Skip to main content
x

पाटील, निवृत्तिनाथ रावजी

गीतकार

 

निवृत्तिनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी या गावी झाला. तासगावच्या प्राथमिक शाळेत मराठी चौथीच्या वर्गात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. वि.स. पागे हे निवृत्तिनाथांचे गुरुतुल्य शाळकरी मित्र. पागे यांना कादंबरीकार ह.ना. आपटे यांच्या उष:कालया कादंबरीतील सावळ्याया व्यक्तिरेखेत   आणि निवृत्तिनाथांमध्ये कमालीचे साम्य आढळले. त्यामुळे ते निवृत्ती यांना सावळ्याया नावानेच संबोधू लागले. पी. सावळाराम यांनी निवृत्तिनाथ रावजी पाटीलया नावाने सुरुवातीची गाणी लिहिली; पण त्याच वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर एका बासरीवादकाचे नाव निवृत्तिनाथ पाटील असे प्रक्षेपित झालेले त्यांनी ऐकले. या नामसाधर्म्यामुळे काही घोटाळा होऊ नये व आपण काहीतरी वेगळे नाव घ्यावे म्हणून त्या काळी प्रचलित असलेल्या सी. रामचंद्र, व्ही. शांताराम या शैलीप्रमाणे त्यांनी पी. सावळारामअसे नाव धारण केले.

पी. सावळाराम पुढील शिक्षणासाठी तासगावहून कोल्हापूरला आले. एका शिक्षकाने व एका मित्राने त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय केली. पुढे त्यांची मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या सौजन्याने सार्‍या अडचणी दूर झाल्या. राजाराम महाविद्यालयात त्यांना कविवर्य माधव ज्युलियन (पटवर्धन) यांच्यासारखा महान साहित्यिक गुरू म्हणून लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ त्यांना झाला. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते सातार्‍याला गेले, कारण तिथे एका सरकारी हायस्कूलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. आचार्य अत्रे यांच्यासारखे आपणही बी.ए., बी.टी. व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. परंतु त्याच सुमारास १९४२मध्ये चलेजावचळवळ जोमाने सुरू झाली आणि ते बी.टी. परीक्षेत अपयशी झाले.

१९४३ मध्ये विवाहानंतर त्यांनी ठाण्यात आपला संसार सुरू केला. १९४५ मध्ये त्यांना शिधावाटप अधीक्षकाची नोकरी मिळाली. ही नोकरी सांभाळूनच त्यांनी गीतलेखनाकडे आपली लेखणी वळवली. याच सुमारास पी. सावळारामांनी लिहिलेली दोन गाणी कोलंबिया ग्रामोफोन कंपनीच्या वसंतराव कामेरकर यांच्याकडे आली. त्या वेळी वसंत प्रभू या नव्या संगीतकाराचे नाव कामेरकरांच्या कानावर आले होते. त्यांनी वसंत प्रभूंकडे या गाण्यांचे संगीत सोपवले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही दोन्ही गाणी गाजली नाहीत, पण वसंत प्रभूंच्या संगीतातली चुणूक कामेरकरांच्या लक्षात आली आणि लवकरच पी. सावळाराम व वसंत प्रभू या जोडीचे गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’ हे लता मंगेशकर यांच्या स्वरातले भावगीत घरोघर पोहोचले. या भावगीताने इतिहास घडवला.

१९५० साली निर्माता-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या रामराम पाव्हणंया चित्रपटापासून पी. सावळाराम चित्रपटाचे गीतकार झाले. या चित्रपटापासून, म्हणजे १९५० पासून ते १९८५ च्या गड जेजुरी जेजुरीपर्यंत सुमारे ५० बोलपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. चित्रपटाव्यतिरिक्त लिहिलेल्या भावगीत, भक्तिगीत, लावण्या, गवळणी इ. गीतांची संख्या सुमारे १२५ आहे. पी. सावळाराम हे भावगीत कवी म्हणूनच ओळखले जातात. त्यांची सर्व भावगीते गाजली. महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी ती बसली. भावगीते लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पी. सावळाराम हे पहिले चित्रपट गीतकार होत. म्हणूनच लोकांनी त्यांना जनकवीही उपाधी प्रेमाने बहाल केली.

पी. सावळाराम यांनी नांदायला जातेया चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व गीतांसह निर्मिती केली होती. बाळ माझं नवसाचंया चित्रपटाची कथाही त्यांनी लिहिली होती. सलामीचित्रपटाची पटकथा-संवाद त्यांनी लिहिले होते व पुत्र व्हावा ऐसाचीही कथा-पटकथा संवाद त्यांचेच होते.

पी. सावळाराम हे काही काळ ठाण्याचे नगराध्यक्ष होते. गीतलेखनासाठी दिला जाणारा ग.दि. माडगूळकर पुरस्कारत्यांना मिळाला होता.

पी. सावळाराम यांच्या नावाने ठाणे महानगर पालिका दर वर्षी चित्रपटातील मान्यवर स्त्री, पुरुष व नवोदित कलावंत यांना पुरस्कार देत असते.

- मधू पोतदार

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].