Skip to main content
x

पाटील, स्मिता शिवाजी

     “At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen”, असे विधान प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट समीक्षक Elliott Stein यांनी स्मिता पाटील यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी केले होते. विलक्षण बोलके डोळे आणि त्याला धारदार अभिनयाची साथ लाभल्यामुळे स्मिता पाटील यांनी आपली अल्प कारकिर्द आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने गाजवली.

     रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांवर या अभिनेत्रीने आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. अवघ्या दीड दशकाच्या आपल्या कारकिर्दीत या अभिनेत्रीने विविधांगी भूमिका साकारत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील काही मोजक्या श्रेष्ठ अभिनेत्रींच्या रांगेत जाऊन बसण्याचा मान मिळवला.

     राजकीय नेते शिवाजीराव पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई यांच्या पोटी स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला. पुण्यातील रेणुका स्वरूप स्मृती हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्या मॅट्रिकला असतानाच त्यांचे वडील शिवाजीराव पाटील मंत्री झाले, पण स्मिता पाटील त्यांच्यासोबत मुंबईला न जाता पुण्यातच आपल्या एका मैत्रिणीकडे राहिल्या. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांचा थिएटर अ‍ॅकॅडमीच्या ग्रूपशी परिचय झाला. अभिनयातील त्यांचे पदार्पण झाले ते ‘तीव्र मध्यम’ या अरुण खोपकर दिग्दर्शित एफ.टी.आय.आय.च्या पदविका फिल्ममधून. त्यानंतर दोन वर्षांनी पुण्याहून मुंबईला आल्यावर दूरदर्शनच्या माध्यमातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या दूरदर्शन वाहिनीवर स्मिता पाटील वृत्तनिवेदिक म्हणून काम करू लागल्या.

     भारतात १९७७-७८च्या सुमारास ‘समांतर चित्रपटा’ची लाट आली. समांतर चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांनी आपल्या कारकिर्दीमधील तब्बल पाच वर्षे दिली. १९७५ साली दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या बालचित्रपटामधील ‘राणी’च्या भूमिकेपासून स्मिता पाटील यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. ‘मंथन’ (१९७७), ‘भूमिका’ (१९७७), ‘जैत रे जैत’ (१९७८), ‘गमन’ (१९७९), ‘बाजार’, ‘आक्रोश’ (१९८०), ‘चक्र’ (१९८१), ‘अर्थ’ (१९८३), ‘आखिर क्यों’(१९८५), ‘अमृत’ (१९८६), ‘मिर्चमसाला’ (१९८७) आदी चित्रपटांमधील व्यक्तिरेखांद्वारे त्यांनी आपल्यातील सशक्त अभिनेत्रीचे दर्शन घडवले. यापैकी ‘मंथन’ या चित्रपटामधील बिंदूच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराद्वारे गौरवण्यात आले.

     श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, केतन मेहता, डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांकडे काम केल्यामुळे स्मिता पाटील यांच्या अभिनयाला आणखी वेगळी झळाळी आली. ‘जैत रे जैत’ (१९७८) या चित्रपटातील ‘चिंधी’, तिच्या अंतर्गत ऊर्मीसह आपल्यासमोर येते, ती अर्थातच स्मिता पाटील यांच्या समर्थ अभिनयातून. नवऱ्याने सोडलेली चिंधी नाग्याच्या प्रेमात पडते व त्याला मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करते. राणी माशीमध्ये देवत्व शोधणाऱ्या नाग्याचा देवत्वाविषयीचा संघर्ष ती जाणते व नाग्याला मिळवण्यासाठी त्याच्या वेडेपणात सामील होऊन, राणी माशीला शोधण्यासाठी त्याच्यासोबत जाते. नाग्याचा वेडेपणा मनोमन माहीत असला तरी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी करावा लागणारा उघड संघर्ष ती मान्य करते. चिंधीचा प्रेमातला वेडेपणा स्मिता पाटील आपल्या अभिनयातून सकारात्मक पद्धतीने मांडतात व चिंधीच्या भूमिकेला न्याय देतात.

     डॉ. पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ या चित्रपटामध्ये पाटील यांनी साकारलेली सुलभा महाजन ही व्यक्तिरेखा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा मानली जाते. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिगत, सामाजिक पातळीवर अपयशी ठरलेल्या तरी स्वत:वर विश्‍वास असणाऱ्या स्त्रीची भूमिका रंगवली. सामाजिक कार्य करताना, ती काम करत असलेल्या आश्रमाकडून नाकारली जाते, तर सामाजिक कार्य करायला घराबाहेर पडली म्हणून घरातल्यांकडून नाकारली जाते. या दोन्ही पातळ्यांवरचा नकार ती ज्या ताकदीने पचवते, त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्त्वातील स्वतंत्रपण व समर्थपण जाणवून जाते. या व्यक्तिरेखेचा प्रवास त्यांनी आपल्या सहज व संयमित अभिनयातून उत्कृष्टपणे रेखाटला आहे.

     मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि तेलगू अशा आठ भाषांमधील चित्रपटांमध्ये स्मिता पाटील यांनी काम केले. १९७५ ते १९८२ या काळात आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे त्यांनी सोने केले. कलात्मक चित्रपटामधील काम वाखाणले गेल्यानंतर त्यांनी व्यावसायिक चित्रपटांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्या काळात समांतर चित्रपटांच्या चळवळीत नासिरुद्दीन शाह, ओम पुरी यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या; परंतु, तरीदेखील त्यांना व्यावसायिक चित्रपटांमध्ये संधी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. स्मिता पाटील यांना मात्र खूप लवकर व्यावसायिक संधी प्राप्त झाली आणि या अभिनेत्रीने त्याचा खूप चांगला लाभ उठवला. अमिताभ बच्चन यांची कारकिर्द ऐन भरात असताना स्मिता पाटील यांना या महानायकाबरोबर नायिका म्हणून झळकण्याची संधी मिळाली, ती त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे. ‘शक्ती’ आणि ‘नमक हलाल’ या दोन्ही चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायमच्या स्मरणात राहिल्या.

     राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्र्रीय स्तरावरही स्मिता पाटील यांच्या कामाचा गौरव करण्यात आला. कोस्टा गॅव्हरास या आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठ दिग्दर्शकाने फ्रान्समध्ये स्मिता पाटील यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवला होता. अशा प्रकारचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय अभिनेत्री ठरल्या. माँट्रियल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांनी परीक्षकाची भूमिका निभावली होती. १९८५ मध्ये नैरोबी येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेमध्ये स्मिता पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २६ जानेवारी १९८५ रोजी केंद्र सरकारने स्मिता पाटील यांचा ‘पद्मश्री’ किताबाद्वारे सन्मान केला.

     स्मिता पाटील यांनी चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्याशी विवाह केला होता. उण्यापुऱ्या १० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी एकूण ८० चित्रपटांमध्ये काम केले होते. प्रसूतिपश्‍चात झालेल्या आजारपणामुळे त्यांचे वयाच्या ३१व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले.

- संपादित

संदर्भ
१) ताम्हाणे ललिता, 'स्मिता स्मित आणि मी', राजहंस प्रकाशन, पुणे; २००९.
२) देशपांडे रेखा, 'स्मिता पाटील', श्रीविद्या प्रकाशन, पुणे; १९८७.
पाटील, स्मिता शिवाजी