Skip to main content
x

पाठक, अरुणचंद्र शंकरराव

      रुणचंद्र शंकरराव पाठक यांचा जन्म जालना जिल्ह्यातील अंबड या गावात झाला. त्यांचे विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा येथे झाले. १९९३ साली ‘गोदावरी खोरे एक पुरातत्त्वीय अभ्यास’ या विषयावर लघुप्रबंध सादर करून एम.फिल्. पदवी प्राप्त केली. तर विद्यावाचस्पती ही पदवी ‘गोदावरी खोरे एक सांस्कृतिक अभ्यास: महानुभाव स्थान पोथीच्या संदर्भात’ या विषयावर प्राप्त केली. आपल्या शोध प्रबंधामध्ये यादवकालीन नगर रचना, समाज जीवन, स्थापत्य विषयक विविध घटक यांची नोंद घेऊन त्यांनी चक्रधर परिभ्रमणाच्या अनुषंगाने काही विशेष बाबी अधोरेखित केल्या. त्यांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे तत्कालीन पैठण येथील १२५ वास्तूंची नोंद व स्थलनिश्चिती. चक्रधारांच्या अनुषंगाने महानुभाव साहित्यातील नोंदीआधारे गृहरचना, दुर्ग, जल व्यवस्थापन व एकूणच नगररचनेचा आराखडा स्पष्ट करता येतो, हे स्पष्ट केले.

     १३व्या शतकानंतर इस्लामिक आक्रमणामुळे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे संदर्भ बदलले व त्यामुळे अनेक स्मारके काळाच्या ओघात नष्ट झाली तर काहींमध्ये परिवर्तन केले गेले.

      चक्रधरांनी तत्कालीन महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण स्थानांना जाणीवपूर्वक भेट दिली होती. यात रामटेक, मनसर (जि. नागपूर) येथील स्मारके उदाहरणार्थ भोगराम मंदिर, पाचवे शतक. याची ओळख डॉ. पाठकांनी केलेल्या सर्वेक्षणाआधारे होते. नेवासा, पैठण यांसारखी स्थाने प्रागैतिहासिक व प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात होती. या स्थानांचे सातत्य चक्रधारांपर्यंत होते, ही बाब त्यांनी आपल्या संशोधनात्मक कामातून स्पष्ट केले. 

      ‘महाराष्ट्रातील बारव स्थापत्य’ या ग्रंथात त्यांनी पाणी व्यवस्थापनाच्या परंपरेचे व वास्तु-वैशिष्ट्याचे तपशीलात विवेचन केले आहे. मराठी भाषेत रूढ असलेल्या आड, विहीर, बारव, पोखरणी या शब्दांना असलेले स्वतंत्र अर्थ त्यांच्या या कामामुळे स्पष्ट झाले. पुरातत्त्व विभागात काम करीत असताना महालक्ष्मी मंदिर जागजी, शिरढोण जि. नांदेड येथील अष्टदिक्पालाची प्रभावळ असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती, यासारख्या काही बाबी प्रथमच विभागाच्या वतीने नोंदविल्या. पैठण, दौलताबाद, कंधार, वाशिम अशा ठिकाणी पुरातत्त्वीय गवेषण, उत्खनन कार्यांचा त्यांना अनुभव आहे. याशिवाय ‘मराठवाडा एक शोध’ या पुस्तकात पैठण, चारठाणा, धर्मपुरी, आंबाजोगाई यांसारख्या यादवकालीन नगरांवर प्रकाश टाकला.

      आपल्या संशोधनविषयक कामामध्ये राष्ट्रकूटकालीन जल व्यवस्थापन, कंधार येथील जगत्तुंग समुद्र जलाशयाची स्थल निश्चिती त्यांनी केली. त्यांचे पुढील विषयांवरील म्हणजेच महाराष्ट्रातील बारव स्थापत्य, स्थानपोथी पुरातत्त्वीय अभ्यास (यादवकालीन महाराष्ट्र), धारूर किल्ला (सहलेखकासह) असे ग्रंथ प्रकाशित आहेत तर इतिहास व पुरातत्त्व, लोककला या विषयांवर आधारित १०० पेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रकाशित आहेत व पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव; टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे; तसेच डेक्कन महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर कार्यरत आहेत.

     महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागात ते १९९७ पासून २०१६ पर्यंत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी विभागाचे प्रकाशित, पूर्व प्रकाशित सर्व गॅझेटिअर ई-बुक आवृत्तीमध्ये निर्माण केले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते. दार्शनिका विभागात काम करताना संपादकीय दृष्टीकोण कसा असावा, याविषयीचा वस्तुपाठ निर्माण केला. याशिवाय जिल्हा गॅझेटिअरमध्ये नवीन प्रयोग सुरू केले.मराठी जिल्हा गॅझेटिअरमध्ये प्रकरण ग्राम निर्देशिका पुन्हा सुरू केली. प्रत्येक जिल्हा निर्मितीची तारीख, पुनर्वसित गाव, भूकंपाची नोंद, मठ-स्थापत्य, गढी यांची नोंद असे विविध जिल्ह्यांचे वैशिष्ट्य त्या-त्या गॅझेटिअरमध्ये तपशीलाने नोंदवून अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केल्याचे दिसून येते.

      राज्य गॅझेटिअर मालिकेत सातारा, नांदेड, नागपूर, लातूर, गॅझेटिअर ग्रंथ संपादित करून प्रकाशित, स्थापत्य व कला, इतिहास, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, क्वीट इंडिया मुव्हमेंट या विशेष राज्य गॅझेटिअर बरोबरच औषधी वनस्पती, वनसंपदा, महाराष्ट्र लॅन्ड अ‍ॅन्ड पिपल प्रमाणे नदी खोरे निहाय गॅझेटिअर निर्मितीचा भारतातील पहिला प्रयोग ‘राज्य गॅझेटिअर प्रवरा खोरे’ हे प्रकाशित करून त्यांनी केला. सतत नवीन प्रयोग करण्याकडे कल, चौकस बुद्धी व गुणग्रहकता, अभ्यासकाचा शोध घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणे; या बाबींसाठी ते ओळखले जातात.

डॉ. दिलीप बलसेकर

पाठक, अरुणचंद्र शंकरराव