पाटील, राजाराम बापू
राजाराम बापू पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कासेगाव येथे झाला. त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायातील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण अनुक्रमे कासेगाव व नेर्ले येथे झाले. ते पुणे येथील शिवाजी मराठा विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी बडोद्याला महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्यांना सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती मिळाली होती.
पाटील यांनी 1942 ते 1945 या कालावधीत मंदिरप्रवेश व परदेशी कपड्यांची होळी अशा कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच ते युवक सेवादलाच्या कार्यातही सहभागी झाले. त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी कोल्हापुरातील साईकल कायदे महाविद्यालयातून कायद्याची पदवीही प्राप्त केली. कासेगाव या आपल्या जन्मगावी व त्या आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षणाची सोय नाही व त्यासाठी गावातील मुलांना बाहेरगावी जावे लागते, हे लक्षात घेऊन त्यांनी 1945 मध्ये कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तेथे शिक्षक म्हणून विनावेतन नोकरी केली. आजूबाजूच्या गावातून शाळेत येणार्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय करण्यासाठी सर्वोदय वसतिगृह सुरू केले. या शाळेला सानेगुरुजींनी भेट दिली होती. ते 1946 मध्ये विवाहबद्ध झाले.
समाजकार्य करत असतानाच पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. ते सातारा स्थानिक मंडळावर बिनविरोध निवडून आले. तसेच ते स्कूल बोर्डाचेही अध्यक्ष झाले. सातारा येथे त्यांनी युवकांचे लोकजागृती हे अभ्यास मंडळ स्थापन केले. ते 1951 मध्ये सांगली जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी प्रत्येक गावात शाळा व सक्तीचे मोफत शिक्षण या योजना यशस्वीपणे राबवल्या. ते 1952 ते 1962 या काळात सांगली जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात शाळांच्या इमारती, पिण्याच्या पाण्याचे आड, वाचनालये, जोडरस्ते, पंचायत घरे, नदीकाठावरील गावांना नावा यांसारख्या मूलभूत गोष्टींकडे जातीने लक्ष दिले. त्यांची 1957 मध्ये सांगली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स बोर्डाचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांची 1959 मध्ये प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
पाटील 1962 मध्ये वाळवा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हा ते महसूल व वन उपमंत्री झाले. ते 1965 मध्ये कॅबिनेट दर्जाचे महसूलमंत्री झाले. तेव्हा त्यांनी शेतकर्यांना उपयुक्त अशी खातेपुस्तिका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ते 1967 मध्ये दुसर्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांना सहकार, उद्योग व वीज ही खाती मिळाली. त्यावेळेस त्यांनी औद्योगिक वसाहती स्थापन करण्याला प्राधान्य दिले. 1975 मध्ये वीस कलमी कार्यक्रमाच्या प्रसारासाठी पाटील यांनी वाळवे तालुक्यात 97 गावांमध्ये 650 किलोमीटर पदयात्रा केली.
राज्यपातळीवरील राजकारणात सक्रिय असतानाच पाटील यांनी वाळवे तालुक्यातील विकासकेंद्रे विकसित करण्यावर भर दिला. साखर कारखाना, दूध संघ, सूत गिरणी, बँक, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा संस्थांची स्थापना करून त्यांनी परिसराच्या विकासाला संस्थात्मक रूप देण्याचा विधायक प्रयत्न केला. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम, चर्चासत्रे व शिबिरे असे उपक्रम यशस्वीपणे राबविले.
पाटील यांनी 1977 मध्ये काँग्रेस पक्षाचा त्याग केला व ते जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. पुरोगामी लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.
- संपादित