Skip to main content
x

पाठक, काशीनाथ बापूजी

     काशीनाथ बापूजी पाठक हे १८७७ मध्ये बी.ए. झाल्यानंतर बेळगावच्या सरदार महाविद्यालयामध्ये शिक्षकाचे काम करू लागले. याच सुमारास फ्लीट यांचे हिंदी शिलालेखांवरील इंडियन अ‍क्वेरीतील लेख त्यांच्या वाचनात आले व त्यातील दोषस्थले दाखवण्याच्या निमित्ताने हे संशोधन कार्यात शिरले. इंडियन अ‍ॅन्टिक्वेरीतील त्यांचे सुरुवातीचे लेख वाचूनच फ्लीट यांनी पाठक यांना आपल्या सहकार्‍याची जागा देऊ केली, परंतु यांनी ती नाकारली व आपला शिक्षकाचा पेशा चालू ठेवला. पुढे मिरजेच्या राजेसाहेबांच्या शिक्षकाची जागा त्यांना देण्यात आली (१८८४) व त्या निमित्ताने कोल्हापूरच्या सरस्वती भांडारातील जैन वाङ्मयाचे अध्ययन करण्याची संधी त्यांना मिळाली. यांचे हे अध्ययन पुढे इतके वाढले की, त्यांना या विषयातील तज्ज्ञ मानण्यात येऊ लागले.

     यानंतर म्हैसूर सरकारच्या पुरातत्त्व विभागात (आर्किओलॉजिकल डिपार्टमेन्टमध्ये) काही दिवस काम केल्यानंतर त्यांची पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या जागेवरून पुढे हे कार्य निवृत्त झाले (१९०८).

     जैन वाङ्मयातील जुने ग्रंथ व शिलालेख यांचा त्यांनी अतिशय सूक्ष्म अभ्यास केला होता. याच कारणाने या विषयावर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांना व निबंधांना जगाच्या संशोधन क्षेत्रात मान मिळाला. १८९३साली लंडन येथे भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ओरिएन्टॅलिस्टसच्या नवव्या अधिवेशनात यांनी ‘Position of Kumarila in Digambar Jain Literature’ हा निबंध पाठवला. अध्यक्ष मॅक्स मूलर व फ्लीट ल्यूमन इत्यादी पंडितांनी  या निबंधातील मूलग्रही संशोधनाचे मनापासून स्वागत केले. शंकराचार्यांच्या काळासंबंधीचे त्यांचे संशोधनही असेच महत्त्वाचे आहे. परंतु यापेक्षाही फ्लीट यांच्या ३१९-३२० या गुप्तकालाच्या संशोधनाला पाठक यांनी जैन वाङ्मयातील संशोधनाने पुरवलेले आधार विशेष महत्त्वाचे आहेत. स्वत: फ्लीट यांनी पाठक यांच्या या मदतीचा उल्लेख पुढे अनेक वेळा केला. पाठक यांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या शिलालेखांची संख्या वीस असून लिहिलेल्या निबंधांची संख्या पन्नासपेक्षा अधिक आहे. Inscriptions of the Kanarese Districts of Bombay Presidencyया विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाने भगवानलाल इंद्रजी लेक्चरर म्हणून निवडले होते (१९०८). उणादि सूत्रे ही पाणिनीची असल्याबद्दलचा त्यांचा निबंध तसेच किलहॉर्नच्या महाभाष्यातील त्रुटित भागांचे संशोधन करणारे निबंध हे त्यांच्या सूक्ष्म बुद्धीचे द्योतक आहेत.

संपादित

पाठक, काशीनाथ बापूजी