Skip to main content
x

पाटील, पांडुरंग दादासाहेब

पांडुरंग दादासाहेब पाटील यांचा जन्म कराड येथे झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथील शाळा क्र. 1 मध्ये झाले. व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेमध्ये त्यांचा सातारा जिल्ह्यात चोवीसावा क्रमांक आला तर इयत्ता सातवीच्या परीक्षेत त्यांचा जिल्ह्यात क्रमांक आल्यामुळे घराच्या जवळ असलेल्या टिळक विद्यालयात त्यांना विनासायास प्रवेश मिळाला. मात्र टिळक विद्यालयात त्यांनी केवळ उत्तीर्ण होण्याएवढे गुण मिळवून शरीरयष्टी संपादन करण्याकडे अधिक लक्ष दिले. त्यांनी कुस्ती, पोहणे, सायकलिंग, क्रिकेट, कबड्डी या खेळांवर लक्ष केंद्रित केले. ‘मल्लविद्या’ या कृ. भा. सूर्यवंशी यांच्या पुस्तकात चटकदार कुस्ती खेळणारा मल्ल अशी त्यांच्या नावाची नोंद आढळते. त्या काळी टिळक विद्यालयाची जनरल चॅम्पियनशीप त्यांच्याच नावावर होती.

पाटील यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता वकील होण्याचा निश्चय केला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांची बहुजन समाजातील गुणी विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी बडोदा येथे इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले. ते 1943 मध्ये कोल्हापूर येथून एस.एस.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय अभ्यासपूर्ण रीतीने सांभाळला.

पाटील यांनी कराड नगरपालिकेतून नानासाहेब बुधकर यांच्या नेतत्त्वाखाली आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात केली. अनेक असुविधा असणार्‍या कराड नगरपालिकेचा कायापालट करण्यात पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी 1952 च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघात यशवंतराव चव्हाण यांच्याशी चुरशीची लढत दिली. तेव्हा यशवंतराव चव्हाण फक्त 208 मतांनी विजयी झाले होते. यशवंतराव चव्हाण यांनी 1962 मध्ये पाटील यांचीच कराड उत्तर मतदार संघाचे राजकीय वारस म्हणून निवड केली.

पाटील 41 वर्षांपेक्षाही अधिक काळ कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या प्रदीर्घ काळात त्यांनी शहरातील रस्ते, रस्त्यांवरील दिवे, कार्यालयांना भव्य इमारती, भाजी मंडई, भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा, सार्वजनिक सभास्थाने, स्मशानभूमी, भूकंपग्रस्तांना मदत, व्याख्यानमाला, प्राथमिक शाळांच्या इमारतींची बांधणी, शिवाजी क्रीडासंकुल, प्रीतिसंगम-यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान याप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

पाटील यांची विधानपरिषदेवरही नियुक्ती झाली होती. त्यानंतर 3 वेळा उत्तर कराड मतदारसंघाचे आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. सह्याद्री सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्यामध्येही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्याशिवाय 35 लिफ्ट इरिगेशन योजना, शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा, यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, वेणुताई चव्हाण कला व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठातील नामांकन मिळवलेल्या अनेक संस्था या पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचीच साक्ष आहे.

- संपादित

पाटील, पांडुरंग दादासाहेब