तेव्हा त्याचे साधे रूप किती वेधक आहे; हे मनाला खोलपणे उमगले. इतकेच नव्हे, तर आपलीच एक नवी ओळख स्वतःला पटावी तसे काहीसे मला वाटले. पाटलांच्या कवितेशी शांताबाईंचे जिव्हाळ्याचे नाते जडले कारण दोघांचे गाव एकच.
रविकिरण मंडळाच्या कवींचा व तांबे यांच्या काव्याचाही दाट प्रभाव पाटलांवर पडला असून निखळ प्रांजलपणा हे पाटलांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे. प्रांजळपणाच्या जोडीला तिच्यात सहजता, अकृत्रिमता व सहजसुंदर बालभाव आहे. आपल्या अनुभवविश्वाशी इमान राखल्यामुळे ही गुणसंपदा तिला लाभलेली आहे. कृत्रिम, संकरभाषेचा वापर न करताही जानपद भाव व्यक्त करता येतो, हे पाटलांनी दाखवून दिले.
पाटलांच्या कवितेत साहित्य हेच एकमेव प्रयोजन जाणवते. त्यात कसलाही आव व उमाळा नाही. ‘रानजाई’ हा त्यांच्या कवितेचा अत्यंत समर्पक प्रतीक ठरतो.
पाटील यांची जानपदगीते अथवा भलरी गीतेही लोकप्रिय झाली होती. ‘नागरभाषा न वापरता केलेले प्रत्ययकारी चित्रण, हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. त्यामुळे समकालीन कवींमध्ये त्यांची कविता उठून दिसली’, असा त्यांच्या कन्या मंदा खांडगे यांचा अभिप्राय आहे. पाटील यांच्या ‘गस्तवाल्याच्या गीतां’भोवती एक अद्भुततेचे वलय आहे. मराठीत अशा प्रकारची कविता फार थोड्या कवींनी रचली आहे. रसाळ आणि प्रासादिक असे शे-सव्वाशे अभंगही त्यांनी रचले. ‘पाखरांची शाळा’ (१९६०) या संग्रहात अवीट गोडीच्या बालकविता आहेत. त्यांतील निवडक बालगीतांची ध्वनिफितही प्रकाशित झाली आहे.
‘रानजाई’ला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार, ‘लिंबोळ्या’ ला (१९६१) राज्य सरकार तर ‘पाखरांच्या शाळेला’ राज्य सरकार व केंद्र सरकार ह्यांचे पुरस्कार लाभले आहेत. १९८९ साली बालकुमार साहित्य संमेलनातर्फे पाटील यांचा गौरव करण्यात आला.
‘पदविका शिक्षण व अध्ययन’, ‘एका कर्मवीराची कहाणी’, ‘आधुनिक शिक्षणशास्त्र’, ‘भाषेचा अभ्यास’, ‘वाङ्मय लेखन’, ‘नवीन सोपे मोडी वाचन’ ही त्यांची इतर ग्रंथसंपदा आहे.