Skip to main content
x

पाटील, शंकर बाजीराव

भाऊ पाटील

     शंकर बाजीराव पाटील यांचा जन्म इंदापूर तालुक्यातील बावडा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. म्हणून त्यांचे नाव ‘शंकर’ ठेवण्यात आले. पण पुढे ते भाऊ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे शिक्षण पुणे येथील नानावाड्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी 1941 मध्ये मॅट्रिकमध्ये यश संपादन केल्यानंतर त्यांनी ज्ञानार्जनाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी फर्गसन महाविद्यालयामधून अर्थशास्त्र विषयात बी.ए.ची पदवी मिळवली, त्यानंतर पुण्याच्याच आय.एल.एस. महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी घेतली व नंतर स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण होऊन सहाय्य क निबंधक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. परंतु सामाजिक कार्यच करायचे हे ठरवून त्यांनी राजपत्रित अधिकार्‍याची नोकरी न स्वीकारता इंदापूर येथेच 1949 मध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. सोबत त्यांचे सामाजिक कार्यदेखील सुरू होते. राष्ट्र सेवा दलातील त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांना इंदापूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली.

     पाटील यांनी 1950 मध्ये बावडा गावात राष्ट्र सेवा दलामार्फत 1500 मुलांची पदयात्रा काढून, तरुण वयातच राजकीय धुरिणांचे लक्ष वेधून घेतले. ते 1952 ते 1978 पर्यंत 26 वर्षे इंदापूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर ते 1980 च्या लोकसभा निवडणुकीतही खासदार म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या तप्त वातावरणात काँग्रेसविरोधी जनमत असूनही पुणे शहर व जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकमेव जागेवर काँग्रेसला विजय मिळाला तो शंकररावांच्याच रूपाने.

     पाटील यांचा 1962 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात,दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन या खात्याचे उपमंत्री म्हणून समावेश झाला. त्या काळात महाराष्ट्रात एखाददुसरीच दुग्ध उत्पादक सहकारी सोसायटी होती. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे दुधासाठी परप्रांतावर अवलंबून होती. सातशे कि. मी. अंतरावरून या शहरांमध्ये दूध येत असे.

     पाटील यांनी पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला दुग्ध क्षेत्रात संपन्न करण्याची योजना आखली. त्यातूनच महाराष्ट्रात दूध सोसायट्यांचे जाळे उभे राहिले. आरे, वरळी येथील डेअरी व शासकीय गवळीवाडे हे त्यांच्याच कामगिरीचे फळ आहे. त्यांचा दुग्ध व्यवसायाचा आराखडा आजही व्यावसायिकांना मार्गदर्शक ठरत आहे. दूध महापूर योजनेची गंगोत्री पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सुरू झाली. त्यांनी कामगारमंत्री म्हणून कामगार कल्याण केंद्राच्या कामाला गती दिली.

     पाटील यांनी सहकारी साखर कारखाना व कामगार यांच्यामध्ये घडविलेल्या यशस्वी चर्चेला ‘पाटील निवाडा’ म्हणून संबोधले जाते. त्यांनीच माथाडी कामगारांसाठी आदर्श सेवा नियमावली तयार करून दिली. त्यामुळे माथाडी कामगारांना आर्थिक न्याय मिळू शकला आणि मालक व कामगार या दोघांनाही समान न्याय मिळेल असे वातावरण तयार झाले. त्यांच्याच कारकीर्दीत भारतात माथाडी कामगारांसाठी पहिला कायदा तयार झाला. त्यांच्याकडून शेतकर्‍यांसाठी खातीपुस्तिका तयार करण्याचे मोठे काम शंकररावांकडून झाले आहे. त्यांनी मुंबईतील मोलकरणींचे प्रश्न सोडविण्यात देखील महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले.

     त्यांनी इंदापूर या आपल्या मूळ तालुक्यात 1971 मध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामार्फत शिक्षण प्रसाराचे काम केले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. शासकीय कर्मचार्‍यांची संघटना व शासन यांच्यात एक दमडीदेखील देणार नाही या तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरील 1978 च्या संपकाळात त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळेच कर्मचार्‍यांना चौथा वेतन आयोग लागू होऊ शकला. शंकररावांनी 1984 मध्ये इंदापूर सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून तालुक्यातील 15 हजार कुटुंबांना रोजगार मिळवून दिला. या कारखान्याला आजवर राष्ट्रीय स्तरावरील दोन पारितोषिके मिळाली आहेत.

     शंकररावांनी पुढील काळात निरा-भिमा सहकारी कारखाना, दूधगंगा दूध उत्पादक संघ, इंदापूर येथील आय.टी.आय., पिंपरी-चिंचवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजी शिक्षण संस्था अशा विविध क्षेत्रांतील संस्था उभ्या केल्या.

     पाटील यांनी आपल्या तीन तपांच्या सामाजिक, राजकीय कार्यात चारित्र्यवान, सुसंस्कृत राजकारणी तसेच सहकार क्षेत्राचा दिशादर्शक अशी ओळख जनसामान्यांमध्ये ठसविली.

     पाटील हे कलारसिकसुद्धा होते. त्याची चुणूक त्यांनी बालवयातच राष्ट्र सेवा दलात काम करताना शास्त्रीय संगीत संवर्धनासाठी स्थापन केलेल्या संगीत मंडळातून दाखविली होती. त्यांना अभिजात संगीताची आवड होती.

- संदीप राऊत

पाटील, शंकर बाजीराव