Skip to main content
x

पाटील, मनोहर देवराव

     मनोहर देवराव पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात वरोरा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव गोपिकाबाई पाटील होते. लहानपणापासून ‘भाऊ’ या टोपणनावाने ते परिचित होते. घरी एकूण पाच भावंडे होती. घरात शैक्षणिक वातावरण होते. त्यामुळे मनोहरराव पाटील यांनी बी.एस्सी. कृषी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. नागपूर येथे विद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी व पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी संबंध आला. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते. कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर ते वरोरा या जन्मगावी परत आले. या जन्मभूमीलाच त्यांनी स्वतःची कर्मभूमी मानले. कृषी - पदवीधर असल्यामुळे त्यांनी नव्या तंत्रज्ञानासह शेतीला प्रारंभ केला. घरी शेती भरपूर असल्यामुळे त्यांच्या कौशल्याला विशेष वाव मिळाला.

      भाऊ कृषी पदवीधर होते. १९४० - ४१ च्या सुमारास म्हणजे शिक्षण संपून वरोरा येथे आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रासाठी काय करता येईल या संबंधी त्यांचे चिंतन सुरू होते. सहकाऱ्यांशी चर्चा होत होती. आराखडे तयार होत होते. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या चळवळीत उत्साहाने सहभागी झाला होता. लोकमान्य टिळकांची राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना, महात्मा गांधींची बुनियादी शिक्षण पद्धती, या बरोबरच स्वदेशी चळवळ यांनी सर्वत्र भारावलेले वातावरण होते. याच प्रेरणेतून राष्ट्रीय शिक्षण देणारी शिक्षण संस्था वरोरा गावात असावी असे त्यांना वाटले. या शिक्षणसंस्थेने अशा शाळा चालवाव्यात ज्यातून शिक्षणाइतकेच संस्कारही कोवळ्या विद्यार्थी मनावर रुजले पाहिजेत असे त्यांना वाटले आणि त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्‍चित केले. १९५१ मध्ये मनोहरभाऊंनी लोक शिक्षण संस्थेची स्थापना केली. लोक शिक्षण संस्था पंजीकृत झाली. लोकमान्य विद्यालय, वरोरा या नावाने वर्ग ५ ते वर्ग १० पर्यंतचे शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. लोकमान्य विद्यालयाचे काम मनोहरभाऊ पाटील यांच्या मालकीच्या इमारतीत सुरू झाले. लोकमान्य विद्यालयाला पहिली दहा वर्षे शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान नव्हते. शिक्षक - कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर प्रशासकीय खर्च स्वतः संस्थापकांनी सोसला. शाळेतील शिक्षक रजेवर गेल्यास विनावेतन अध्यापन केले. सेवा, सचोटी आणि स्नेहभाव या गुणांसोबतच कडक शिस्त, करारीपणा, कल्पकता या वैशिष्ट्यांची जोड त्यांच्या कार्यात दिसून येते. १९५१ मध्ये ते संस्थेचे उपाध्यक्ष होते. १९६४ मध्ये संस्थेचे कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाहतापाहता संस्थेचा शैक्षणिक विस्तार भाऊंच्या मार्गदर्शनाखाली होऊ लागला. १९५१ मध्ये लोकमान्य विद्यालय, १९५९ मध्ये लोकमान्य कन्या विद्यालय, १९६४ मध्ये लोकमान्य प्राथमिक विद्यालय त्यांनी चालविले. १९६५ पासून शालान्त परीक्षेत सातत्याने बोर्डाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची नावे झळकू लागली. संस्थेची स्वतंत्र इमारत, सेवाव्रती निष्ठेने काम करणारा शिक्षकवर्ग त्यांनी सोबत घेतला. शिक्षण, कला, सांस्कृतिक, संगीत यांचा समन्वय साधून त्यांनी विविध उपक्रम विद्यालयात राबविले. संस्थेचा स्वतंत्र रंगमंच त्यांनी उभारला. वरोऱ्यातील सर्व सांस्कृतिक संस्थांना विनामूल्य रंगमंच उपलब्ध करून दिला. व्यावसायिक नाटके देखील याच रंगमंचावरून सादर होत होती.

     स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती होती. या कलेच्या प्रोत्साहनासाठी त्यांनी स्वतः नाटकात अभिनय केला. १९६५ च्या गोवामुक्ती संग्रामात ते सहभागी झाले. त्यात त्यांनी कारावास भोगला. १९७५ च्या आणीबाणीतही ते अठरा महिने मिसा कायद्याअंतर्गत तुरुंगात होते. भाऊसाहेबांची योजकता आणि नियोजन हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण होते. मनोहरभाऊ पाटील यांचे केवळ संस्थेपुरतेच नव्हे तर वरोरा गावातील कला, संगीत व शिक्षण या क्षेत्राला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

      - प्रा. श्रीकांत पाटील

पाटील, मनोहर देवराव