Skip to main content
x

पाटणकर, मनोहर सदाशिव

      नोहर सदाशिव पाटणकर यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे आजोबा रावबहादूर सीताराम गणेश पाटणकर हे अलिबाग येथे महसूल अधिकारी होते, तर वडील सदाशिव यांचा नागपूर येथे शीतगृह चालवण्याचा व्यवसाय होता. पाटणकर यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथील सुळे विद्यालयामध्ये झाले व मॉरिस महाविद्यालय, नागपूर येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांचे कला शाखेच्या पदवीचे शिक्षण सुरु असतानाच दुसर्‍या महायुद्धासाठी सैनिक भरती सुरू झाली. त्यातूनच त्यांनी ९ मार्च १९४२ रोजी सैन्यात ‘कमिशन ऑफिसर’ म्हणून ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’मध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना उत्तर आफ्रिकेत चाललेल्या महायुद्धात पाठविण्यात आले.

     महायुद्धात उत्तर आफ्रिकेतील जवळजवळ सर्व आघाड्यांवर त्यांनी काम केले. महायुद्धाच्या शेवटच्या काळात त्यांनी इटलीमध्ये १९४५पर्यंत ऑक्युपेशन फोर्समध्ये काम केले. मराठा लाइट इन्फन्ट्रीची ही बटालियन महायुद्धात अतिशय मर्दुमकीची कामगिरी करणारी ठरली. यात सुमारे पाचशे सैनिक मृत्युमुखी पडले, तर चौदाशेपेक्षा अधिक जायबंदी झाले. महायुद्धात कामगिरी करून मायदेशी परतलेल्या ह्या बटालियनला घेऊन पाटणकर यांना अफगाणिस्तानात ‘इप्पीच्या फकिराच्या’ टोळीच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. मराठा लाइट इन्फन्ट्रीत पॅराशूट विभाग त्यावेळी नुकताच सुरू झाला होता. त्यात ब्रिगेडियर अहमद उस्मान या अधिकाऱ्याच्या हाताखाली त्यांना पॅराशूट रेजिमेंटचे ‘ब्रिगेड मेजर’ म्हणून बढती मिळाली. दरम्यान पंजाबमध्ये जातीय दंग्याचा भडका उडाला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात तेथून हजारो हिंदूंना भारतात सुरक्षित परत आणण्याचे कठीण काम त्यांच्यावर सोपविण्यात आले.

      त्याच वेळी पाकिस्तानी टोळीवाले काश्मीरमध्ये घुसले. त्यांचा बिमोड करण्यासाठी पॅराशूट रेजिमेंटची बटालियनही काश्मीरमध्ये उतरली. या युद्धात ब्रिगेडियर अहमद उस्मान एका तोफगोळ्यामुळे मृत्युमुखी पडले व मेजर पाटणकर त्यात जखमी झाले.

     सप्टेंबर १९४८मध्ये पाटणकर यांना वेलिंग्टन येथील आर्मी स्टाफ कॉलेजमध्ये अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात आले. तेथून जनरल नागेश यांच्या हाताखाली त्यांनी दिल्लीत तीन वर्षे स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले.

     त्यानंतर पुन्हा मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये नेमणूक देऊन पाटणकर यांना तिबेटमध्ये याटुंग व ग्यान्से फोर्ट ह्या ठिकाणी पाठविण्यात आले. कोणताही रस्ता नसताना पंचवीस दिवस बर्फातून हिमालय पायी तुडवत मराठा लाइट इन्फन्ट्री त्या ठिकाणी पोहोचली. परंतु स्थानिक अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्याने ह्या रेजिमेंटला परत हिंदुस्थानला जाण्याचा हुकूम मिळाला. ग्यान्से फोर्टमध्ये काही भारतीय अधिकारी व ट्रेड एजंट ठेवून रेजिमेंट परत वळते ना वळते तोच एक हिमनग फुटून त्या पाण्याच्या लोंढ्यामुळे सबंध ग्यान्से किल्ला नष्ट झाला परंतु पाटणकर मात्र  ईश्वरकृपेने वाचले. यानंतर ते मराठा लाइट इन्फन्ट्रीचे प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर म्हणून काश्मीर-लडाख सरहद्दीवर अत्यंत कठीण अशा बर्फाळ प्रदेशात उतरले. रस्ते नसलेला निर्जन बर्फाळ प्रदेश, हिमनद्या व बर्फाचे तुफान ओढे हे निसर्गजन्य शत्रू व पाकिस्तानी आक्रमणखोरांशी त्यांना सतत लढावे लागले.

    २९ फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांचा विवाह इंदुमती पद्माकर देशमुख यांच्याशी झाला. याच दरम्यान त्यांना डेहराडून मिलिटरी अकॅडमीचे चीफ इन्स्ट्रक्टर म्हणून नेमण्यात आले.

     याच काळात इथियोपियाचे राजे हेले सेलासी यांच्याविरुद्ध तेथील सैनिकांनी बंड केले होते. राजे हेले सेलासी यांनी भारत सरकारला मदतीची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत भारत सरकारने भारतीय सैन्य इथिओपियामध्ये पाठविले. पाटणकर यांना ब्रिगेडियर म्हणून बढती देऊन त्यांची रवानगी आदिस अबाबा येथे भारतीय सैन्याचे प्रमुख म्हणून करण्यात आली. सैन्यात बंडाळी आणि या राष्ट्राची भाषा येत नसल्याने हिंदी फौजांना ही कामगिरी कठीणच होती. परंतु शांतता प्रस्थापित करून सैन्याला शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी इतके उत्तम केले, की राजे हेले सेलासी यांनी त्यांना ‘इथियोपियन स्टार ऑफ ऑनर ऑफ हाय ऑर्डर’ हा देशातील सर्वोच्च बहुमान दिला.

     पाटणकर यांना १९६७मध्ये मेजर जनरल म्हणून पदोन्नती मिळाली. जनरल ऑफिसर्स कमांडर म्हणून जम्मू आणि काश्मीर हा भाग त्यांच्या हाताखाली होता. या काळात आंतरराष्ट्रीय सीमारेषेतून होणार्‍या पाकिस्तानी घुसखोरीचे पारिपत्य करण्यासाठी त्यांनी एक विशेष विभाग उघडून नवीन यंत्रणा सुसज्ज केली. बांगलादेश युद्धात आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम या पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

     त्यांच्या सैनिकी जीवनातील असाधारण कर्तृत्वाचा सन्मान म्हणून १९७२मध्ये त्यांना राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांच्या हस्ते ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर १९ डिसेंबर १९७३ रोजी त्यांनी सैन्यातून मेजर जनरल या पदावरून निवृत्ती स्वीकारली. परंतु सरकारने त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी या पदावर दोन वर्षे नियुक्ती देऊन त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेतला. त्यानंतर ते आपले जन्मगाव पुणे येथे स्थायिक झाले.

     पाटणकर यांना ‘परमविशिष्ट सेवा पदका’बरोबर ‘इटली स्टार’, ‘जर्मनी स्टार’, ‘डिफेन्स ऑफ युरोप क्लास ८’ अशी एकूण १६ पदके मिळाली आहेत.

- विवेक कुलकर्णी

पाटणकर, मनोहर सदाशिव