Skip to main content
x

पाटील, वसुधा पद्माकर

   सुधा पद्माकर पाटील यांचा जन्म मुंबईत झाला. (प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण म्युनिसिपल शाळेत व माध्यमिक इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण गोरेगावच्या अ.भि.गोरेगावकर हायस्कुलात तर चौथीपासून सातवीपर्यंतचे (आत्ताची आठवी ते दहावी) शिक्षण पार्ले येथे पार्ले टिळक विद्यालयात झाले. मॅट्रिकला त्या शाळेत पहिल्या आल्या होत्या. मुंबईच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातून एम.ए., बी.एड. झाल्या. बी.ए.ला त्यांचे विषय इतिहास व मराठी तर एम.ए. बी.एडसाठी पेंटिंग हा विषय घेतला होता. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी आर्ट मास्टर ही पदवी संपादन केली. त्यांच्या कुटुंबात बहुतेक सर्व जण चित्रकलेत कुशल होते. वडिलांना वाचनाचा खूप छंद होता त्या वेळची सर्व प्रसिद्ध मराठी मासिके ते विकत घेत. घरी नियमाने रोज एक तास सामूहिक वाचन होई. मुलांसाठी ते गोष्टींची व पौराणिक पुस्तकेही खरेदी करीत. त्या वेळी गोरेगावला जंगलच असल्यामुळे वृक्षवेली व वनचरे ही वसुधाताईंची सोयरीच होती. वसुधाताईंच्या वयाच्या आठव्या वर्षी (१९३८) वडिलांचे निधन झाले आणि त्या बारा वर्षांच्या (१९४२) असताना आईचे निधन झाले. घरची बरीच कामे त्यांच्यावर पडली, तरी त्यांनी चिकाटीने शिक्षण पूर्ण केले.

१९४८ साली मॅट्रिक होताच त्या. अ.भि.गोरेगावकर हायस्कूलमध्ये शिक्षिका झाल्या व १९८१ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवृत्त झाल्या. नोकरी करीत असताना त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. विपुल वाचनातून त्यांना लेखनाची प्रेरणा मिळत राहिली व त्यांची पहिली कथा ‘वसुधा’ (१९५६) मासिकात तर पहिली एकांकिका १९६६च्या सुमारास ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाली. आत्तापर्यंत त्यांचे ३० कथासंग्रह, ३ कादंबर्‍या, ४ एकांकिका संग्रह, १ ललित-लेखन असे साहित्य संग्रह प्रसिद्ध झाले असून १ नाटक, १ कवितासंग्रह, २ नाट्यछटासंग्रह व २ कथासंग्रह हे ही साहित्य प्रकाशित झाले आहे. मराठी दूरदर्शनवर एक तासाची पहिली रंगीत कथा लिहिण्याचा मान वसुधाताईंना मिळाला आहे. युद्धभूमी विषयावर आधारित त्यांच्या एकांकिकेला बक्षीस मिळाले होते व श्री.वि.द घाटे यांनी त्यांचे कौतुकही केले होते. साचेबंद, ठराविक नसणार्‍या विषयांची नाट्यमय मांडणी, पकड घेणारे संवाद व उत्कृष्ट वातावरणनिर्मिती ही त्यांच्या एकांकिका-लेखनाची वैशिष्ट्ये होत. ‘सरहद्द’, ‘उत्खनन’ या एकांकिका व ‘वृद्धाश्रम’ हे नाटक रंगभूमीवर गाजले. कौटुंबिक व सामान्यतः हाताळल्या जाणार्‍या विषयांच्या पलीकडे जाऊन जीवनाच्या विविधांगी समस्यांचा भावस्पर्शी वेध घेणारी लेखिका म्हणून वसुधाताई यांनी मराठी साहित्यात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. नाटक व एकांकिका या साहित्यप्रकारांत स्त्रियांनी विशेष लेखन केले नसल्याने या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारी लेखिका म्हणून वसुधाताईंना मान मिळतो.

वसुधाताईंच्या ‘जमुना के तीर’ (१९६८), ‘वंशाचा दिवा’ (१९८६) आणि ‘वेगळी’ या तीन कथासंग्रहांना तसेच ‘पक्षितीर्थ’, ‘दीपगृह’, ‘समुद्रपक्षी’ या एकांकिका संग्रहांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार लाभले आहेत.

वसुधाताई यांच्या विपुल लेखनात ‘मालवून टाक दीप’, ‘निस्सार’, ‘अगतिक’ या कादंबर्‍या; ‘सारीपाट’, ‘भेट’, ‘अश्रद्धा’, ‘उडालेले रंग’, ‘पुरुष’, ‘सनई’, ‘हाडवैरी’, ‘शर्वरी’, ‘आक्की’, ‘अमृता’, ‘पंथ’, ‘नामर्द’ हे कथासंग्रह; ‘महाभारत’, ‘पियानो व इतर एकांकिका’ इत्यादींचा समावेश आहे.

- संपादक मंडळ

पाटील, वसुधा पद्माकर