पाटील, गणपत धुळोजी
गणपत धुळोजी पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळ या गावी झाला. त्यांनी १९४७मध्ये कृषी विषयातील बी.एस्सी. (कृषी)ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या कृषी विभागात कामाला सुरुवात केली. १९५७मध्ये सरकारी सेवेत असतानाच त्यांनी वनस्पतिशास्त्र या विषयामध्ये एम.एस्सी. (कृषी) ही पदवी प्रथम वर्गात प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलिया येथील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात १९६६-१९६८ या दोन वर्षांत गव्हाच्या पैदाशी संदर्भातील प्रशिक्षण घेतले. त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी धामणसकर व कोल्हापूर संस्थानाची शिष्यवृत्ती मिळाली होती. ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षणासाठी कोलंबो योजनेतील शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यांना पुणे, अकोला व कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयांमध्ये वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
गणपत पाटील यांची १९७३मध्ये जळगाव येथे गळीतधान्य-विशेषज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी १९७४मध्ये भुईमुगाचा जे.एल. २४ आणि फुले प्रगती हा वाण निवड पद्धतीने तयार केला. हा वाण ८५-९० दिवसांच्या कालावधीत दुपटीने उत्पन्न देतो. या वाणाच्या फुलोर्याचा कालावधी २० ते २५ दिवसांचा असून उशिरा पाऊस न झाल्यास उत्पादनात विशेष घट येत नाही. या वाणामुळे राज्याच्या भुईमुगाच्या उत्पादनात क्रांतिकारक वाढ होऊ लागली. या संशोधन कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्कार, सुवर्णपदक व रोख पारितोषिक देऊन १९८४ साली सत्कार केला.
सदर वाण महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांतही पसरला. पाटील यांनी तिळाच्या फुले तीळ नं. १, करडईचा तारा व कारळ्याचा आय.जी.पी. ७६ या वाणाचीही निर्मिती केलेली आहे. पाटील यांना अॅस्पी रीसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे आंतरराज्य भुईमूग पीक स्पर्धेचे प्रथम पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे एकूण ३३ संशोधनपर लेख प्रकाशित झालेले आहेत.
- संपादित