Skip to main content
x

पाटील, कृष्णराव महारू

के. एम. बापू पाटील

कृष्णराव महारू पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या गावी झाला. त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर खानदेश विधी महाविद्यालयातून एलएल.बी.ची पदवी मिळवली. त्यावेळेस ते खानदेश विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते. एलएल. बी. ची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पाचोरा व जळगाव येथे वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

के. एम. बापू पाटील यांना 1957 मध्ये काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती. परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात असल्यामुळे ते पराभूत झाले. ते 1958 मध्ये जिल्हा विकास व नियोजन मंडळाचे मानद सचिव म्हणून काम पाहात होते, तर 1962 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.

पाटील 1962 ते 1965 या काळात जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांची 1965 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांची 1970 मध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या सर्व संस्थांचे अध्यक्षस्थान भूषवित असताना पाटील यांनी जिल्ह्यातील सहकारी कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी साखर कारखाने व सूतगिरण्यांना कर्जपुरवठा करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

पाटील 1972 मध्ये पाचोरा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांना 1973 मध्ये अखिल भारतीय कापूस संघटनेचे अध्यक्षपद मिळाले. त्यांची राज्याच्या विविध शासकीय समित्यांचे कार्यकारी सभासद म्हणूनही नेमणूक झाली. राज्याच्या मंत्रिमंडळात 1974 मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. ते 1976 मध्ये राज्याचे आरोग्य व ग्रामविकास मंत्री झाले. ते 1980 मध्ये पुन्हा एकदा पाचोरा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. याच काळात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली. ते 1990 मध्ये तिसर्‍यांदा पाचोरा मतदारसंघाचे आमदार झाले.

वयाच्या 76 व्या वर्षी दीर्घकाळ आजारी असताना, मुंबईहून पाचोरा येथे नेत असताना वाटेतच इगतपुरीजवळ त्यांचे निधन झाले.

- संपादित

पाटील, कृष्णराव महारू