Skip to main content
x

पाटकर, विजय अच्युत

      विजय अच्युत पाटकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. पाटकर कुटुंब गुजरात राज्यात बडोदा (वडोदरा) येथे स्थायिक झालेले होते. त्यांचे वडील अच्युत हे टाटा ऑइल मिलमध्ये नोकरीस होते. त्यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतल्याच एल्फिन्स्टन महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. लहानपणापासूनच त्यांना ‘ऑटोमोबाइल्स आणि एव्हिएशन’ या विषयांत रस होता. त्यांनी नंतर बडोदा विद्यापीठात ‘इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी’ला प्रवेश घेतला.

     अभियांत्रिकीला असताना ते चारही वर्षे एन.सी.सी.च्या एअर विंगमध्ये होते. या काळात त्यांनी बडोदा फ्लाइंग क्लबमधून पुष्पक  हे विमान उडवण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. विजय यांनी १९६३मध्ये अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच भारतीय वायुसेनेतील सेवेसाठी मुलाखत दिली होती. १९६०च्या दशकात भारत-चीन युद्धानंतर भारतीय वायुसेनेने  प्रवेशासाठी थेट प्रवेश योजना राबवली होती. त्या अंतर्गत मग डिसेंबर १९६२मध्ये ग्वाल्हेरमध्ये सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा आणि दिल्लीत वैद्यकीय चाचणी होती. या प्रक्रियेतून ते तावून-सुलाखून निघाले. विजय यांना जून १९६४मध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना भारतीय वायुसेनेचेे पायलट ऑफिसर पद बहाल करण्यात आले.

     इंजिनिअर झाल्यानंतर जुलै १९६५मध्ये त्यांनी बंगळुरू इथल्या एअर फोर्स तांत्रिक महाविद्यालयात ‘टेक्निकल सिग्नल’ या खात्यात सुरुवात केली. जुलै १९६६मध्ये प्रशिक्षणानंतर त्यांनी जोधपूर इथे सहा महिने ‘एअर सिग्नलर’ म्हणून काम करत प्रशिक्षण घेतले. त्यांचे पहिले पोस्टिंग देशाच्या पूर्व भागात ‘सी-११९ जी’ या विमानावर होते. लष्कराच्या दुर्गम भागात सामान ने-आण करणारे त्यांचे कार्गो विमान होते. त्यानंतर त्यांनी हवाई सेवेतली विविध ठिकाणची कामे केली. १९६८पासून ते पुण्यात, तर १९७०पासून दिल्लीतल्या पालम विमानतळावर होते. त्यावेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबरोबर विमानप्रवास करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘टीयू-१२४’ हे त्यावेळचे रशियन बनावटीचे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचे विमान होते. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, उपराष्ट्रपती गोपाल स्वरूप पाठक, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षित विमानप्रवासाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

     विमानाचे उड्डाण ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असली, तरी सहा वर्षांनतर विजय यांना विमान उड्डाणासंदर्भातल्या तांत्रिक बाजूचे काम पाहावे लागले. संगणकाच्या आगमनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे १९७३-७४मध्ये त्यांना आय.आय.टी.,मुंबई, टी.आय.एफ.आर. या संस्थांमध्ये, तर फ्रान्समधल्या संगणक निर्माण करणार्‍या कंपनीत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.

     १९७५ ते १९७८ या कालावधीत त्यांनी घेतलेले प्रशिक्षण प्रत्यक्ष वापरून रडार यंत्रणा, रडार डेटा या सर्वांचे संगणकीकरण केले. त्यांनी या संदर्भातले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तयार करण्याचे काम केले. यानंतर त्यांना आय.आय.टी. खरगपूरमध्ये ‘मायक्रोवेव्ह आणि रडार’ यंत्रणेत एम.टेक. करण्याची संधीही मिळाली. १९८०मध्ये एम.टेक. झाल्यावर वायुसेनेच्या मुख्यालयामध्ये स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते कार्यरत झाले.

     पुढच्या कालावधीत रशियन बनावटीच्या आय.एल.सारखे त्या वेळचे सर्वांत मोठे मालवाहू विमान असणे वायुसेनेला आवश्यक वाटू लागले. त्याकरिता १९८४मध्ये पाटकर यांना विंग कमांडर करून त्यांच्या हाताखाली चांगला गट रशियामध्येे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आला. तेथे प्रशिक्षण घेतले, तरी असे विमान आणण्यासाठीची पुरेशी यंत्रणा, विमान ठेवण्याची जागा (हँगर्स), शिड्या (लॅडर्स), इ. आवश्यक बाबी भारतात नव्हत्या. त्या सर्व तयार करण्याचा, या विमानाची दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्ग, तो चालवणारा कर्मचारी वर्ग तयार करणे ह्या सर्व जबाबदार्‍या पाटकर यांच्यावर होत्या. हा कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी त्यांनी अल्पकाळात प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली.

     या सेवेसाठी त्यांना १९८८मध्ये राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांच्या हस्ते ‘विशिष्ट सेवा पदक’ देण्यात आले. त्याच वेळी त्यांना ग्रूप कप्तानपदी बढती देण्यात आली. १९९५मध्ये पाटकर यांची नियुक्ती पुन्हा मुख्यालयामध्ये तांत्रिक संचालकपदी झाली. इथल्या सर्व हेलिकॉप्टर आणि विमानांची निगा राखण्याचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होते. ही विमाने रशियामधून घेतली होती.

     मात्र रशियाच्या झालेल्या विलगीकरणामुळे या कंपन्या बरखास्त झाल्या, विखुरल्या. अशा वेळी कोणत्याही प्रत्यक्ष निर्मिती केंद्राचे पाठबळ नसताना विमानांची निगा राखणे हे अतिशय कठीण काम पाटकर यांनी केले. ते पाच वर्षे या पदावर होते. इथेच त्यांना एअर व्हाइस मार्शल या पदावर बढती मिळाली. आणि २००१मध्ये याच कामासाठी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

     २००१मध्ये वेस्टर्न एअर कमांडमध्ये ‘सिनिअर मेन्टेेनन्स स्टाफ ऑफिसर’, नोव्हेंबर २००१पासून एअर मार्शल झाल्यावर ‘एअर ऑफिसर’ या पदांवर त्यांनी काम केले. इथे विमान, मिसाइल्स रडार, संदेशवहन, प्रत्यक्ष दळणवळणाची साधने यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी दोन वर्षे पेलली. त्याकरिता मार्च २००३मध्ये त्यांना राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

     जुलै २००४मध्ये नागपूर येथे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ऑफ मेन्टेनन्स कमांड’ पदी त्यांची नियुक्ती झाली. हे वायुसेनेत अभियंता अधिकार्‍याला मिळालेले अत्युच्च पद आहे. दहा महिने या पदावर काम केल्यानंतर एप्रिल २००५मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले.

     - पल्लवी गाडगीळ

पाटकर, विजय अच्युत