Skip to main content
x

पाटील (मुरुमकार), जयप्रकाश शाळिग्राम

      जयप्रकाश शाळिग्राम पाटील यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील शिवणी गावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव शांताबाई होते. जयप्रकाश पाटील हे १९८९मध्ये वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले. त्यांची ८ एकर शेती एळवण कानशिवणी रस्त्यावर तर ७ एकर शेती सातारागाव बाळापूर शेगाव रस्त्यावर आहे. ते सेंद्रिय शेतीचे निष्ठावान कार्यकर्ते . त्यांनी कधीही रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केला नाही. ते पुण्याच्या महाऑर्गेनिक फार्मिंग फेडरेशनचे विदर्भाचे समन्वयक म्हणून काम करतात. आपल्या कुटुंबाला लागणारे धान्य ते सेंद्रिय खत देऊनच पिकवतात. ते सूतकताई करून वर्धा येथील गोपुरी संस्थेमध्ये देऊन कापड घेतात आणि त्याच स्वदेशी कापडाचे कपडे वापरतात. त्यांनी शेतीवर शेततळे व रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोगही केले आहेत. त्यांच्या शेतीवर गॅबियन बंधारे बांधून पाणी अडवले आहे.  गांडूळ खत व गोबर गॅस प्रकल्प वापरत आहेत. त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून तूर, मूग, उडीद, हरभरा ही पिके घेतलेली आहेत. त्यांनी मिनी दालमिल खरेदी केली असून ते घरीच तूर, मूग, उडीद व हरभऱ्याच्या डाळी तयार करतात.

पाटील मधुमक्षिकापालन करतात. दरवर्षी ते मध तयार करून विक्री करतात. त्यांनी आपल्या शेतीवर तुतीची लागवड केलेली आहे व रेशीम किडेपालन ते यशस्वीरीत्या करत आहेत. ते रेशमाच्या कोषांची विक्री करतात आणि सर्वसाधारणपणे एक लाख रुपये उत्पन्न मिळवतात. पाटील यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन केले आहे. ते निंबोणी अर्क तयार करून, तसेच गोमूत्र व भिंगरी याचा वापर करून कीडनियंत्रण करतात. पाटील हे एक बहुआयामी, सतत परिश्रम करणारे व सूतकताई करून स्वदेशी कापड वापरणारे शेतकरी असल्यामुळे त्यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

 

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].