Skip to main content
x

पाटील, शिवाजी गिरधर

शिवाजी गिरधर पाटील यांचा जन्म खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अत्यंत लहानशा डांगरी येथे झाला. त्यांचे आई-वडील कष्टाळू व पुरोगामी प्रवृत्तीचे होते. त्यांच्या आईचे नाव येणूमाय होते. त्यांचे शालेय शिक्षण आकोले, शहादा, दोंडाईचा, नांदगाव, अमळनेर अशा अनेक ठिकाणी झाले. त्यांनी इंग्रजी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पाटीलयांनीवयाच्या17व्या वर्षी सानेगुरुजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. रेल्वेस्टेशन, टपाल कार्यालय इ. जाळणे यांसारख्या कामांमुळे त्यांना 12 वर्षे कारावासाची शिक्षा झाली. त्यांनी धुळे कारागृहातून पलायन केले व भूमिगत झाले. त्यांनी हैद्राबाद, नागपूर, कानपूर, लखनऊ अशा अनेक ठिकाणच्या तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. पण ते पोलिसांच्या हाती लागले व त्यांना पुन्हा तुरूंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्व स्वातंत्र्यसैनिकांची मुक्तता करण्यात आली तेव्हा त्यांचीही मुक्तता झाली. आई-वडील, भाऊ, बहिणी, वहिनी असे त्यांच्या कुटुंबातील सर्व सभासद स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. म्हणून त्यांना सर्वांना तुरूंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या आईचे तर तुरूंगातच देहावसान झाले.

कारागृहामधून बाहेर पडल्यावर पाटील समाजकारण व राजकारण या क्षेत्राकडे वळले. सुरुवातीला पाटील यांनी कामगार चळवळीत भाग घेतला व ते ट्रेड युनियनचे सचिव झाले. त्यांनी रेल्वे कामगारांच्या उत्कर्षासाठी भरीव कार्य केले. त्यांच्यावर जगप्रकाश नारायण, नरेंद्र देव, ना.ग.गोरे, एस.एम.जोशी यांच्या विचाराचा प्रभाव होता. त्यांनी स्वत:ला प्रजासमाजवादीपक्षाच्या कार्यात झोकून दिले. त्यांनी पक्षसंघटनेसाठी फार कष्ट केले. ते प्रजासमाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रांत सचिव व अध्यक्ष झाले. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्याबरोबर पक्षबांधणीच्या कामात मोठे योगदान दिले. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सचिवपदही भूषविले. पाटील 5 जानेवारी 1947 रोजी नाशिक येथील विद्या पाटील यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांना विद्याबाईंची संसारात फार मोठी साथ लाभली. त्यांनी  परिचारिकेची नोकरी करून प्रपंचाला आर्थिक हातभार लावला. पाटील पक्षाच्या आदेशामुळे 1952 पासून राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी सहकारी साखर कारखानदारीत फार मजल मारली. त्यांनी शिरपूर येथे सहकारी साखर कारखाना उभारला.

पाटील यांनी कष्टाळू शेतकर्‍यांचे भले करताना कामगार व मजूर यांचे नेते म्हणून अथक मेहनत केली. त्यांच्या कारकीर्दीत विविध धरणे व बंधारे यांमुळे शिरपूर तालुका खर्‍या अर्थाने सुजलाम, सुफलाम झाला. त्यांनी मंत्री असताना आदिवासींना कष्टाच्या जमिनी त्यांच्या नावावर सातबारे देऊन करण्याचे महत्तम कार्य केले.

पाटील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नॅशनल साखर संघ, जागतिक ऊस व बीट उत्पादक संघाचे पाच वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. या संघटनेचे जागतिक कार्यालय फ्रान्समध्ये आहे. पाटील यांनी जागतिक इंटरनॅशनलकॉनफेडरेशन ऑफ लेबर या संघटनेच्या व जागतिक साखर संघाच्या परिषदांसाठी एकूण 45 देशांत प्रवास केला.

पाटील 1960 ते 1967 मध्ये विधानपरिषदेचे सदस्य म्हणून दोनदा निवडून आले. त्यांनी 1967 मध्ये पाटबंधारे, ऊर्जाप्रकल्प व राजशिष्टाचाराचे राज्यमंत्री व 1975 मध्ये सहकार मदतकार्य व विधान कार्याचे मंत्री म्हणून कार्य केले. ते 1992 ते 1998 असे सहा वर्षे राज्यसभेेचे सदस्य होते. सध्या ते एन.सी.यु.आय. व 22 कोटी व्यापारी संघटनेचे सदस्य व राष्ट्रीय सहकार उद्योग विकास संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पाटील यांनी 50 वर्षांच्या कारकिर्दीत राज्य व देश पातळीवर संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लक्षणीय व समर्थनीय काम केले. त्यांनी शिरपूर हे आपले कार्यक्षेत्र निवडून सहकारी साखर कारखाना, सहकारी संस्था यांच्यामार्फत शेतकर्‍यांना व आदिवासींना जमिनीचे हक्क मिळवून देण्याचे मूलभूत व महत्त्वाचे काम केले.

- प्रा. विश्वास पाटील

पाटील, शिवाजी गिरधर